रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी हा आयपीएलमधील असा संघ आहे जो पहिल्या मोसमापासून आयपीएलचा भाग आहे. जरी आरसीबीने अद्याप एकदाही आयपीएलचे विजेतेपद जिंकलेले नसले, तरी संघाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आरसीबीमध्ये विराट कोहली आणि एबी डिविलियर्ससारखे खेळाडू खेळतात, ज्याला जगभरातील चाहत्यांनी पसंती दिली आहे.
आरसीबीचा संघ ३ वेळा अंतिम फेरीत पोहोचली आहे, पण तिन्ही वेळा त्यांचा पराभव झाला आहे. २००९ मध्ये आरसीबी संघाने सर्वात प्रथम अंतिम फेरीत प्रवेश केला पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर २०११ मध्ये संघाने डॅनियल व्हिटोरी आणि २०१६ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात अंतिम फेरी गाठली होती पण त्यांना जेतेपद मिळवता आले नाही.
आतापर्यंत अनेक दिग्गज खेळाडू आरसीबीकडून खेळले आहेत, ज्यांनी अनेक वेळा संघाला सामने जिंकून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. परंतु, असेही काही दिग्गज खेळाडू होते जे आरसीबीकडून खेळले पण आरसीबीसाठी उत्कृष्ट कामगिरी ते करू शकले नाहीत.
या लेखात त्या ३ दिग्गज परदेशी खेळाडूंबद्दल जाणून घेऊ जे आरसीबीसाठी फ्लॉप ठरले.
हे ३ दिग्गज परदेशी खेळाडू आरसीबीसाठी झाले फ्लॉप-
३. एल्बी मॉर्केल (Albie Morkel)
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा माजी अनुभवी अष्टपैलू एल्बी मॉर्केल आहे. मॉर्केल चेन्नई सुपर किंग्जमधील दिग्गज खेळाडूंपैकी एक आहे. जर सीएसकेने आपले कायमचे अंतिम अकरा खेळाडू निवडले तर त्यात एल्बी मॉर्केलचे नाव नक्की असेल. परंतु तो आरसीबीसाठी मात्र मॉर्केल फ्लॉप होता.
अॅल्बी मॉर्केलने सीएसकेसाठी ७८ सामने खेळले आणि ८२७ धावा केल्या आणि या काळात त्याने ७६ विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याला आरसीबीने २.६ कोटीच्या मोठ्या रकमेवर खरेदी केले, परंतु तो तेथे फ्लॉप ठरला.
एल्बी मॉर्केलने आरसीबीकडून ७ सामन्यांत केवळ ४५ धावा केल्या आणि त्याने गोलंदाजीत केवळ ४ विकेट घेतल्या. अशाप्रकारे तो आरसीबीकडून चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला.
२. क्विंटन डी कॉक (Quinton de Kock)
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकचेही नाव आहे. २०१८ च्या लिलावात आरसीबीने डी कॉक विकत घेतले. त्या मोसमात त्याने संघासाठी ८ सामने खेळले आणि २५.१२ च्या सरासरीने फक्त २०१ धावा केल्या. या ८ सामन्यात त्याने केवळ एक अर्धशतक झळकावले.
यानंतर, २०१९ च्या लिलावात मुंबई इंडियन्सने आरसीबीकडून क्विंटन डी कॉकची केवळ २. ८ कोटी रुपयांमध्ये खरेदी केली. मुंबई इंडियन्समध्ये जाताच डी कॉकने जबरदस्त खेळ दाखविला.
१. शेन वॉटसन (Shane Watson)
माजी अनुभवी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू शेन वॉटसनचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०१६ च्या लिलावात त्याच्या संघात समावेश केला होता. त्या मोसमात त्याने संघासाठी १६ सामन्यांत फक्त १७९ धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या ३६ धावा होती.
परंतु, पुढील मोसमात देखील आरसीबीने त्याला संघात कायम ठेवले आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत काही सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व करण्याची संधी दिली. पण वॉटसनने २०१७ च्या हंगामातही आरसीबीसाठी खास काही केले नाही. तो त्या हंगामातही फ्लॉप ठरला. त्या सत्रात त्याने ८ सामन्यांत ११.८३ च्या खराब सरासरीने केवळ ७१ धावा केल्या.
त्यानंतर आरसीबीने त्याला २०१८ च्या लिलावापूर्वी सोडले आणि चेन्नई सुपर किंग्जने वॉटसनला त्यांच्या संघात समाविष्ट केले. चेन्नईमध्ये जाताच वॉट्सनने चांगला खेळ दाखवला. त्याने २०१८ आणि २०१९ च्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात चेन्नईसाठी शानदार कामगिरीही केली.
ट्रेंडिंग लेख –
वयाची चाळीशी ओलांडली तरी कसोटी क्रिकेट खेळणारे ४ भारतीय दिग्गज
एकाच वनडेत ५० पेक्षा अधिक धावा करणारे आणि ४ विकेट्स घेणारे ४ भारतीय क्रिकेटर
वाढदिवस विशेष: वयाच्या १७ व्या वर्षी कसोटी पदार्पणात शतक झळकावणारा हॅमिल्टन मासाकात्झा
महत्त्वाच्या बातम्या –
पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाही स्टोक्स; जाणून घ्या कारण…
दुखापतग्रस्त नसूनही वेस्ट इंडिजचा ‘हा’ खेळाडू सीपीएलमधून बाहेर; कारण जाणून दंग व्हाल…
रिषभ पंतने ‘या’ दिग्गजाचा ऑटोग्राफ घेतलेला फोटो केला शेअर, सोबत लिहिला भावनिक मेसेज






