विराट कोहली सध्या जगातील प्रथम क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याची फलंदाजी क्रिकेटच्या तिन्ही स्वरूपात झळकताना दिसते. त्याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. तो ज्या प्रकारे खेळत आहे, जर त्याने असेच सुरु ठेवले तर एक दिवस क्रिकेट जगातील प्रत्येक विक्रम त्याच्या नावावर होईल.
फलंदाज विराट कोहलीला बाद करणे फार कठीण आहे. असे बरेच गोलंदाज आहेत ज्यांचे विराट कोहलीला बाद करण्याचे स्वप्न आहे. इतक्या मोठ्या फलंदाजाची विकेट मिळवणे हे गोलंदाजाचे स्वप्न असते. काही यात यशस्वी होतात आणि काही बाद करण्यास अपयशी ठरतात.
परंतु, असे बरेच गोलंदाज आहेत ज्यांनी विराट कोहलीला बर्याच वेळा बाद केले आहे. या गोलंदाजांनी आतापर्यंत भारतीय कर्णधारला आपला बळी बनवले आहे. या लेखात त्या ३ गोलंदाजांविषयी जाणून घेऊ ज्यांच्याविरूद्ध विराट कोहली सर्वाधिक वेळा बाद झाला आहे.
३. जेम्स अँडरसन (James Anderson) – विरूद्ध ८ वेळा
इंग्लंडचा कसोटीतील शानदार गोलंदाज जेम्स अँडरसनने आपल्या कारकीर्दीत विराट कोहलीला खूप त्रास दिला आहे. भारतीय कर्णधार विरुद्ध जेम्स अँडरसनची एकूण सरासरी ३१.३८ आहे. जेम्स अँडरसन आणि विराट कोहली यांनी एकमेकांविरुद्ध १७ कसोटी सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ वेळा विराट कोहलीला जेम्स अँडरसनने बाद केले. यापैकी ४ वेळा जेम्स अँडरसनने २०१४ च्या मालिकेतच विराट कोहलीला बाद केले.
याशिवाय जेम्स अँडरसनने १२ वनडे सामन्यात विराट कोहलीला ३ वेळा बाद केले आहे. अँडरसनने विराट कोहलीला वनडे सामन्यात केवळ २६ धावा करण्याची संधी दिली. २०११ मध्ये ओव्हलमध्ये कोहलीला प्रथम अँडरसनने बाद केले होते.
२. ग्रॅमी स्वान (Graeme Swann) – विरूद्ध ८ वेळा
इंग्लंडचा माजी दिग्गज फिरकीपटू ग्रॅमी स्वान विराट कोहलीविरुद्धचा सर्वात यशस्वी फिरकीपटू आहे. त्याने आपल्या कारकीर्दीत ८ वेळा भारतीय कर्णधाराला बाद केले. मात्र, त्याची सरासरी विराट कोहलीविरुद्ध १६.२५ अशी होती.
ग्रॅमी स्वानने विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये ३ वेळा बाद केले आणि यावेळी त्यांची सरासरी केवळ २०.६७ आहे. तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये स्वानने आणखी धोकादायक गोलंदाजी केली आहे. त्याने वनडे सामन्यात कोहलीला ४ वेळा आणि टी-२० मध्ये ३ वेळा बाद केले आहे.
१. टिम साऊदी (Tim Southee) – विरूद्ध १० वेळा
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिम साऊदी विराट कोहलीला बाद करण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत त्याने १० वेळा भारतीय कर्णधाराला बाद केला आहे. टिम साऊदीने विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमधील ५ सामन्यात ३ वेळा बाद केले, तर वनडे क्रिकेटमध्ये त्याने १२ सामन्यात ६ वेळा कोहलीची शिकार केली आहे. जर टी-२० क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर कोहली १ वेळा साऊदीविरूद्ध बाद झाला होता.