मुंबई । इंग्लंडने सोमवारी आयर्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी 14 सदस्यीय संघ जाहीर केला. डावखुरा वेगवान गोलंदाज रीस टॉपचे 4 वर्षानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. इयॉन मॉर्गन संघाचा कर्णधार असेल तर मोईन अलीला उपकर्णधार म्हणून निवडले आहे. तीन राखीव खेळाडूंचीही घोषणा करण्यात आली.
26 वर्षांच्या रीस टॉपलेने 10 वनडे सामन्यांमध्ये 16 बळी घेतले आहेत पण अखेरचा तो इंग्लंडकडून 2016 मध्ये टी 20 विश्वचषकात खेळला होता. त्याला पाठीच्या दुखापतीने ग्रासलेले होते. ज्यामुळे त्याला 2018 मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गेल्या वर्षी ब्लास्ट स्पर्धेत तो ससेक्सचा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.
रिक्त स्टेडियमवर जैविक दृष्ट्या सुरक्षित वातावरणात खेळल्या जाणार्या मालिकेसाठी सॅम बिलिंग्ज, लियाम डॉसन आणि डेव्हिड विले हे इंग्लंडच्या संघात परतले आहेत. रिचर्ड ग्लेसन, लुईस ग्रेगरी आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना राखीव खेळाडू म्हणून निवडले आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणारे जो रूट, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, ख्रिस वॉक्स आणि मार्क वुड यांचा विचार केला गेला नाही, तर विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य जॉनी बेअरस्टो, टॉम कुर्रेन, लियाम डॉसन, आदिल रशीद, जेसन रॉय आणि जेम्स व्हिन्सचा संघात समावेश आहे.
तिसऱ्या कसोटी सामन्यात स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेल्या जो डेन्लीला वनडे संघात स्थान मिळाले. पहिला सामना 30 जुलै तर दुसरा आणि तिसरा वनडे सामना अनुक्रमे 1 आणि 4ऑगस्ट रोजी एजियास बाऊल येथे खेळला जाईल. या मालिकेसह आयसीसी पुरुषांच्या विश्वचषक सुपर लीगची सुरुवात होईल आणि ही 2023 मध्ये होणार्या विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या संघांचा निर्णय घेईल.
निवडण्यात आलेला इंग्लंडचा संघ
इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जॉनी बेअरस्टो, टॉम बेंटन, सॅम बिलिंग्ज, टॉम क्रेन, लियाम डॉसन, जो डॅनले, साकीब मेहमूद, आदिल रशीद, जेसन रॉय, रीस टोपली, जेम्स व्हिन्स आणि डेव्हिड विली
राखीव खेळाडू
रिचर्ड ग्लेसन, लुईस ग्रेगरी आणि लियाम लिव्हिंगस्टोन