कसोटी क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अमर्यादित षटकांचे स्वरुप आहे. अशात कसोटी क्रिकेटच्या इतिहासात खेळल्या गेलेल्या जवळपास २३००पेक्षा जास्त सामन्यांमध्ये कित्येक फलंदाजांनी मोठ्या खेळी खेळल्या आहेत. फलंदाज कित्येक तास मैदानावर टिकून राहतात आणि अधिक धावा करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान त्यांना अनेक चेंडूंचा सामना करावा लागतो.
पण, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत फक्त असे तीनच फलंदाज होऊन गेले आहेत, ज्यांनी एका डावात तब्बल ७००पेक्षा जास्त चेंडूंचा सामना केला आहे. या लेखात आपण त्या ३ फलंदाजांची नावे जाणून घेणार आहोत, ज्यांनी हा अनोखा विक्रम नोंदवला आहे- 3 Batsman Who Faced More Than 700 Balls In One Test Inning
१. सर लेन हटन (धावा- ३६४, चेंडू- ८४७)
कसोटी सामन्यातील एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करण्याचा विक्रम इंग्लंडचे माजी सलामीवीर फलंदाज सर लेन हटन यांच्या नावावर आहे. ऑगस्ट १९३८मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या ५व्या कसोटी सामन्यात हटन यांनी ३६४ धावांची त्रिशतकी खेळी केली होती. दरम्यान त्यांनी सर्वाधिक ८४७ चेंडूंचा सामना केला होता. हटन हे कसोटीच्या एका डावात ८००पेक्षा जास्त चेंडू खेळणारे जगातील एकमेव फलंदाज आहेत. त्यांनी ४२.९७च्या स्ट्राईक रेटने ३५ चौकार मारत एवढ्या धावा केल्या होत्या.
हटन यांच्या त्रिशतकी खेळीमुळे इग्लंडने तो सामना एका डावाच्या आघाडीवर आणि ५७९ धावांनी जिंकला होता. १९३७ ते १९५५ या काळात हटन यांनी कसोटीत ७९ सामन्यात ६९७१ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या १९ शतकांचा आणि ३३ अर्धशतकांचा समावेश होता. शिवाय, त्यांनी ३ विकेट्सदेखील घेतल्या होत्या.
२. ग्लेन टर्नर (धावा- २५९, चेंडू- ७५९)
कसोटी क्रिकेटच्या एका डावात ७००पेक्षा जास्त चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसरे नाव येते ग्लेन टर्नर यांचे. एप्रिल १९७२मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड संघांमध्ये झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या टर्नर यांनी हा कारनामा केला होता. या सामन्यातील न्यूझीलंडच्या पहिल्या डावात सलामीला फलंदाजी करताना टर्नर यांनी ७५९ चेंडूंचा सामना करत २५९ धावा केल्या होत्या. यात त्यांनी ३४.१२च्या स्ट्राईक रेटने मारलेल्या २२ चौकारांचा समावेश होता. यासह टर्नर हे कसोटीच्या एका डावात सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारे दुसरे फलंदाज ठरले. तो सामना अनिर्णीत राहिला होता.
गमतीचा भाग म्हणजे टर्नर यांनी वनडेत एकदा २०१ तर एकदा १७७ चेंडूंचा सामना केला आहे. वनडे डावात सर्वाधिक चेंडू खेळणाऱ्या फलंदाजांत ते पहिल्या दोन स्थानावर आहेत.
१९६९ ते १९८३ मध्ये टर्नर यांनी कसोटीत ४१ सामने खेळत २९९१ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या ७ शतकांचा आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता.
३. बॉब सिम्पसन (धावा- ३११, चेंडू- ७४३)
कसोटीच्या एका डावात ७०० चेंडूंचा सामना करणारे तिसरे फलंदाज हे ऑस्ट्रेलियाचे बॉब सिम्पसन हे आहेत. त्यांनी जुलै १९६४मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करताना तब्बल ७४३ चेंडू खेळले होते. यावेळी ४१.८५च्या स्ट्राईक रेटने त्यांनी २३ चौकार आणि १ षटकार मारत ३११ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे, त्या सामन्यात सिम्पसन हे ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधार होते. तो सामना अनिर्णीत राहिला होता.
सिम्पसन यांनी १९५७ ते १९७८ या काळात ६२ कसोटी सामने खेळत ४८६९ धावा केल्या होत्या. यात त्यांच्या १० शतकांचा आणि २७ अर्धशतकांचा समावेश होता. शिवाय त्यांनी कसोटीत ७१ विकेट्सही घेतल्या होत्या.
ट्रेंडिंग लेख-
करियरमधील पहिल्याच वनडे सामन्यात हॅट्रिक विकेट्स घेणारे ३…
सर्वाधिक वेळा वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारे ५ संघ
वनडे कर्णधार असताना समोरच्या संघाला जबरदस्त धुणारे ५…