प्रत्येक खेळाडू आपल्या संघाकडून विश्वचषक खेळण्याचे स्वप्न बघत असतो. घरगुती क्रिकेट पासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भारताकडे बरेच शानदार खेळाडू आहेत. परंतु सगळ्यांनाच विश्वचषकात संघाचा भाग होण्याची संधी मिळत नाही. अशावेळी ज्यांना ही संधी मिळते ते खेळाडू चांगली कामगिरी करत छाप पाडण्याचा प्रयत्न करतात. त्यातही जो खेळाडू विश्वचषकात सर्वात जास्त धावा करतो त्याला “गोल्डन बॅट” आणि सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला “गोल्डन बॉल” मिळतो. या फलंदाजाचे आणि गोलंदाजाचे सर्वत्र कौतुक केले जाते.
भारतीय संघाने एकूण 2 वेळा एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक जिंकला आहे आणि एकदा 2003 साली अंतिम सामन्यात पराभव स्वीकारून उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. ह्या लेखात आपण 3 भारतीय खेळाडूंची माहिती घेणार आहोत ज्यांनी विश्वचषकात सर्वाधिक धावा करून “गोल्डन बॅट” प्राप्त केली आहे.
सचिन तेंडुलकर :-
क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा आहेत. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेतही सचिनकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. सचिनने 1996 च्या विश्वचषकात सर्वाधिक धावा केल्या होत्या. फक्त 7 सामन्यात तब्बल 523 धावा तेंडुलकरने त्यावेळी वसूल केल्या होत्या. ज्यात 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता . गोल्डन बॅट जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू म्हणून सचिन ओळखला जातो.
राहुल द्रविड:-
भारतीय संघाची कसोटी क्रिकेट मधील मजबूत “भिंत” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहुल द्रविडची बॅट एकदिवसीय क्रिकेटमध्ये सुद्धा चांगलीच तळपायची. 1999 च्या विश्वचषकात “गोल्डन बॅट” द्रविडने आपल्या नावावर केली होती. त्या विश्वचषक स्पर्धेत द्राविडने 8 सामन्यांत एकूण 461 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 2 शतके आणि 3 अर्धशतकांचा समावेश होता.
या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे प्रथम तीनही फलंदाज गांगुली, द्रविड आणि सचिन भारतीयच होते, हे विशेष. इंग्लंडमध्ये झालेला हा विश्वचषक द्रविडसाठी अविस्मरणीय ठरला होता.
सचिन तेंडुलकर:-
सचिन तेंडुलकर एकूण 2 वेळा “गोल्डन बॅट” चा मानकरी ठरला आहे. 2003 साली दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषकात सचिनने सर्वाधिक धावा करून दुसऱ्यांदा हा किताब मिळवला होता. या स्पर्धेत सचिनने 11 सामन्यांत एकूण 673 धावा काढून विक्रम केला होता. नामिबिया विरुद्ध 152 धावांची शतकीय खेळी त्याने या विश्वचषकात केली होती. हे एकच शतक त्या विश्वचषकात सचिनने केले होते तर एकूण 6 अर्धशतके त्याने केली होती. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारताला पराभव स्विकारावा लागला होता.
रोहित शर्मा:-
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा या खेळाडूला क्रिकेट विश्वात कोण ओळखत नाही, असं नाही. रोहितनं इंग्लंडमध्ये झालेल्या 2019 विश्वचषकामध्ये विरोधी संघांच्या नाकीनऊ आणले होत. यामध्ये त्याने 9 सामन्यांमध्ये 648 धावा केल्या होत्या. त्यात त्याने 5 शतकं आणि एक अर्धशतक ठोकले होते आणि त्याच्या या कामगिरीमुळेच त्याला ‘गोल्डन बॅट’ मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
कमालच की! ‘या’ १० गोलंदाजांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत कधीही टाकला नाही वाईड बॉल
ताबडतोड फलंदाजी! वनडेमध्ये सर्वात जलद शतक करणारे ३ भारतीय क्रिकेटर
वनडेत एकाच षटकात सर्वाधिक धावा करणारे तीन भारतीय, एक तर आहे दिग्गज गोलंदाज