आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगला जगातील सर्वात मोठी खाजगी क्रिकेट लीग म्हणून पाहिले जाते. जगातील या सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये खेळून अनेक खेळाडू हे राष्ट्रीय संघात निवडले गेले आहेत.
आयपीएलच्या सुरुवातीला अनेक मोठ्या नावांना महत्त्व दिले गेले परंतु क्रिकेटच्या या अतिशय कमी वेळेच्या प्रकारात नावांपेक्षाही नंतर कामाला महत्त्व आले. जो खेळाडू चमकदार कामगिरी करेल तोच पुढे संघात टिकेल हेच आयपीएलचे सुत्र ठरले.
यामुळे सुरुवातीला ऑयकाॅन ठरलेल्या अनेक खेळाडूंना परत संघात घेताना अनेक फ्रंचाईजीने नाकं मुरडली.
३. इशांत शर्मा
अतिशय कमी वेळेत झटपट पैसा मिळवुन देणाऱ्या लीगमध्ये प्रत्येक क्रिकेटपटूची खेळण्याची इच्छा असते. पैसा हे एकच कारण यामागे नक्कीच नसते. भारतीय कसोटी संघातील वेगवान अनुुभवी गोलंदाज व भारताचा सध्याचा सगळ्यात अनुभवी कसोटीपटू इशांत शर्माही आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिला आहे.
२०१८ आयपीएल हंगामात या खेळाडूला कोणत्याही फ्रंचाईजीने संघात घेतले नव्हते. आयपीएलमध्ये ८९ सामने खेळलेल्या इशांतने ३५.८३च्या सरासरीने ७२ विकेट्स घेतल्या आहेत.
सध्या इशांत दिल्ली संघात असून २०१९ हंगामात तो या संघाकडून खेळला आहे. त्याने आजपर्यंत कोलकाता नाइट रायडर्स, डेक्कन चार्जर्स, सनराइजर्स हैद्राबाद, रायझिंग पुणे सुपरजाएंट्स, किंग्ज ११ पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स या संघांकडून खेळला आहे.
२. इरफान पठाण
भारतीय संघाचा एकवेळचा मुख्य गोलंदाज ते आयपीएलमधील संघात स्थान मिळविण्यासाठी धडपडणारा खेळाडू असा इरफानचा प्रवास राहिला. सध्या या खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
किंग्ज ११ पंजाब, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैद्राबाद, चेन्नई सुपर किंग्ज, रायझिंग पुणे सुपरजायंट्स व गुजरात लायन्स या फ्रंचाईजीकडून इरफान आयपीएलमध्ये खेळला आहे. २०१७मध्ये तो शेवटचा आयपीएल सामना गुजरात लायन्स संघाकडून खेळला आहे.
आयपीएलमध्ये १०३ सामने खेळलेल्या इरफानने ३३.११च्या सरासरीने ८० विकेट्स व ११३९ धावा केल्या आहेत. २०१७मध्ये इरफानला कोणत्याही फ्रंचाईजीने संघात घेतले नाही. नंतर याच हंगामात त्याल ड्वेन ब्राव्होच्या जागी गुजरात लायन्सने अर्धा हंगाम झाल्यावर संघात घेतले.
१. सौरव गांगुली
भारतीय संघाचा दादा कर्णधार राहिलेल्या सौरव गांगुलीची आयपीएल कारकिर्द अतिशय़ खराब राहिली. २००८ ते २०१० या काळात गांगुली कोलकाता नाईट रायडर्सकडून सामने खेळला. याच केकेआरने २०११मध्ये गांगुलीला संघात कायम ठेवले नाही. याच हंगामात गांगुलीला कोणत्याही फ्रंचाईजीने आपल्या संघात घेतले नाही.
परंतु याच हंगामात अर्ध्यातच सौरव गांगुलीला पुणे वाॅरियर्स इंडिया फ्रंचाईजीने आशिष नेहराच्या जागी संघात स्थान दिले. २०१२ मध्ये गांगुली आयपीएलचा शेवटचा सामना याच संघाकडून खेळला.
गांगुलीने ५९ आयपीएल सामन्यात २५.४५च्या सरासरीने १३४९ धावा व १० विकेट्स घेतल्या होत्या. गांगुलीला केकेआरने संघात कायम न केल्यावर केकेआर फ्रंचाईजीला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आज हाच गांगुली बरोबर ८ वर्षांनी त्या बीसीसीआयचा अध्यक्ष झाला आहे जी आयपीएलचे सर्व निर्णय घेते.
आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख
–जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
–आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
–या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
–आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू






