आयपीएलचा १३ वा सत्र १९ सप्टेंबरपासून दुबईमध्ये सुरू होईल. कोरोना विषाणूमुळे आयपीएलचे आयोजन यावेळी दुबईत करण्यात आले आहे. आयपीएलसाठी सर्व संघ दुबईला पोहोचले असून सध्या ते आइसोलेशनमध्ये आहेत. आयपीएल स्पर्धा जेवढी फलंदाजांनी गाजवली आहे टिकतकीच गोलंदाजांनी सुद्धा गाजवली आहे. आयपीएलमध्ये काही खास खेळी पाहायला मिळाल्या. यात ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स, रोहित शर्मा, विराट कोहली, युसुफ पठाण, ब्रेंडन मॅकलम आणि अॅडम गिलक्रिस्ट यांच्यासह अनेक स्फोटक फलंदाज आयपीएलमध्ये आहेत आणि होते.
आयपीएलमध्ये फलंदाज अनेकदा मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करतात आणि या आणि चौकार-षटकारांची आतिषबाजी करतात. म्हणूनच अशा स्पर्धेत गोलंदाजांना अचूक टप्प्यात गोलंदाजी करावी लागते. आयपीएलमध्ये बर्याचदा असे घडले आहे की, एखाद्या फलंदाजाने एकाच षटकात बऱ्याच धावा केल्या आणि ते षटक आयपीएलमधील सर्वात महागड षटक ठरलं . या लेखात तुम्हाला आयपीएलच्या इतिहासातील ३ सर्वात महागड्या षटकांबद्दल सांगणार आहोत.
३. ख्रिस गेल आणि मनोज तिवारी – वि. रवी बोपारा (३३ धावा)
ख्रिस गेल आयपीएल २०१० च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाचा सदस्य होता. स्पर्धेचा ७ वा सामना केकेआर विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब असा होता. केकेआरच्या डावाच्या १३ व्या षटकात ख्रिस गेलने रवी बोपाराविरुद्ध जोरदार फलंदाजी केली.
दुसर्या बाजूला गेलबरोबर मैदानात असलेल्या मनोज तिवारीने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेत गेलला स्ट्राईक दिली. त्यानंतर ख्रिस गेलने बोपाराच्या त्या षटकात ४ षटकार मारले. या ४ षटकारांव्यतिरिक्त, रवी बोपाराने वाइड चेंडू टाकला आणि वाइड चेंडू चौकार गेला म्हणून केकेआरला ज्यादाच्या ५ धावा मिळाल्या, तर ३ एकेरी धावा देखील दोन्ही फलंदाजांनी घेतल्या. अशा एकूण या षटकात ३३ धावा निघाल्या.
२. सुरेश रैना वि. परविंदर आवाना (३३ धावा)
२०१४ च्या आयपीएल मोसमात चेन्नई सुपर किंग्जचा संघ अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. दुसऱ्या क्वालिफायरमध्ये चेन्नईचा सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी होता. वानखेडे स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करत पंजाब संघाने २२६ धावांची विशाल धावसंख्या उभारली.
लक्ष्याचा पाठलाग करताना दुसर्याच चेंडूवर चेन्नई सुपर किंग्जने पहिला गडी गमावला. यानंतर सुरेश रैना मैदानात फलंदाजीस आला आणि तो येताच त्याने स्फोटक फलंदाजी करण्यास सुरवात केली. त्याने परविंदर आवानाच्या एका षटकात भरपूर धावा केल्या.
परविंदर अवानाने डावाच्या सहाव्या षटकात गोलंदाजी केली आणि रैनाने त्याच्या या षटकात एकूण ३३ धावा फटकावल्या. सुरेश रैनाने त्या षटकात ५ चौकार आणि २ षटकार लगावले आणि एक धाव अवांतर (नो बॉल) स्वरूपात मिळाली. परंतु, रैना लवकरच बाद झाला आणि पंजाब संघाने २४ धावांनी हा सामना जिंकला.
१. ख्रिस गेल वि. प्रशांत परमेश्वरन (३७ धावा)
८ मे २०११ रोजी, आयपीएलच्या चौथ्या सत्रात कोची टस्कर्सचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाशी सामना झाला. त्यावेळी ख्रिस गेल आरसीबी संघाचा सदस्य होता. प्रथम फलंदाजीत कोची संघ ९ गाड्यांच्या मोबदल्यात १२५ धावा करू शकला.
या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आरसीबीकडून गेल खूपच घाईत दिसत होता. त्याने डावाच्या तिसर्या षटकात प्रशांत परमेश्वरनच्या गोलंदाजी विरुद्ध जबरदस्त फलंदाजी केली. गेलने त्याच षटकात ४ षटकार आणि ३ चौकार ठोकत एकूण ३७ धावा केल्या. एक धाव संघाला अवांतर (नो चेंडू) म्हणून मिळाली. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात महागडे षटक आहे.