क्रिकेट जगतात वाद होणे काही नवीन नाही. क्रिकेट सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक वाद समोर आले आहेत. अशा वादांमुळे काही क्रिकेटपटूंची कारकिर्दही संपुष्टात आली आहे. अशाच काही वादांमुळे कारकिर्द संपलेल्या क्रिकेटपटूंचा घेतलेला हा आढावा –
१. हन्सी क्रोनिए –
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हन्सी क्रोनिएने १९९२ ते २००० या कालावधीत ६८ कसोटी आणि १८८ वनडे सामने खेळले आहेत. तसेच त्याने या कालावधीत दक्षिण आफ्रिकेचे नेतृत्वही केले. त्याच्याकडे एक उत्तम कर्णधार म्हणून पाहिले जात होते.
मात्र २००० साली त्याने मॅच फिक्सिंग केली असल्याची कबूली दिली. अखेर अनेक खेळाडूंनी क्रोनिएच्या विरुद्ध साक्ष दिल्याने दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. यानंतर 2 वर्षांच्या आतच एका विमान अपघातात क्रोनिएचे निधन झाले.
२. अँडी फ्लॉवर –
झिम्बाब्वेचे दिग्गज क्रिकेटपटू अँडी फ्लॉवर यांनी ११ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अनेक अविस्मरणीय खेळी केल्या. ते झिम्बाब्वेचे सर्वाधिक धावा करणारेही फलंदाज आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७६ सामन्यात ११५८० धावा केल्या आहेत.
मात्र २००३ ला एका वादग्रस्त घटनेमुळे त्यांची कारकिर्द वयाच्या ३५ व्या वर्षी संपुष्टात आली. २००३ च्या विश्वचषकावेळी पहिल्याच सामन्यात त्यांनी आणि त्यांचा संघसहकारी हेन्री ओलोंगाने झिम्बाब्वे सरकारविरुद्ध नाराजी दाखवण्यासाठी हाताला काळी पट्टी बांधली होती.
या घडनेमुळे मोठा वाद झाला होता. त्यानंतर दोन्ही खेळाडूंनी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेेतला. या घटनेनंतर अँडी फ्लॉवर इंग्लंडला स्थायिक झाले. तिथे त्यांनी प्रशिक्षणाला सुरुवात केली.
३. अँड्र्यू सायमंड्स –
ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचीही कारकिर्द ही वादग्रस्त घटनांमुळे संपुष्टात आली. त्याने १९९८ ते २००९ या कालावधीत २६ कसोटी, १९८ वनडे आणि १४ टी२० सामने खेळले. त्याच्याकडे मोठे फटके मारण्याची क्षमता होती. तसेच तो महत्त्वाच्या वेळी विकेट्सही काढायचा.
पण २००८ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात त्याच्यात आणि हरभजन सिंगमध्ये वादावादी झाली. त्यावेळी सायंमड्सने हरभजनवर त्याला मंकी म्हटल्याचा आरोप केला होता. त्या दोघांमधील मंकीगेट प्रकरण चिघळले होते.
त्यावेळी हरभजनवर ३ सामन्यांच्या बंदीचाही निर्णय घेण्यात आला पण बीसीसीआयच्या मदतीने भारतीय खेळाडूंनी या विरोधात नाराजी व्यक्त केल्याने ही बंदी काढण्यात आली. या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने योग्य साथ न दिल्याचे सायमंड्सला वाटले.
त्याने ऑगस्ट २००८ ला संघाच्या बैैठकीसाठी न जाता मासेमारीसाठी गेला. ज्यामुळे त्याच्यावर काही महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली. त्यानंतर २००९ ला सुरुवातीला एका मुलाखतीदरम्यान त्याने न्यूझीलंडचा क्रिकेटपटू ब्रेंडन मॅक्यूलमबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यामुळे त्याच्यावर ऑस्ट्रेलियाने दंड ठोठावला.
एवढेच नाही तर २००९ च्या टी२० विश्वचषकादरम्यानही त्याच्याबाबतीत दारुच्या संदर्भात काहीतरी वाद झाले. त्यामुळे त्याला पुन्हा मायदेशी पाठवण्यात आले. यानंतर काही दिवसातच त्याने निवृत्ती घेतली. २००८-०९ दरम्यान त्याच्याबाबतीत घडलेल्या या वादग्रस्त घटनामुळे कारकिर्दीलाही पूर्णविराम लागला. १४ मे २०२२ रोजी सायमंडचा एका कार अपघातात मृत्यू झाला.
४.केविन पीटरसन –
इंग्लंडला दिग्गज फलंदाज केविन पीटरसनच्याबाबतीत अनेकदा काही वाद समोर आले. पीटरसन २००४ ते २०१४ दरम्यान १०४ कसोटी आणि १३६ वनडे सामने खेळला. तो इंग्लंडचा एक प्रतिभाशाली क्रिकेटपटू म्हणून नावाजला गेला. त्याने अनेकदा इंग्लंडच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
२०११ पर्यंत पिटरसनची कारकिर्द चांगली सुरु होती. पण त्याच्या कारकिर्दीतील शेवटच्या ३ वर्षात त्याच्यातील आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डमधील वाद वाढले होते.
२०१२ ला पिटरसनने दक्षिण आफ्रिका संघाला चिथावणी देणारा संदेश पाठवला होता. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस आणि प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांच्या नावाचाही त्या संदेशात समावेश होता. त्यामुळे त्याला पुढच्या कसोटीसाठी काढून टाकण्यात आले.
त्यानंतर पीटरसन आणि इंग्लंड क्रिकेट बोर्ड यांच्यातील वाद आणखी चिघळले होते. २०१३-१४ च्या ऍशेस मालिकेतच इंग्लंडला ०-५ असा पराभव पत्करावा लागला होता. तसेच या मालिकेत पीटरसनला २९४ धावाच करता आल्या होत्या.
त्यानंतर मात्र पीटरसनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द संपुष्टात आली.
५. ड्यूएन ओलिविअर –
दक्षिण आफ्रिकेचा युवा वेगवान गोलंदाजाची कारकिर्दीला एका वादग्रस्त करारामुळे मागीलवर्षी ग्रहण लागले. झाले असे की मागीलवर्षी फेब्रुवारीमध्ये श्रीलंकेचा संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकेला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत करत मोठी कामगिरीही केली.
पण याचदरम्यान ड्यूएन ओलिविअरने ३ वर्षांसाठी कोल्पॅक करारावर स्वाक्षरी केली असल्याची घोषणा केली. या करारानुसार ओलिविअर इंग्लंडमध्ये यॉर्कशायरकडून ३ वर्षे खेळणार होता. त्यामुळे त्याला या काळात दक्षिण आफ्रिकेसाठी खेळता येणार नव्हते.
त्यामुळे अनेक वाद झाले होते. त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका होत होती. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने एक प्रतिभाशाली वेगवान गोलंदाज गमावला होता. ओलिवियरने २०१७मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. तसेच त्याने ५ कसोटी सामनेही खेळले होते. तसेच त्याने त्याच्या घातक गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले होते.
ट्रेंडिंग घडामोडी –
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात कर्णधार असताना सर्वाधिक शतके करणारे ५ फलंदाज
वनडेत सर्वाधिक शतके करणारे ५ कर्णधार, दोन नावं आहेत आश्चर्यचकित करणारी