इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. त्याच्या या दुखापतीमुळेच नोव्हेंबर 2020 मध्ये सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी त्याची भारतीय संघात निवड झालेली नाही. मात्र त्यानंतर तो नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला होता. तसेच तो मुंबई इंडियन्सकडून दुखापतीनंतर 2 सामनेही खेळला. त्यामुळे त्याच्या दुखापतीवर क्रिकेट क्षेत्रातील दिग्गजांनी प्रश्न उपस्थित केले होते. आता या वादात इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉ यांनी उडी घेतली आहे.
रोहितच्या दुखापतीचा धोका पुन्हा वाढला -शास्त्री
रवि शास्त्री रोहितच्या दुखापतीबद्दल म्हणाले होते की, “रोहित शर्माच्या वैद्यकीय अहवालामुळे त्याच्या दुखापतीचा धोका पुन्हा वाढला आहे. रोहितचा संघात समावेश न करण्याचा निर्णय निवडकर्त्यांनी त्याचा वैद्यकीय अहवाल पाहून घेतला होता.” रवि शास्त्री यांनी रोहितला पुनरागमनासाठी घाई न करण्याचा सल्लाही दिला होता.
कदाचित रोहित अपेक्षेनुसार तंदुरुस्त नसेल-वॉ
वॉ क्रिकबझ या वेबसाईटशी बोलताना म्हणाले की, “रवि शास्त्री यांनी केलेल्या विधानावरून असे लक्षात येते की, संघ व्यवस्थापनाला रोहित शर्मा अधिक तंदुरुस्त व्हावा असे वाटते. कदाचित तो तितका तंदुरुस्त नसेल. विराट कोहली तंदुरुस्तीला किती महत्त्व देतो हे आपल्याला माहितीच आहे. आपण त्या प्रमाणानुसार तंदुरुस्त नसल्यास आपण बाजूला सरकले पाहिजे. मग तुम्ही कोणत्या दर्जाचे खेळाडू आहात हे महत्वाचं नाही. कदाचित रोहित अपेक्षेनुसार तंदुरुस्त नसेल.”
संघात स्थान का दिले नाही हे समजावून सांगायला हवं
पुढे बोलताना वॉ म्हणाला की, “भारतीय संघाने परिस्थितीबद्दल अचूक माहिती दिली पाहिजे. रोहितला संघात स्थान का दिले नाही हे त्यांनी समजावून सांगायला हवे.”
दुखापतीबद्दल द्यावी कल्पना
रोहितच्या दुखापतीबद्दल बोलताना वॉ म्हणाला की, “जर रोहित शर्माला दुखापत झाली असेल, तर त्याला कोणती दुखापत झाली आहे, हे सांगितलं पाहिजे. सर्व काही स्पष्ट असायला हवं. त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे, असे कळले. ठीक आहे, आम्हाला समजले आहे की तो याच कारणास्तव खेळत नाही. आणि त्याला इतर कुठेही दुखापत झाली आहे, असे मी यापूर्वी कधीही ऐकले नाही.”
…असे मी कधीही ऐकले नव्हते
“फलंदाजाला दुखापत होईल म्हणून तो खेळत नाही, असे मी कधीही ऐकले नाही. होय, मी हे गोलंदाजांबद्दल ऐकले आहे. फुटबॉलमध्ये जर खेळाडू अधिक सामने खेळले असतील, तर दुखापतीची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. मी हे गोलंदाजांच्या बाबतीत घडताना पाहिले आहे, पण फलंदाजांच्या बाबतीत असे घडताना याआधी पहिले नाही.”असेही पुढे बोलताना वॉ म्हणाला
…तर ऑस्ट्रेलियाला का जात नाही हे समजत नाही
पुढील परिस्थितीबद्दल बोलताना तो म्हणाला की, “पुढच्या एक आठवड्यात काय होईल यासाठी मी खूप उत्सुक आहे. रोहित शर्मा या कालावधीत काय करतो हे पाहायचं आहे. जर तो खेळला, तर नक्कीच तो ऑस्ट्रेलियाला जाईल. जर तो आयपीएलमध्ये खेळत असेल, तर तो ऑस्ट्रेलिया का जात नाही हे मला समजत नाही.”
…हा मुद्दा योग्य प्रकारे नाही हाताळला
“हे प्रकरण ज्या प्रकारे हाताळले गेले त्याबद्दल मला आश्चर्य वाटले. भारताने हा मुद्दा योग्यप्रकारे हाताळला नाही. संपूर्ण प्रकरणात पारदर्शकता नाही. हे आश्चर्यकारक आहे. या प्रकरणाला योग्य प्रकारे हाताळायला पाहिजे होतं. हा रोहित शर्मा आहे. जर तो जखमी झाला असेल तर सांगा की तो जखमी आहे. खेळाडू जखमी होत राहतात, त्यात कोणतीही अडचण नाही.”असेही पुढे बोलताना वॉ म्हणाला.
फ्रँचायझीसाठी खेळू शकतो, मग देशासाठी का नाही? -सेहवाग
याबद्दल बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग म्हणाला की, “मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांना दुखापतीबद्दल पूर्ण माहिती नव्हती, याबद्दल मला आश्चर्य वाटले. याला बीसीसीआयकडून झालेले गैरव्यवस्थापन म्हटले जाईल. रोहित फ्रँचायझीसाठी खेळू शकतो, मग देशासाठी का नाही? हेही आश्चर्यकारक आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
धोनी आणि डू प्लेसिसची मस्ती; ‘या’ खेळाडूला केलं टार्गेट, पाहा व्हिडिओ
IPL 2020- विराट कोहलीच्या RCB समोर वॉर्नरच्या SRHचे आव्हान; कोणाचा प्रवास थांबणार?