यावर्षी खेळल्या गेलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत (u19 world cup 2022) भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. भारताच्या १९ वर्षाखालील संघाचा हा ५ वा विश्वचषक विजय होता. यावर्षीचा विश्वचषक वेस्ट इंडीजमध्ये खेळला गेला होता. पण याठिकाणी व्यवस्था अपेक्षित नव्हती. स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याइतपत वेस्ट इंडीज तयार नव्हता, असे मत भारताच्या युवा संघाचे मॅनेजर लॉबजांग जी तेन्जिंग (Lobzang G. Tenzing) यांनी व्यक्त केले आहे.
१९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील काही खेळाडू आहे सपोर्ट स्टाफचे सदस्य कोरोना संक्रमित आढळले होते. यानंतर विलगीकरणाचा कालावधी पार पाडताना या खेळाडूंना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तसेच स्पर्धेदरम्न संघाच्या राहण्याची आणि विलगीकरण्याची खूपच खराब व्यवस्था केली गेली होती. एका वृत्तवाहिनीशी बोलताना भारतीय संघाचे मॅनेजर याविषयी व्यक्त झाले आहेत.
ते म्हणाले की, “यापेक्षा अधिक लॉजिस्टिकची गरज होती, पण वेस्ट इंडीजमधील स्पर्धेशी संबंधित लोक खूपच सुस्त होते. भारतीय संघाने त्यांचे नॉकआउट सामने एंटिगामध्ये खेळले आणि त्याठिकाणी त्यांना सर्वात आरामात राहण्याची जागा मिळाली. गयानामध्ये विलगीकरणात राहताना खूप अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा मी आणि माझे सहकारी कोविड १९ संक्रमित होतो. त्यावेळी आमची मदत करण्यासाठी कोणताही डॉक्टर उपस्थित नव्हता. आम्हाला औषधेही उपलब्ध करून दिली जात नव्हती. हे पूर्ण प्रक्रियेचे अपयश होते. अशात संघाच्या फिजीओंनी आमची मदत केली.”
“आमच्या हॉटेलमध्ये खेळाडू आणि दुसरे पाहुणे एकाच मजल्यावर होते. विलगीकरणादरम्यान देखभाल करण्यासाठी कोणीही उपस्थित नव्हते. रूममध्ये प्रत्येक वेळी पाणी उपलब्ध नव्हते आणि मनाप्रमाणे जेवणही मिळत नव्हते. आमचे नशीब चांगेल होते की, तिथे जवळच भारतीय रेस्टोरंट होते, ज्यांनी आमची मदत केली. सराव सामन्यादरम्यानही स्टेडियमच्या वॉशरूममध्ये पाणी नव्हते. मी असे म्हणू शकतो की, बायो बबलमध्ये बीसीसीआय आणि राज्याच्या असोसिएशनने अधिक चांगली व्यवस्था केली होती.”
महत्वाच्या बातम्या –
खेळाडूंच्या सर्वोच्च संघटनेकडून साहाला समर्थन; सार्वजनिक पत्र लिहीत म्हटले…