मुंबई । कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या व्हायरसमुळे जगातल्या सर्वच क्षेत्रावर परिणाम घडून येत आहे. शिक्षण क्षेत्रावरही याचे परिणाम दिसून येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शाळा आणि महाविद्यालय देखील बंद ठेवण्यात आले आहेत. मुलांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत.
अभ्यासात कोणताही व्यत्यय येऊ नये यासाठी बहुतांश शाळा आणि महाविद्यालयांनी ऑनलाइन क्लासेस सुरू केले आहेत. दुसरीकडे काही मुलांना ऑनलाइन क्लासमध्ये सामील होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. ऑनलाइन क्लासमध्ये सहभागी होण्यासाठी अडचणीत सापडलेल्या अशाच एका विद्यार्थ्याने माजी भारतीय फलंदाज वीरेंद्र सेहवाग यांचे लक्ष वेधून घेतले.
शुक्रवारी सेहवागने राजस्थानमधील बाडमेर येथे राहणारा मुलगा हरीश याच्या संघर्षाची कहाणी शेअर केली. ऑनलाइन वर्गात सामील होण्यासाठी हरीश दररोज डोंगरावर चढतो, जेणेकरून त्याला इंटरनेट मिळेल आणि तो ऑनलाइन वर्गात सामील होऊ शकेल. सेहवागनेही या मुलाला मदत करण्याची इच्छा केली आहे.
सेहवाग म्हणाला की, “राजस्थानमधील बाडमेरचा हरीश हा लहान मुलगा इंटरनेटसाठी दररोज डोंगर चढतो, ज्यामुळे तो ऑनलाइन वर्गात प्रवेश घेऊ शकेल. तो सकाळी 8 वाजता चढायला लागतो आणि वर्ग संपल्यानंतर तो दुपारी दोन वाजता घरी परततो. त्याच्या जिद्दीला सलाम आणि त्याला मदत करायला आवडेल.”
https://twitter.com/virendersehwag/status/1286482642339106818
संपूर्ण जग बऱ्याच काळापासून कोरोनाच्या विरोधात लढा देत आहे. आता प्रत्येकजण आपल्या आयुष्यास परत ट्रॅकवर आणण्याचा प्रयत्न करीत आहे. खेळाडूही मैदानावर परत येत आहेत.






