क्रिकेटमध्ये जसे फलंदाज आणि गोलंदाज महत्त्वाचे असतात तसेच अष्टपैलू क्रिकेटपटू महत्त्त्वाचे असतात. अष्टपैलू खेळाडू फलंदाजी आणि गोलंदाजी करत असल्याने संघाला समतोल साधून देतात. आत्तापर्यंत भारतीय क्रिकेट संघाकडूनही अनेक अष्टपैलू क्रिकेटपटू खेळले आहेत. त्यांनी भारतीय संघाला मोठे विजय मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
या लेखातही कसोटी क्रिकेटमध्ये दबरदस्त अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या ३ खेेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम अष्टपैलू कामगिरी करणारे ३ भारतीय क्रिकेटपटू (3 Best Indian all-rounders of in Indian Test) –
१. विनू मंकड –
कसोटी क्रिकेटमध्ये विनू मंकड यांनी अनेकदा त्यांच्या अष्टपैलू कामगिरीने कमाल केली आहे. त्यांनी १९४६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये वर्चस्व नव्हते. पण त्यावेळीही मंकड यांनी त्यांच्या अष्टपैलू खेळाने सर्वांना प्रभावित केले होते.
त्यांनी १९५२ ला इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या कसोटीत पहिल्या डावात ७२ धावा केल्या होत्या. तसेच ५ विकेट्सही घेतल्या होत्या. त्याचबरोबर दुसऱ्या डावात त्यांनी १८४ धावांची दिडशतकी खेळी केली होती.
त्यांनी १९५६ ला एकदा न्यूझीलंड विरुद्ध चेन्नई येथे पंकज रॉय बरोबर ४१३ धावांची सलामीला भागीदारी केली होती. तसेच ४ विकेट्सही घेतल्या होत्या. त्या सामन्यात त्यांनी २३१ धावांची खेळी केली होती. एवढेच नाही तर त्याच मालिकेतील दुसऱ्या कसोटीत मुंबई येथे त्यांनी २२३ धावांची खेळी केली होती. त्या सामन्यातही त्यांनी ४ विकेट्स घेतल्या होत्या.
मंकड यांनी त्यांच्या कारकिर्दीत ४४ कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्यांनी ३१.४७ च्या सरासरीने २१०९ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यांच्या ५ शतकांचा आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर गोलंंदाजी करताना त्यांनी ३२.३२ च्या सरासरीने १६२ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्यांनी एका डावात ८ वेळा ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत. तसेच एका सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी त्यांनी २ वेळा केली आहे.
२. कपिल देव –
भारताचे दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव यांनीही अनेकदा त्यांच्या कामगिरीने भारतीय संघाला संकटातून बाहेर काढले आहे. त्यांनी अनेकदा तळातील फळीत फलंदाजी करताना महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. तर गोलंदाजीनेही त्यांनी कमाल केली आहे.
१९९० ला कपिल देव यांनी इंग्लड विरुद्ध लॉर्ड्समध्ये ४ चेंडूत ४ षटकार खेचून भारताला फॉलोऑन पासून वाचवले होते. भारताला फॉलोऑन टाळण्यासाठी २४ धावांची गरज होती आणि हातात केवळ १ विकेट होती. त्यावेळी कपिल देव यांनी एडी व्हेंमिंग्स या गोलंदाजाला ४ चेंडूत सलग ४ षटकार ठोकले. विशेष म्हणजे त्याच्या पुढच्याच चेंडूवर नरेंद्र हिरवाणी बाद झाले होते.
त्यांनी कसोटीमध्ये १३१ कसोटी सामने खेळले असून ३१.०५ च्या सरासरीने ८ शतके आणि २७ अर्धशतकांसह ५२२८ धावा केल्या आहेत. तसेच त्यांनी ४३४ विकेट्स घेतल्या आहेत. ते कसोटीमध्ये ५००० पेक्षा अधिक धावा आणि ४०० पेक्षा अधिक विकेट्स घेणारे एकमेव क्रिकेटपटू आहेत.
३. आर अश्विन –
सध्या भारतीय कसोटी संघाचा नियमित सदस्य असलेल्या आर अश्विननेही अनेकदा अष्टपैलू कामगिरी केली आहे. प्रामुख्याने फिरकी गोलंदाज असलेल्या अश्विनच्या नावावर कसोटीत ४ शतके आहेत. तो सध्या आयसीसीच्या कसोटी क्रिकेटमधील अष्टपैलू क्रिकेटपटूंच्या क्रमवारीतही ५ व्या क्रमांकावर आहे.
त्याने त्याच्या कारकिर्दीतील तिसराच कसोटी सामना खेळताना वेस्ट इंडिजविरुद्ध १०३ धावांची शतकी खेळी केली होती आणि ९ विकेट्सही घेतल्या होत्या.
त्याने आत्तापर्यंत ७१ कसोटी सामने खेळले असून यामध्ये २८.१० च्या सरासरीने २३८९ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ३६५ विकेट्स घेतल्या आहेत. यामध्ये त्याने २७ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. तर ७ वेळा त्याने कसोटी सामन्यात १० किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
–वनडे पदार्पणाच्या सामन्यातच ५ मेडन ओव्हर टाकणारे ५ गोलंदाज
हा स्टाईलीश खेळाडू, जो होऊ शकतो भारताचा पुढचा धोनी
सलमान खान की एमएस धोनी? केदार जाधवने दिलं हे उत्तर