वनडे क्रिकेटमध्ये आजपर्यंत तब्बल २८ संघांनी एकतरी सामना खेळला आहे. तर यातील १४ देश असे आहेत ज्यांनी १०० पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. यातील काही देशांना अगदी अलिकडे वनडे क्रिकेटची मान्यता मिळाली आहे.
वनडे क्रिकेट खेळलेल्या २८ देशांतून २६११ खेळाडूंनी एकतरी सामना खेळला आहे परंतु यातील केवळ ४०१ खेळाडूंनी वनडेत एकतरी शतक केले आहे.
असे असले तरी २६११ वनडे खेळलेल्या खेळाडूंमध्ये केवळ ३ खेळाडू असे आहेत ज्यांनी २८ देशांपैकी ११ देशांविरुद्ध शतकी खेळी केल्या आहेत.
३. सचिन तेंडूलकर
भारतीय संघाचा माजी कर्णधार मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने वनडेत ४९ शतके केली आहेत. तो वनडेत सर्वाधिक शतके करणारा खेळाडू आहे. हे आता क्रिकेटप्रेमींना माहित आहे. परंतु सचिनने वनडेत तब्बल ११ देशांविरुद्ध शतकी खेळी केल्या आहेत हे फारच कमी क्रिकेटप्रेमींना माहित आहे.
सचिनने आपला शेवटचा वनडे सामना बांगलादेशमध्ये आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला. त्याआधी याच स्पर्धेत सचिनने वनडेतील ४९वे तर आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १००वे शतक करताना एक खास कारनामा केला होता. बांगलादेशविरुद्ध केलेल्या शतकामुळे त्याने वनडेत ११ संघाविरुद्ध शतकी खेळी करण्याचा कारनामा केला होता. सचिनचा हा विक्रम त्याच्या ४६२व्या वनडे सामन्यात झाला होता.
सचिनने वनडेत शतकी खेळी या देशांविरुद्ध केल्या आहेत- ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, केनिया, नामेबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज व झिंबाब्वे
२. हशिम आमला-
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार व महान फलंदाज हशिम आमलाने केवळ १८१ वनडे सामन्यांतच हा कारनामा केला आहे. त्याने आपल्या २७ शतकांमध्ये ११ देशांविरुद्ध या शतकी खेळी केल्या आहेत.
२०१५मध्ये अमलाने मनुका ओव्हल येथे विश्वचषकात शतकी खेळी करत आयर्लंडविरुद्ध विश्वचषकात शतकी खेळी करत हा कारनामा केला.
अमलाने वनडेत शतकी खेळी या देशांविरुद्ध केल्या आहेत- ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, आयर्लंड, नेदरलॅंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज व झिंबाब्वे
१. ख्रिस गेल-
२०१९मध्ये वेस्ट इंडिज संघाला पात्रता फेरीतून विश्वचषकासाठी पात्र व्हावे लागले. यावेळ युनिवर्सल बाॅस म्हणून ओळख असलेल्या ख्रिस गेलने २०१८मध्ये विश्वचषक पात्रता फेरीत संयुक्त अरब अमिराती संघाविरुद्ध ९१ चेंडूत १२३ धावांची खेळी केली होती.
त्याची ही वनडेतील ११व्या देशाविरुद्धची शतकी खेळी होती. याबरोबर तो देखील या खास विक्रमात सामील झाला.
गेलच्या विक्रमाची खासियत म्हणजे त्याला कधीही वनडेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतकी खेळी करता आली नाही. तरीही त्याने हा कारनामा केला आहे.
गेलने वनडेत शतकी खेळी या देशांविरुद्ध केल्या आहेत- बांगलादेश, कॅनडा, इंग्लंड, भारत, केनिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, युएई व झिंबाब्वे
कसोटी खेळणाऱ्या १२ देशांपैकी भारत सोडून विराटने केवळ अफगाणिस्तान व आयर्लंडविरुद्ध शतकी खेळी केलेली नाही. त्याने कसोटी खेळणाऱ्या अन्य ९ देशांविरुद्ध शानदार वनडे शतके केली आहे. त्यामुळे त्याला हा विक्रम करण्याची संधी आहे.