तुम्ही जर डायहार्ट क्रिकेट फॅन असाल तर आयुष्यात दोन गोष्टी नक्की केल्या पाहिजे. शक्य होईल तेव्हा लॉर्ड्सवर जाऊन एखादी तर कसोटी पाहिली पाहिजे, आणि आपल्या मुंबईतील वानखेडेवर एखादा तरी सामना याची देही याची डोळा पाहिला पाहिजे. काय ते वातावरण? काय तो सचिन सचिन आवाज? आणि काय ते हार्डकोअर क्रिकेट फॅन.
महाराष्ट्रातील असा एकही क्रिकेटप्रेमी नसेल, ज्याला या देखण्या स्टेडियमवर जाऊन, क्रिकेट सामना पाहण्याची इच्छा झाली नसेल. कोणी मुंबई इंडियन्सला सपोर्ट करायला तर कोणी टीम इंडियाला सपोर्ट करायला, त्या स्टॅन्डसमध्ये उपस्थित राहू इच्छितो. आता वर्ल्डकपसाठी हेच वानखेडे स्टेडियम पूर्णपणे सज्ज होत आहे. याच स्टेडियमच्या इतिहासाची आणि त्यावर घडलेल्या अनेक अविस्मरणीय सामन्यांची माहिती आपण या लेखात घेऊ.
मुंबई हे भारतीय क्रिकेटचे माहेरघर आहे, हे सर्वजण जाणतातच. पण सुरुवातीला बॉम्बे जिमखाना आणि सीसीआय म्हणजेच ब्रेबॉर्न स्टेडियम यांच्यावरच क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. या दोन्ही स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय सामने झालेत. आता एवढ्या मोठ्या शहरात ब्रेबॉर्न स्टेडियम असताना जवळच दुसरे स्टेडियम कसे काय? हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणजे अगदी तुम्ही ब्रेबॉर्न स्टेडियमवरुन गप्पा मारत निघाला तर वानखेडेला कधी पोहचला कळणारही नाही, इतके ते जवळ. याचमुळे वानखेडे स्टेडियमचा इतिहास जाणून घेताना नक्की एवढ्या जवळ हे स्टेडियम का बांधले? हा इतिहास समजून घेणेही तेवढेचे गरजेचे बनते. कारण विषय मराठी माणसाच्या अस्मितेचा होता.
1973 सालची गोष्ट आहे. त्यावेळी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष असलेल्या शेषराव वानखेडे यांनी सर्व आमदारांना घेऊन एक चॅरिटी क्रिकेट मॅच खेळायचा निर्णय घेतलेला. अर्थातच त्यांच्या डोक्यात सामन्याचे ठिकाण होते ब्रेबॉर्न स्टेडियम. याच सामन्याची परवानगी घेण्यासाठी वानखेडे आणि काही आमदार पोहोचले सीसीआय अर्थात क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष विजय मर्चंट यांच्याकडे. चहापानानंतर वानखेडे यांनी जसा सामन्याचा विषय काढला तसे मर्चंट संतापले आणि त्यांनी स्टेडियम मिळणार नाही असे म्हटले. महाराष्ट्रातीलच आमदारांना महाराष्ट्रातील स्टेडियम एक दिवसासाठी देत नाहीत, ही गोष्ट सर्वांच्या मनाला लागली. त्यावेळी वानखेडे बोलून गेले, “तुम्ही स्टेडियम दिले नाही तर आम्ही नवे स्टेडियम बनवू”. त्यावर मर्चंट यांची आलेली प्रतिक्रिया अत्यंत अवाक् करणारी होती. ते थेट सर्वांच्या तोंडावर म्हणाले, “तुम घाटी लोग क्या स्टेडियम बनाओगे?”
बस इथेच वानखेडे यांचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्यांनी मुंबईतच नवे क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा चंग बांधला. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनी मुंबईच्या पोस्ट एरियात 13 एकर जमीन देऊ केली आणि नव्या स्टेडियमची पायाभरणी झाली. स्वतः वानखेडे या सर्व कामात जातीने लक्ष देत होते. स्टेडियम बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळी केवळ 28 वर्षांच्या असलेल्या शशी प्रभू याच मराठमोळ्या इंजिनिअरकडे. वानखेडे आणि प्रभू या जोडीने फक्त अकरा महिने आणि 23 दिवसात ब्रेबॉर्नपेक्षा भव्यदिव्य स्टेडियम बांधून तयार केले. सर्वानुमते या स्टेडियमला शेषराव वानखेडे यांचेच नाव दिले गेले. वानखेडे स्टेडियम तयार झाले आणि तिकडे ब्रेबॉर्नचे महत्व कमी झाले. मराठी माणसाचा इगो हर्ट झाल्यानंतर काय होतं याचं हे प्रतीक म्हणावं लागेल.
1975 ला भारत आणि वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान या स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. या सामन्यावेळी वेस्ट इंडीजच्या क्लाइव्ह लॉईड यांना भेटण्यासाठी मैदानात आलेल्या चाहत्याला पोलिसांनी मारहाण केल्यानंतर, जमावाने काही काळ सामना बंद पाडलेला. या मैदानावरील ही कदाचित एकमेव कटू आठवण असावी. कारण, यानंतर या मैदानावर जे काही घडत गेलं, ते फक्त आणि फक्त इतिहासात नोंद होत राहील.
गावसकरांनंतर कोट्यावधी भारतीयांच्या अपेक्षांचे ओझे वाहणारा सचिन तेंडुलकर याच मैदानावर तयार झाला. मागच्या पिढीतील जवळपास सर्वच मुंबईकर खेळाडूंनी याच मैदानावर क्रिकेटचे धडे गिरवले. वानखेडेच्या याच फेमस लाल मातीच्या पिचवर अशा काही खेळ्या खेळल्या गेल्या जा चिरकाल स्मरणात राहिल्या. रणजी मॅचमध्ये रवी शास्त्रींचे सहा सिक्स असो, नाहीतर इयान बॉथम यांचा गोल्डन जुबली टेस्टमधील परफॉर्मन्स..
यानंतर 2011 मध्ये वानखेडे स्टेडियम हे नाव भारतीयांच्या हृदयाशी अगदीच कनेक्ट झालं. वर्ल्डकपसाठी स्टेडियमच रेनोवेशन झाल्यानंतर असं काही देखणं रूप, स्टेडियमला आलं की पाहणारा फक्त पाहतच बसतो. ज्याने दोन दशक भारतीय क्रिकेट आपल्या संघावर जोपासलं त्या सचिनला आपल्या याच घरच्या मैदानावर वर्ल्डकपची भेट टीम इंडियाने दिली. वानखेडेवर रंगलेली ती फायनल, धोनीचा विजयी सिक्स आणि मुंबईकरच असलेल्या रवी शास्त्रींचे “धोनी फिनिशेस ऑफ इन स्टाईल…” हे शब्द भारतीयांच्या अंगावर अक्षरशः शहारे आणतात. तब्बल 28 वर्षानंतर भारत विश्वविजेता बनला ज्याचा साक्षीदार होण्याचा मान वानखेडे स्टेडियमला मिळाला. कहर म्हणजे याच स्टेडियमच्या एका स्टॅंडमध्ये बसणाऱ्या चाहत्यांनी एक ट्विटर हॅंडल बनवलं. त्याचं नाव नॉर्थ स्टॅंड गॅंग. त्याला जवळपास 18 हजार फॉलोवर्स आहेत.
आता सुरू होत असलेल्या वर्ल्डकपमध्ये देखील मुंबईच्या वाट्याला 5 दर्जेदार सामने आलेत. 2011 फायनल खेळलेले भारत आणि श्रीलंका पुन्हा एकदा इथेच आमने-सामने येतील. तर इंग्लंड-दक्षिण आफ्रिकेचा हाय-वोल्टेज सामनाही याच मैदानावर खेळला जाणार आहे. 12 वर्षांपूर्वी एमएस धोनीने जसा वानखेडेवर वर्ल्ड कप उंचावला तशी संधी रोहितला आपल्या होम ग्राऊंडवर मिळणार नाही. मात्र, अहमदाबादचे त्याचे व टीम इंडियाचे तिकिट टू फिनाले कदाचित इथे होणाऱ्या सेमी फायनलमधूनच पक्के होईल.
(2023 ODI World Cup Stadiums Wankhede Stadium History)
विश्वचषक विशेष-
वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय
बॅटिंग ते बॉलिंग, बेन स्टोक्सने 2019च्या वर्ल्डकपमध्ये केलेला कहर; World Cup 2023मध्ये वाढणार इंग्लंडची ताकद
किस्से वर्ल्डकपचे: आणि मलिंगाचे ‘ते’ चार चेंडू इतिहासात अजरामर झाले
किस्से वर्ल्डकपचे: गप्टिलचा थ्रो स्टम्पसवर नव्हेतर भारतीयांच्या हृदयावर लागलेला