लगबग सुरु झाली आहे. सर्वांना वेध लागले आहे ते वर्ल्डकप 2023 चे. अनेकांना भारताने वर्ल्डकप जिंकल्याची स्वप्न देखील पडायला सुरुवात झालीय. 2011 नंतर पहिल्यांदाच भारतात वनडे वर्ल्डकप होतोय. त्यामुळे उत्कंठा शिगेला पोहचलीय. परंतू या वर्ल्डकपची फायनल कुठे होतेय माहित आहे? गुजरातच्या अहमदाबादमधील श्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा अतिशय महत्त्वाचा सामना होतोय. याशिवाय भारत-पाकिस्तान सामना देखील याच स्टेडियमवर होणार आहे. परंतू याच स्टेडियमवर का? ईडन गार्डन्सला क्रिकेटची पंढरी म्हटलं जात, तिथे फायनल नाही. आपण लास्ट टाईम वर्ल्डकप जिंकलो तेव्हा फायनल मुंबईला झाली होती. मग अचानक सगळे सोडून अहमदाबादच स्टेडियम कसं? मित्रांनो तुम्हाला अनेक प्रश्न पडले असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या लेखात मिळतील.
आज आपल्याला अहमदाबादमधील जे नरेंद्र मोदी स्टेडियम दिसतेय, त्याची पहिल्यांदा उभारणी झाली 1983 साली. साबरमती नदीच्या काठावर मोटेरा गावच्या हद्दीत असलेल्या या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव दिले गेलेले. सुरुवातीला या स्टेडियमची क्षमता 49 हजार प्रेक्षकांची होती. हे नवे सुसज्ज स्टेडियम तयार होण्यापूर्वी अहमदाबाद महानगरपालिकेच्या स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने होत असत. या नव्या स्टेडियममुळे गुजरातमधील क्रिकेटला आणखीनच पंख फुटले.
दरम्यानच्या काळात हे स्टेडियम अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार राहिले. द ग्रेट सुनील गावसकरांनी 10,000 कसोटी धावांचा न भूतो पराक्रम याच मैदानावर केला. भारताचे विश्वविजेते कर्णधार कपिल देव या मैदानावर रिचर्ड हॅडलींचा 431 बळींचा विक्रम मोडत त्यावेळी जगातील सर्वात यशस्वी गोलंदाज बनलेले. भारताच्या सर्वकालीन महान फलंदाजांपैकी एक असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणचा डेब्यू देखील येथेच झाले.
अहमदाबादच्या या स्टेडियमला चांगली ओळख मिळाली ती 2006 चॅम्पियन ट्रॉफीवेळी. त्यावेळी मैदानाचे नूतनीकरण करत त्याला नवे रूप दिले गेले. या अतिमहत्त्वाच्या स्पर्धेतील पाच सामने याच मैदानावर खेळवण्यात आले. 2011 वर्ल्डकपच्या सामन्यांचे यजमानपद भूषवण्याची संधी देखील त्यांना मिळाली. टीम इंडियाने अखेरच्या वेळी साजऱ्या केलेल्या विश्वविजयाची वाट व्हाया अहमदाबाद गेलेली. क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा सलग तीन वनडे वर्ल्डकपपासून चालत आलेला विजयरथ टीम इंडियाने इथेच रोखलेला आणि पाकिस्तानविरुद्ध दोन हात करायला मोहालीला कुच केली.
2014-2015 दरम्यान स्टेडियमचे सुशोभीकरण व नूतनीकरण करण्याची संकल्पना बीसीसीआय व गुजरात क्रिकेट असोसिएशनने मांडली. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापेक्षा मोठा विचार करत, या मैदानाचे रूपडे बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी थेट हे मैदान रिकन्स्ट्रक करण्याचे आदेश दिले. आणि त्यानंतर सुरूवात झाली ती एका चमत्काराला. तब्बल 800 कोटींच्या अंदाजे खर्चाचे बजेट काढत सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचे नव्याने काम सुरू झाले. चार वर्षे चाललेल्या या संपूर्ण कामानंतर उभे राहिले जगातील सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम. ज्याला नाव दिले गेले श्री नरेंद्र मोदी स्टेडियम. तर त्या संपूर्ण परिसराला सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हटले गेले. तब्बल 1 लाख 32 हजार इतकी प्रेक्षक क्षमता असलेले हे स्टेडियम 2020 मध्ये नव्याने वापरण्यास सुरुवात केली गेली.
2020 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या स्टेडियमचे लोकार्पण झाले. याच वर्षी या मैदानावर नॅशनल गेम्स देखील खेळल्या गेल्या. या स्टेडियमवर अनेकदा राजकीय व्यक्ति आणि राजकीय कार्यक्रम देखील झालेले दिसून येतात. 2020 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करण्यासाठी याच स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयोजित केला होता. अगदी या वर्षीच्या सुरुवातीला भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीच्या 75 वर्षानिमित्त ऑस्ट्रेलियन पंतप्रधान ऍंथनी अल्बानेस यांना या मैदानावर आमंत्रित केलेले.
जेव्हापासून हे स्टेडियम नव्याने सज्ज झाले तेव्हापासून भारतीय क्रिकेटमधील अनेक महत्त्वपूर्ण सामने याच मैदानावर झालेले आहेत. सलग दोन आयपीएलचे उद्घाटनाचे आणि अंतिम सामने इथेच खेळले गेले. या व्यतिरिक्त अनेक मोठ्या संघांविरुद्धचे सामने या ठिकाणी होताना दिसतात. नरेंद्र मोदी स्टेडियमला या सामन्यांचे आयोजनपद मिळण्याचे सर्वात मोठे कारण या स्टेडियमची प्रेक्षक क्षमता आणि कॉर्पोरेट बॉक्सेस मधून मिळणारे बक्कळ कमाई आहे. 1 लाख 32 हजार चाहते एका वेळी सामन्याला हजर राहिल्यास बीसीसीआय यातून मोठी रक्कम मिळवते, जी इतर स्टेडियमवर शक्य होत नाही. एक प्रकारे नरेंद्र मोदी स्टेडियम बीसीसीआयला सोन्याचे अंडे देणारी कोंबडीच म्हणावी लागेल.
आता वर्ल्डकपच्या रणसंग्रामातही गुजरातच ‘मोटा भाई’ आहे. इंग्लंड-न्यूझीलंडची ओपनिंग मॅच, भारत-पाकिस्तानचे पारंपारिक द्वंद्व, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाची ऐतिहासिक लढाई आणि दक्षिण आफ्रिका-अफगाणिस्तान या सामन्यांसह ‘द ग्रॅंडेस्ट’ फिनाले’ अहमदाबादच्या याच 22 गजच्या पिचवर पार पडेल. आता गुजरातच्या या दिमाखदार स्टेडियमवर किती ‘सरस’ खेळ होतो हे पाहण्यासाठी अवघे जग उत्सुक आहे.
(2023 ODI World Cup Stadiums Narendra Modi Stadium Ahmedabad)
विश्वचषक विशेष-
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद
किस्से वर्ल्डकपचे: आणि मलिंगाचे ‘ते’ चार चेंडू इतिहासात अजरामर झाले
किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला
विश्वचषक कमी, पण शतके जास्त! रोहितचा World Cupमधील भन्नाट Record, 2023मध्ये भीमपराक्रम करण्याची संधी