गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांनी कसोटी क्रिकेटमध्ये एकाहून एक रोमांचक सामने पाहिले आहेत आणि त्यामागील सर्वात मोठे कारण गोलंदाजांची उत्कृष्ट कामगिरी आहे. गोलंदाजांकडे या प्रकारात फलंदाजांना तंबूत पाठविण्याची पुरेशी संधी असते. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतही बर्याच गोलंदाजांनी उत्तम कामगिरी बजावली असून रविचंद्रन अश्विन सर्वाधिक ७१ बळी मिळून प्रथम क्रमांकावर आहे. याउलट असेही बरेच गोलंदाज होते, जे सर्वाधिक विकेट्स घेण्यात अपयशी ठरले. परंतु त्यांना हॅट्रिक घेण्यात यश आले. या लेखात आम्ही ३ गोलंदाजांचा उल्लेख करणार आहोत, ज्यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हॅट्रिक घेतली आहे.
१. केशव महाराज- विरुद्ध वेस्ट इंडिज २०२१
दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराजने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजविरूद्ध हॅट्रिक घेण्याचा पराक्रम केला होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेच्या दुसर्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजसमोर ३२४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. तीन विकेट गमावल्यामुळे आधीच वेस्ट इंडीजचा संघ अडचणीत सापडला होता आणि केशवने हॅट्रिक घेत त्यांच्या अडचणी अजून वाढवल्या होत्या.
डावाचा ३७ व्या षटकात गोलंदाजी करण्यास आलेल्या केशवने षटकातील तिसर्या चेंडूवर पॉवेलला, चौथ्या चेंडूवर होल्डर आणि पाचव्या चेंडूवर जोशुआ डा सिल्वा यांना बाद करून आपली हॅट्रिक पूर्ण केली आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली होती.
२. नसीम शाह- विरुद्ध बांगलादेश, २०२०
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम हा बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात हॅट्रिक घेऊन २०२० मध्ये कसोटी सामन्यात हॅट्रिक घेणारा सर्वात युवा गोलंदाज ठरला. त्याने गेल्यावर्षी रावळपिंडी कसोटीच्या दुसर्या डावात सलग तीन चेंडूत बांगलादेशचे तीन फलंदाज नाझमुल हुसेन शान्टो, तैजुल इस्लाम आणि महमूदुल्ला यांना बाद करून हॅट्रिक पूर्ण केली. शान्तो आणि इस्लाम पायचित झाले, तर महमूदुल्लाहने सोहेलचा झेल पकडत नसीमची हॅट्रिक पूर्ण करण्यात योगदान दिले होते. नसीमने सामन्याच्या चौथ्या डावातील ४१ व्या षटकात हा पराक्रम केला होता.
३. जसप्रीत बुमराह- विरुद्ध वेस्ट इंडीज, २०१९
भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज होता. २०१९ मध्ये वेस्ट इंडिज दौर्यादरम्यान बुमराहने ही कामगिरी केली होती. बुमराहने दुसर्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावात अप्रतिम गोलंदाजीसह विरोधी संघाचा फलंदाजीचा क्रम उध्वस्त केला होता. बुमराहने पहिल्या डावातील नवव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर डॅरेन ब्राव्होला आपला बळी बनवले. पुढच्या चेंडूवर ब्रूकस खाते न उघडताच पायचित बाद झाला. यानंतर त्याने रोस्टन चेझला बाद करुन पॅव्हेलियनचा मार्ग दाखविला होता. परंतू हाच बुमराह न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यात मात्र फ्लॉप ठरला.
महत्वाच्या बातम्या
गोलंदाजीत हातखंडा असलेल्या चाहरने केला फलंदाजीचा सराव; म्हणाला, ‘शाळेचे दिवस आठवले’
भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक लढतीनंतर टीम पेनने चाहत्यांनी मागितली क्षमा, पाहा काय आहे प्रकरण
काय शॉट खेळलाय! गोलंदाजाने चेंडू टाकताच फलंदाजाने फिरून मारला रिव्हर्स स्वीप षटकार