क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते. कसोटी क्रिकेट असो किंवा वनडे असो किंवा टी२० असो कोणताही प्रकार पाहिला तरी संघाला विजयी करण्यासाठी छोटेखानी पण सर्वात महत्त्वपूर्ण खेळी करणारे खेळाडू नेहमीच एक वेगळीच छाप सोडतात. अंतिम क्षणी मिळालेली संधी साधत हे खेळाडू संघासाठी हिरो ठरतात.
या लेखातही अशा ३ खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी सामन्यात केवळ १२ पेक्षाही कमी चेंडूंचा सामना करुनही सामनावीराचा पुरस्कार मिळवला. सामनावीर पुरस्कार हा सामन्यात संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूंचा सामना करुनही सामनावीर पुरस्कार मिळवणारे ३ खेळाडू –
३. जोस बटलर – १० चेंडूत नाबाद ३२ धावा
इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर हा नेहमीच आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. त्याने आत्तापर्यंत अनेक आक्रमक खेळी केली आहे. त्यातील एक म्हणजे २०१२ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बर्मिंगघम येथे झालेल्या टी२० सामन्यात केलेली १० चेंडूंतील नाबाद ३२ धावांची खेळी. तो सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ११-११ षटकांचा करण्यात आला होता. त्यावेळी प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून ९ व्या षटकात बटलर ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. त्याने त्यावेळी तुफानी फटकेबाजी करताना २ चौकार आणि ३ षटकार मारत १० चेंडूत नाबाद ३२ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडने ११ षटकात ११८ धावा करत दक्षिण आफ्रिकेला ११९ धावांचे आव्हान दिले. पण दक्षिण आफ्रिकेला ११ षटकात ५ बाद ९० धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने २८ धावांनी तो सामना जिंकला. त्या सामन्यासाठी बटलरला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
२. मोईन अली – ११ चेंडूत ३९ धावा
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू मोईन अलीने फलंदाजी करताना अनेकदा अविस्मरणीय खेळी केल्या आहेत. पण त्याने फेब्रुवारी २०२० ला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच केलेली तुफानी खेळीची चांगली चर्चा झाली होती. त्याने डर्बनला झालेल्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाकडून ११ चेंडूत ३९ धावा केल्या होत्या. तो या सामन्यात १६ व्या षटकात ७ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला होता. फलंदाजीसाठी आल्यानंतर त्याने फटकेबाजी करण्यास सुरुवात केली त्याने ही खेळी करताना ३ चौकार आणि ४ षटकार मारले. अखेर त्याला लुंगी एन्गिडीने बाद केले. पण त्याच्या फटकेबाजीमुळे इंग्लंडला २० षटकात २०४ धावा करता आल्या होत्या. त्यानंतर २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला २० षटकात ७ बाद २०२ धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने हा सामना केवळ २ धावांनी जिंकला. या सामन्यानंतर अलीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
१. दिनेश कार्तिक – ८ चेंडूत नाबाद २९ धावा
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे नाव घेतले की सध्या सर्वांना २०१८ ला झालेल्या निदाहास ट्रॉफीचा अंतिम सामना आठवतो. भारतीय संघाने बांगलादेश संघाला अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभूत करत निदाहास टी२० ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले होते. त्या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने षटकार खेचत भारताला हे विजेतेपद मिळवून दिले होते. या सामन्यात बांग्लादेशने भारतासमोर विजयासाठी २० षटकात १६७ धावांचे आव्हान ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिनेश भारताला १२ चेंडूत ३४ धावांची गरज होती तेव्हा फलंदाजीला आला होता. त्याने विजय शंकरला हाताशी घेत ३ षटकार आणि २ चौकारांसह ८ चेंडूत नाबाद २९ धावा केल्या होत्या. मात्र शंकर(१७) शेवटच्या षटकाच्या ५ व्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे भारतासमोर विजयासाठी १ चेंडू ५ धावा असे समीकरण उभे राहिले होते. या चेंडूवर दिनेशने षटकार खेचून भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे त्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार दिनेशला दिला होता.
ट्रेंडिंग लेख –
अबब! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५००० पेक्षा जास्त धावा करणारे टॉप ५ खेळाडू
भारताला वनडे क्रिकेटमध्ये ‘नको नको’ करणारे ३ संघ, एक संघ आहे आशियाई
बॉलिवूड फिल्ममध्ये आपलीच भूमिका निभावणारे ३ भारतीय खेळाडू