मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळ कोरोना साथीमुळे डिसेंबरपासून देशातील महत्त्वाची देशांतर्गत स्पर्धा रणजी ट्रॉफीला सुरुवात करण्याचा विचार करीत आहे. पण माजी दिग्गज फलंदाज वसीम जाफरच्या मते, रणजी करंडक ऑक्टोबरमध्ये सुरु करणे आवश्यक आहे.
वयाच्या 42 व्या वर्षी, यावर्षी मार्च महिन्यात निवृत्त झालेला जाफर म्हणाला, “मला वाटते ऑक्टोबरमध्ये रणजी करंडकातून हंगाम सुरू झाला पाहिजे. त्यानंतर, इराणी ट्रॉफी आयोजित केली पाहिजे. त्यानंतर आयपीएलच्या लिलावाची वेळ झाल्यामुळे सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसारखी टी20 स्पर्धा आयोजित केली पाहिजे.”
देशांतर्गत क्रिकेटमध्ये 260 सामन्यांत 19 हजार 410 धावा करणारा जाफर स्पोर्ट्स टायगरच्या शो ‘ऑफ द फील्ड’ मध्ये म्हणाला की, “बरेच फ्रेंचायझी स्पर्धा पाहू शकतात आणि नवीन प्रतिभेचा शोध घेऊ शकतात. शेवटी हा हंगाम विजय हजारे ट्रॉफीने संपला पाहिजे. प्रामाणिकपणे सांगतो आपल्या देशांतर्गत खेळाची रचना इतर देशांच्या तुलनेत वाईट नाही. पण दरवर्षी रचना बदलत राहते. त्यामुळे त्यात थोडासे सातत्य हवे असते.”
जाफरने असेही म्हटले आहे की, “मला वाटते की जर आपण दुलीप ट्रॉफी खेळली नाही तर कोणतेही नुकसान होणार नाही. यामुळे दीड महिन्यांचा कालावधी मिळेल. ज्याचा उपयोग खेळाडू आणखी थोडी विश्रांती घेण्यासाठी करू शकतो.” आपल्या कारकीर्दीचा बहुतांश वेळ मुंबईसाठी दिलेला जाफर, आपल्या कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यात विदर्भ संघाकडून खेळला आणि विदर्भाला २ वेळा रणजी चॅम्पियन बनवण्यात मोलाचा वाटा उचलला.
बीसीसीआय 2020-21 च्या हंगामातील सामने कमी करण्याच्या विचारात आहे. तात्पुरत्या योजनेनुसार टी -20 सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि रणजी करंडक स्पर्धा होईल. 2019-20 च्या हंगामात पुरुष आणि महिलांच्या सर्व वयोगटात एकूण 2036 सामने खेळले गेले होते. परंतु यावेळी सामन्यांची संख्या 1183 असू शकते.