इंडियन प्रीमीयर लीग (आयपीएल) ही जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय टी२० लीग आहे. जगातील वेगवेगळ्या देशातील खेळाडूंचा सहभाग, ही आयपीएलची विशेषता आहे.
२००८ साली आयपीएलची सुरुवात झाली. तेव्हा अनेक देशातील खेळाडूंनी आयपीएलमध्ये त्यांचा सहभाग नोंदवला होता. अगदी भारताचा कट्टर विरोधी असणाऱ्या पाकिस्तान संघातील खेळाडूही पहिल्या हंगामात आयपीएलमध्ये सहभागी झाले होते. परंतु, त्याचवर्षी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. त्यामुळे राजनैतिक संबंधासह भारत-पाकिस्तान देशातील क्रिकेट संबंधदेखील बिघडले. अर्थातच बीसीसीआयने पाकिस्तानी खेळाडूंच्या आयपीएल सहभागावर कायमची बंदी घातली.
असे असले तरी, पाकिस्तानी मूळ असलेले म्हणजेच पाकिस्तानमध्ये जन्मलेले पण इतर देशाकडून क्रिकेट खेळणारे खेळाडू, आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकतात. आयपीएलच्या तेराव्या हंगामातही पाकिस्तानी मूळ असलेले ३ खेळाडू आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत. या लेखात, आपण त्याच ३ खेळाडूंविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
पाकिस्तानी मूळ असलेले तीन खेळाडू, जे दिसतील आयपीएल २०२०मध्ये खेळताना (3 Cricketers Born In Pakistan Will Be Seen In IPL 2020) –
इमरान ताहिर (Imran Tahir)
चेन्नई सुपर किंग्स संघाचा फिरकीपटू इमरान ताहिर याचा जन्म २७ मार्च १९७९ रोजी पाकिस्तानच्या लाहोर येथे झाला होता. ताहिर विश्वविजेत्या १९ वर्षांखालील पाकिस्तान क्रिकेट संघाचा भाग होता. परंतु, पाकिस्तानच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून त्याला संधी न मिळाल्यामुळे त्याने दक्षिण आफ्रिका देशाचे नागरिकत्त्व स्विकारले.
फेब्रुवारी २०११ साली त्याने दक्षिण आफ्रिका वनडे संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून तो दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी करत आहे. आजवर ताहिरने दक्षिण आफ्रिकाकडून १०७ वनडे, ३८ टी२० आणि २० कसोटी सामने खेळले आहेत. याव्यतिरिक्त तो २०१४पासून आयपीएलचा भाग आहे. आतापर्यंत या गोलंदाजाने आयपीएलमध्ये ५५ सामने खेळत ७९ विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात ताहिर त्याच्या फिरकी गोलंदाजीने मोठ-मोठ्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवताना दिसेल. तो यावर्षी चेन्नई सुपर किंग्स संघाचा भाग आहे.
अली खान (Ali Khan)
अली खान नुकताच आयपीएलच्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघात सामील झाला आहे. केकेआरचा वेगवान गोलंदाज हॅरी गर्नी हा खाद्यांच्या दुखापतीमुळे आयपीएलमध्ये खेळणार नाही. त्याच्याजागी केकेआरने अमेरिकेचा वेगवान गोलंदाज अली खानला संघात स्थान दिले आहे.
अली खानचा जन्म १३ डिसेबंर १९९०ला पाकिस्तानच्या पंजाब प्रातांत झाला होता. त्याने पाकिस्तानच्या गल्लीमध्ये क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. पण पुढे त्याचे कुटुंब अमेरिकेत स्थायी झाले. तिथे गेल्यानंतर फेसबुकद्वारे पहिल्यांदा अली खानला अमेरिकेत एक क्रिकेट टूर्नामेंट खेळण्यासाठी बोलवण्यात आले होते.
या टूर्नामेंटमध्ये अली खानने शानदार प्रदर्शन केले. तेव्हापासून तो चर्चेत आला. त्यानंतर त्याला अमेरिका राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्याने अमेरिकाकडून केवळ १ वनडे सामना खेळला आहे. त्यात त्याने फक्त एक विकेट चटकावली आहे. याव्यतिरिक्त तो कॅरेबियन प्रीमियर लीगचाही भाग आहे.
मोईन अली (Moin Ali)
मोईन अली हा पाकिस्तानी मूळ असलेला इंग्लिश क्रिकेटपटू आहे. त्याचे पूर्वज पाकिस्तानचे होते. पण, पुढे ते इंग्लंडमध्ये स्थायी झाले. त्यामुळे मोईन अलीचा जन्म १८ जून १९८७ रोजी इंग्लंडमधील बर्मिंगहम येथे झाला.
इंग्लंडच्या या अष्टपैलू क्रिकेटपटूने २०१४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती. त्याने आतापर्यंत इंग्लंडकडून १०५ वनडे, ६० कसोटी आणि ३४ टी२० सामने खेळले आहेत. अलीने २०१८ साली आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून तो आरसीबीचा भाग आहे. त्याने आयपीएलमध्ये १६ सामने खेळत २९७ धावा आणि ९ विकेट्सची कामगिरी केली आहे.
ट्रेंडिंग लेख-
कोण आहे आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणारा अमेरिकन क्रिकेटर? जाणून घ्या ५ रोमांंचक गोष्टी
ऑस्ट्रेलियाला ‘न लाभलेला’ सर्वोत्तम कर्णधार
दुसऱ्या काळात जन्न्मला असता, तर तो भारताचा अव्वल फिरकीपटू असता
महत्त्वाच्या बातम्या-
व्हिडिओ: दुबई पोहोचताच ड्वेन ब्राव्होचे सीएसकेने केले दमदार स्वागत; दिले हे सरप्राइज…
फक्त नि फक्त सनराइजर्स हैद्राबाद संघामुळे या धुरंदरला नाही मिळत आयपीएलमध्ये जास्त संधी
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाच्या अडचणीत भर; जनतेला वेड्यात काढण्याचे लावले आरोप