क्रिकेटचे सर्वात दिर्घ स्वरूप म्हणून कसोटी क्रिकेटकडे पाहिले जाते. पाच दिवसांचा कसोटी सामना दोन दिवसात संपला तर, अनेकांना आश्चर्य वाटते. तसे, क्रिकेटच्या इतिहासात अशा संधी क्वचितच आल्या आहेत. २२ वर्षांपूर्वी, १८ ऑगस्ट रोजी एक सामना अशाच पद्धतीने दोन दिवसात संपला होता. या सामन्यात अवघ्या २ दिवसात ३० गडी बाद होऊन सामन्याचा निकाल लागला होता. हा सामना कसोटी इतिहासातील सर्वात लहान सामन्यांपैकी एक मानला जातो.
असा रंगला सर्वात लहान कसोटी सामना
बरोबर २१ वर्षांपूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यादरम्यान हा सर्वात लहान कसोटी सामना हेडिंग्ले येथे रंगला. या सामन्यात पाहुण्या वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, वेस्ट इंडिजचा कर्णधार जिमी अॅडम्सचा हा निर्णय योग्य ठरला नाही. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ अवघ्या १७२ धावांवर संपुष्टात आला. रामनरेश सरवान याने वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक ५९ धावा केल्या. इंग्लंडसाठी वेगवान गोलंदाज क्रेग व्हाइटने ५ बळी घेतले. त्याच्याशिवाय डॅरेन गफने ३ आणि डॉमिनिक कॉर्कने २ बळी आपल्या नावे केले. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ केवळ ४७.४ षटके खेळू शकला.
प्रत्युत्तरात इंग्लिश संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपताना ५ बाद १०५ धावा केल्या. दुसऱ्या दिवशी (१८ ऑगस्ट) खेळ सुरू झाला आणि इंग्लंडचा संपूर्ण संघ २७२ धावांवर सर्वबाद झाला. मायकेल वॉनने ७६ आणि ग्रीम हिकने ५९ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून कर्टली अॅम्ब्रोस आणि कर्टनी वॉल्श यांनी प्रत्येकी ४ बळी आपल्या नावे केले.
वेस्ट इंडीजची दुसऱ्या डावात हाराकिरी
वेस्ट इंडिजचा दुसरा डाव पहिल्या डावाप्रमाणेच कोसळला. ऍण्ड्रू कॅडिक आणि डॅरेन गफ यांनी वेस्ट इंडीजचा दुसरा डाव २६.२ षटकांत केवळ ६१ धावांवर आटोपला आणि यजमान संघाने एक डाव आणि ३९ धावांनी सामना आपल्या नावे केला. कॅडिकने ११.२ षटकांत १४ धावा देऊन ५, तर गफने ३० धावांत ४ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. कॅडिकने एकाच षटकात ४ बळी मिळवलेले. सामन्याच्या दोन्ही दिवशी प्रत्येकी १५ गडी बाद झाले. इंग्लंडने १९६६ नंतर प्रथमच वेस्ट इंडिजचा डावाच्या फरकाने पराभव केला.
याच मैदानावर होणार तिसरा सामना
सध्या सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत कसोटी मालिकेतील तिसरा सामना याच हेडिंग्ले ओव्हलच्या मैदानावर खेळला जाणार आहे. २५ ऑगस्टपासून हा सामना खेळला जाईल. भारतीय संघाने लॉर्ड्स कसोटी जिंकत पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘लॉर्ड्स’चा लॉर्ड बनला ब्रॉड! ‘ती’ आगळीवेगळी कामगिरी करणारा अँडरसननंतर केवळ दुसराच गोलंदाज
पंजाब किंग्स देणार कुंबळेला नारळ? मुख्य प्रशिक्षक म्हणून ही नावे चर्चेत
हरवल झिम्बाब्वेला, घाव पाकिस्तानच्या जिव्हारी! एकाच विजयासह टीम इंडियाचा ‘डबलवार’






