‘इंडिया का त्योहार’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगने (आयपीएल) बऱ्याच नवोदित शिलेदारांना कारकिर्द घडवण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. केवळ नवख्या क्रिकेटपटूंची नव्हे तर कित्येक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या क्रिकेटपटूंचीही कारकिर्द आयपीएलमुळे बहरली आहे. याच आयपीएलमध्ये एक असाही शिलेदार आहे, ज्याची याच मंचावर स्वप्नपुर्ती झाली आहे. तो खेळाडू म्हणजे, ‘संजू सॅमसन’.
राजस्थान रॉयल्सचा भाग असलेल्या २६ वर्षीय सॅमसनचा क्रिकेट प्रवास अनेक खडतर मार्गांनी भरलेला होता. त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी केलेला त्याग, सॅमसनने घेतलेली मेहनत, हे विशेष.
केरळच्या पुल्लुविला गावात जन्मलेल्या सॅमसनची कारकिर्द घडवण्यात त्याच्या वडिलांनी मोठे बलिदान दिले आहे. आपल्या लेकरांची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी पोलिस हवालदारची नोकरी सोडली होती. ते केरळ पोलिसमध्ये पोलिस हवालदार म्हणून कार्यरत होते. सॅमसनचा सख्खा भाऊ सैली सॅमसन हादेखील क्रिकेटपटू आहे.
आंतराराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध करण्यात अपयशी
संजू सॅमसनने २०११ साली देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. तो केरळ संघाचा प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज आहे. त्याच्या देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीनेच त्याच्या भारतीय संघाची दारे उघडी केली होती. जुलै २०१५ मध्ये झिम्बाब्वे संघाविरुद्ध त्याने पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. परंतु या सामन्यात तो अवघ्या १९ धावा करु शकला होता.
त्यानंतर २०२० साली देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीद्वारे पुन्हा प्रकाशझोतात आल्याने त्याला पुनरागमनाची संधी मिळाली. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असताना त्याला संपूर्ण टी२० मालिकेत खेळवण्यात आले. पण या तीन टी२० सामन्यात त्याने अवघ्या ४८ धावा केल्या. हेच त्याच्या पूर्ण टी२० कारकिर्दीवर नजर टाकायची झाली तर, आतापर्यंत ७ टी२० सामने खेळताना त्याने ८३ धावा केल्या आहेत. यावरुन कळते की, सॅमसन आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळूनही स्वत:ला सिद्ध करु शकला नाही.
आयपीएल २०२१ मध्ये करणार राजस्थान रॉयल्सचे नेतृत्त्व
भलेही सॅमसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द म्हणावी तशी बहरली नाही. परंतु त्याने आयपीएलमध्ये आपली छाप सोडली आहे. गतवर्षी राजस्थान रॉयल्सकडून जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सॅमसनला यंदा संघनायक बनवण्यात आले आहे. आयपीएल २०२१ लिलावात राजस्थान संघाने माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथसा मुक्त केले होते. त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज सॅमसनवर संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारी सोपण्यात आली आहे.
अशात मागील १२ हंगामापासून आयपीएल जेतेपदाच्या प्रतिक्षेत असलेल्या राजस्थान रॉयल्सच्या अपेक्षांवर संजू सॅमसन खरा उतरतो का नाही? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोलकाताची १० धावांनी हैदराबादवर मात, कर्णधार वॉर्नरने ‘यांना’ पराभवासाठी धरले जबाबदार
नितीश राणाचा नवा पॅटर्न! अर्धशतक झळकावताच केले आगळेवेगळे सेलिब्रेशन, सोशल मीडियावर एकच चर्चा