या जगातील प्रत्येकाला गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे आकर्षण असते. त्यामध्ये आपले नाव यावे असेही अनेकांना वाटते. पण या असे भाग्य अगदी कमी लोकांना मिळाले आहे. या गिनिजबुकमध्ये क्रिकेटमधीलही काही विक्रम नोंदवले गेले आहेत. त्यात ३ भारतीय क्रिकेटपटूंचाही समावेश आहे, त्यांचा घेतलेला हा आढावा –
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव असलेले ३ भारतीय –
१. सर्वात महागडी बॅट – एमएस धोनी
९ वर्षांपूर्वी २ एप्रिल २०११ ला झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात एमएस धोनीने श्रीलंकेविरुद्ध नाबाद ९१ धावांची खेळी करत भारताला विश्वविजेतेपद मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले. या विश्वचषकात त्याने वापरलेली बॅट क्रिकेट इतिहासातील सर्वात महागडी ठरली आहे.
त्याची ही बॅट लंडनमधील चॅरिटी डिनरमध्ये लिलावात जुलै २०११ मध्ये मुंबईच्या आरके ग्लोबल या गुंतवणूक कंपनीने ७२ लाखांना विकत घेतली होती. यातून आलेले पैसे साक्षी फाउंडेशन या धोनीची पत्नीच्या चॅरिटी फाउंडेशनसाठी दिले आहेत. ही चॅरिटी गरजू लहान मुलांसाठी काम करते. त्याच्या या बॅटची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधेही नोंद आहे.
२. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वात वयस्कर खेळाडू – राजा महाराज सिंग
राजा महाराज सिंग यांना स्वत:मधील क्रिकेटची आवड फार उशीरा कळाली. पण तरीही त्यांनी त्यांचे प्रथम श्रेणीमध्ये खेळण्याचे स्वप्न पूर्ण केले. काठपूरा येथील राजेशाही घराण्यातील राजा महाराज सिंग यांनी ७२ वर्षे १९२ दिवस एवढे वय असताना प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यामुळे त्यांचे नाव क्रिकेट इतिहासात नोंदवले गेले. त्याचबरोबर गिनिड बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले.
त्यांनी गव्हर्नर इलेव्हन संघाकडून कॉमनवेल्थ इलेव्हन संघाविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केले होते. तसेच त्यांनी गव्हर्नर संघाचे नेतृत्वही केले होते. ते या सामन्यात पहिल्या दिवशी ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आले. पण त्यांना केवळ ४ धावाच करता आल्या. बाद झाल्यानंतर त्यांनी या सामन्यात क्षेत्ररक्षण केले नाही. त्यांच्या अनुपस्थितीत पटियालाच्या यादविंद्र सिंगने संघाचे नेतृत्व केले.
३. सर्वाधिक वेळ नेट सेशन – विराग माने
वडापावची गाडी चालवणारा विराग माने क्रिकेटचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईतून पुण्यात स्थायिक झाला. त्याने २४ व्या वर्षी २४ डिसेंबर २०१५ ला क्रिकेट इतिहासात सर्वाधिक वेळ नेटमध्ये फलंदाजी करत त्याचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले. त्याने ३ दिवस २ रात्र फलंदाजी केली.
त्याने कर्वेनगरमधील महालक्ष्मी लॉन्समध्ये २२ डिसेंबरला फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्याने २,४४७ षटके, १४,६८२ चेंडूंचा सामना ५० तास, ५ मिनिट आणि ५१ सेंकदात केला. त्याने त्यावेळी डेव न्यूमन आणि रिचर्ड वेल्स यांचा ४८ तास फलंदाजी करण्याचा विक्रम यावेळी मोडला.
ट्रेंडिंग घडामोडी –
न्यूझीलंडला न्यूझीलंडमध्ये पाणी पाजणारे ३ भारतीय कर्णधार
विश्वचषक विजेता भारतीय खेळाडू म्हणतो, धोनीपेक्षा गंभीर भारी कर्णधार
ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाला नडणारे ४ भारतीय कर्णधार
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेची १ वर्षांची मुलगीही म्हणते, घराबाहेर पडू नका