भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सध्या 5 कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर मालिका खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियानं दुसरी कसोटी जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला 10 गडी राखून दारुण पराभव स्वीकारावा लागला. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा युवा स्टार अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी यानं आपली विशेष छाप सोडली आहे.
नितीश कुमार रेड्डीची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी प्रथमच भारतीय संघात निवड झाली होती. येथे त्यानं आतापर्यंतच्या दोन्ही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यानं पर्थ कसोटी सामन्यानंतर ॲडलेडमध्येही आपल्या कामगिरीनं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं. या दौऱ्यावर त्यानं एक खास रेकॉर्डही आपल्या नावावर केला. तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला अशा 3 भारतीय फलंदाजांबद्दल सांगतो, ज्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
(3) मुरली विजय (2014) – माजी स्टायलिश फलंदाज मुरली विजयचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्वत:चं एक वेगळं स्थान आहे. तामिळनाडूच्या या फलंदाजानं दीर्घकाळ टीम इंडियासाठी ओपनिंगची जबाबदारी संभाळली होती. यादरम्यान त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळलेल्या कसोटी मालिकेत विजयनं 6 षटकार ठोकले होते.
(2) वीरेंद्र सेहवाग (2003) – भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात धोकादायक सलामीवीर फलंदाज असलेल्या वीरेंद्र सेहवागचा एकेकाळी वेगळाच दरारा होता. या दिग्गज फलंदाजानं कसोटी क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड केले आहेत. सेहवागनं 2003 च्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत 6 षटकार मारले होते.
(1) नितीश कुमार रेड्डी (2024) – भारतीय क्रिकेट संघाचा युवा अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याला या दौऱ्यावर प्रथमच संघात संधी मिळाली. त्यानं आपल्या पहिल्याच दौऱ्यात सर्वांना प्रभावित केलं आहे. नितीश कुमार रेड्डीनं दबावात आक्रमक फलंदाजीचं उदाहरण दाखवून पहिल्या दोन सामन्यांमध्ये 7 षटकार ठोकले. यासह तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा –
गुलाबी चेंडूच्या कसोटीतील ऑस्ट्रेलियाच्या वर्चस्वाचं कारण काय? शेवटचा पराभव कधी झाला होता?
या कारणामुळे रिषभ पंत मेगा लिलावात उतरला, मुख्य प्रशिक्षकांचा खळबळजनक खुलासा!
बांगलादेशने अंडर 19 आशिया चषक जिंकला, फायनलमध्ये भारताचा एकतर्फी पराभव!






