---Advertisement---

दोन वेळा स्वप्न भंगल्यानंतर तिसऱ्या वेळी इंग्लंडला विश्वचषकाची भेट देणाऱ्या ‘आयरिश क्रिकेटरची’ गोष्ट

---Advertisement---

१४ जुलै २०१९.. क्रिकेटच्या इतिहासातील एक महत्त्वाची तारीख.. बाराव्या विश्वचषकाचा अंतिम सामना या दिवशी खेळला गेला.. काहीसा वादग्रस्त मात्र नियमाला धरून झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करत इंग्लंडने आपले पहिले विश्वविजेतेपद पटकावले.. ज्या देशात क्रिकेटला सुरुवात झाली त्या देशाला पहिला विश्वचषक उंचावायला ४४ वर्ष जावी लागली..

इंग्लंडने विश्वचषक जिंकला मात्र त्यांच्यावर टीकादेखील झाली. कारण, इंग्लंडच्या संघातील अर्धेअधिक खेळाडू हे इंग्लंडचे मूळ रहिवासी नव्हतेच.. फिरकीची बाजू सांभाळणारे आदिल रशीद व मोईन अली हे पाकिस्तानी वंशाचे, अंतिम सामन्याचा मानकरी बेन स्टोक्स न्यूझीलंडचा तर प्रमुख वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर वेस्ट इंडिजचा मूळ निवासी आहे. कोलपॅक करारांतर्गत इंग्लंडसाठी खेळत असलेले द. आफ्रिका व झिम्बाब्वेचे मूळ नागरिक असलेले जेसन रॉय व टॉम करन हे इंग्लंड संघाचे सदस्य होते. इतकेच काय तर संघाचा कर्णधार सुद्धा आयर्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू होता. तो खेळाडू म्हणजे ऑयन मॉर्गन. आज मॉर्गनचा ३३ वा वाढदिवस.

आयर्लंडची राजधानी असलेल्या डब्लिनमध्ये आयरिश पिता व इंग्लिश आईच्या पोटी त्याचा जन्म झाला. वयाच्या अगदी पाचव्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये आपण तरबेज आहोत याची झलक घरच्यांना दाखवली. इऑनचे पिता जॉर्डी हे ज्या रश क्रिकेट क्लबचे खेळाडू होते त्याच क्लबमध्ये त्यांनी छोट्या इऑनला दाखल केले. इऑनने वयोगट क्रिकेटमध्ये आयर्लंडच्या १३, १५ व १७ वर्षाखालील संघाचे प्रतिनिधित्व करत आयर्लंड संघाच्या एकोणीस वर्षाखालील संघापर्यंत मजल मारली.

मॉर्गनने महाविद्यालयीन शिक्षणासाठी दक्षिण लंडनमधील डलविच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिथे, त्याचा खेळ पाहून अनेकांनी त्याला इंग्लंडसाठी क्रिकेट खेळावे म्हणून प्रेरणा दिली. मॉर्गनच्या डोक्यातही हा विचार घोळू लागला, मात्र हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे जाण्यापेक्षा त्याने आयर्लंडच्या एकोणीस वर्षाखालील संघात खेळण्याचे ठरवले. २००४ च्या एकोणीस वर्षाखालील क्रिकेट विश्वचषकात तो आयर्लंडसाठी सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू होता. २००६ एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात आयर्लंडचे नेतृत्व करताना त्याने, चेतेश्वर पुजारा पाठोपाठ सर्वाधिक धावा काढल्या. आजही एकोणीस वर्षाखालील विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक ६०६ धावा काढण्याचा विक्रम मॉर्गनच्या नावे आहे.

एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात केलेल्या शानदार कामगिरीचे बक्षीस म्हणून युरोपियन चॅम्पियनशिपसाठी त्याची निवड आयर्लंडच्या राष्ट्रीय संघात करण्यात आली. स्कॉटलंड विरुद्धच्या आपल्या पहिल्याच सामन्यात तो दुर्दैवीरित्या ९९ धावांवर बाद झाला. आयर्लंडसाठी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा मान देखील त्याने मिळवला. २००७ विश्वचषकात त्याने आयर्लंडचे प्रतिनिधित्व केले.

वयोगट स्पर्धांपासून मिडलसेक्स काउंटी क्लबसाठी इंग्लंडमध्ये खेळत असलेल्या मॉर्गनला, आईच्या इंग्लंड नागरिकत्त्वमुळे २००९ मध्ये इंग्लंडचा राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली. पुढच्याच वर्षी २०१० मध्ये इंग्लंडला टी२० विश्वचषक जिंकून देण्यात त्याने हातभार लावला. इंग्लंडकडून खेळण्याचा निर्णयावर टीका केलेल्यांना आपण योग्य निर्णय घेतला होता हे ठासून सांगितले.

मॉर्गन हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू होता ज्याने प्रतिनिधित्व केलेल्या दोन्ही आंतरराष्ट्रीय संघांसाठी शतक झळकावले. फेब्रुवारी २००७ मध्ये त्याने आयर्लंडकडून खेळताना कॅनडाविरुद्ध ११५ धावा फटकावल्या आणि मार्च २०१० मध्ये इंग्लंडसाठी खेळत बांगलादेशविरुद्ध नाबाद ११० धावा फटकावताना त्याने आपले नाव सुवर्णाक्षरांनी क्रिकेटच्या इतिहासात लिहिले.

डिसेंबर २०१२ मध्ये वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध टी२० सामन्यात मॉर्गनने एकहाती इंग्लंडला विजयाच्या नजीक नेले. अखेरच्या चेंडूवर तीन धावांची आवश्यकता असताना अशोक दिंडाला गगनभेदी षटकार मारत त्याने संघाला अविश्वसनीय विजय मिळवून दिला होता.

विवादापासून कायम दूर राहणाऱ्या मॉर्गनच्या आयुष्यात २०१६ च्या सुरुवातीला एक धक्कादायक घटना घडली. निक एमरी नामक इसमाने, मॉर्गनची पूर्वाश्रमीची प्रेयसी ब्रुक त्सकिराकिस व मॉर्गनचे काही खाजगी क्षण सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या बदल्यात त्याने मॉर्गनकडे ३५,००० पाऊंडची मागणी केली होती.

२०१५ क्रिकेट विश्वचषकाच्या अगदी काही महिन्यांपूर्वीच मॉर्गनकडे इंग्लंडच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले. अचानक, झालेल्या बदलाचा परिणाम इंग्लड संघाच्या कामगिरीवर झाला व त्या विश्वचषकात इंग्लंड बांगलादेशच्या हातून पराभूत होत स्पर्धेतून बाहेर पडला. सर्व खेळाडूंवर टीका झाली तरी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मॉर्गनवर विश्वास दाखवत त्याला कर्णधार पदावर कायम ठेवले.

२०१६ च्या टी२० विश्वचषकात इंग्लंडला अंतिम फेरीत घेऊन जाण्याची किमया मॉर्गनने करून दाखवली. अखेरच्या षटकात, वेस्टइंडीजच्या कार्लेस ब्रेथवेटने अखेरच्या षटकात, लगावलेल्या सलग चार षटकारांमुळे इंग्लंडचे दुसऱ्या टी२० विजेतेपदाचे स्वप्न भंगले. आयपीएलमध्ये देखील २०१२ केकेआर व २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी त्याने चषक उंचावला.

२०१७ च्या मायदेशात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंड पराभूत झाल्याने मॉर्गनच्या कप्तानीवर अनेकांनी टीका केली, मात्र यावेळी देखील क्रिकेट बोर्ड त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कारण, २०१९ चा विश्वचषक इंग्लंडमध्ये होणार होता आणि त्यासाठी बोर्डाला अनुभवी कर्णधाराची गरज होती.

तब्बल २० वर्षानंतर जेव्हा विश्वचषकाचे आयोजन करण्याची संधी इंग्लंडला मिळाली तेव्हा इंग्लंड आपल्या पूर्ण क्षमतेने स्पर्धेत सामील झाला. मॉर्गनच्या साथीला रॉय, बटलर, रूट, बेअरस्टो सारखे तुफानी फलंदाज तर अली व स्टोक्ससारखे दिग्गज अष्टपैलू खेळाडू व आर्चर, वुड, वोक्स, प्लंकेटसारखे अनुनभवी मात्र प्रतिभावंत वेगवान गोलंदाज होते. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात मॉर्गनने विश्वविक्रमी १७ षटकार ठोकत ७१ चेंडूत १४८ धावांची वादळी खेळी केली. सुपर ओवरपर्यंत ताणल्या गेलेल्या अंतिम सामन्यात इंग्लंडला विजयी करत तमाम इंग्लिश चाहत्यांचे स्वप्न पूर्ण करत त्यांना आनंद साजरा करण्याची संधी दिली. सलग सात टी२० मालिका जिंकणारा कर्णधार होण्याचा मानही मॉर्गनकडे जातो.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील एक धडाकेबाज फलंदाज व उत्कृष्ट कर्णधार असलेल्या मॉर्गनचे पुढील लक्ष भारतात होणारा २०२१ टी२० विश्वचषक आहे. १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी तो केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकला सहाय्य करताना दिसेल.

वाचा-

-घरात टीव्ही नसल्याने गल्लीत पान टपरीवर क्रिकेट पाहणारा मुलगा बनला टीम इंडियाचा कर्णधार..

-गोलंदाजी, फलंदाजी, म्हणाल तिथे क्षेत्ररक्षण व यष्टीरक्षणसुद्धा करणारा खराखुरा ऑलराऊंडर

-…आणि त्यादिवशी सचिन तेंडुलकरने १७२६ दिवसांनी शतकाचा दुष्काळ संपवला

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---