भारतीय संघात ‘कॅप्टन कूल’ एमएस धोनीच्या नेतृत्वात अनेक दिग्गज खेळताना पाहिले आहे. ते खेळाडू धोनीपेक्षाही अधिक अनुभवी होते. त्यांपैकी काही खेळाडू असेही होते, ज्यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्या सर्वांसमोर धोनी अगदी नवखा होता. वेळेनुसार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीचा अनुभवही वाढत गेला आणि त्यानंतर त्याचेही एक मोठे नाव बनले. भारतीय संघात अनेक खेळाडूंच्या निवडीपासून अंतिम ११ खेळाडूंपर्यंत धोनीची भूमिका नेहमीच खास राहिली आहे.
युवराज सिंग, गौतम गंभीर यांसारखे अनेक दिग्गज खेळाडू धोनीच्या नेतृत्वात संघात येत-जात राहिले आहेत. दुसरीकडे आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये धोनीबरोबर खेळणारे अनेक खेळाडू भारतीय संघात खेळले आहेत. मोहित शर्मा आणि मनप्रीत गोनी ही नावे यांतील मुख्य नावे आहेत. धोनी कर्णधार असताना असेही पहायाला मिळाले की, अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी शेवटचा सामना न खेळताच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
असे वनडे क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंबरोबर घडताना पाहिले आहे, त्यापैकी ३ खेळाडूंचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत.
धोनीच्या नेतृत्वात निवृत्ती घेणारे ३ भारतीय दिग्गज खेळाडू- 3 Indian Players would have get a farewell one day under MS Dhoni Captaincy
सचिन तेंडूलकर
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव मानले जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) वनडे क्रिकेटमध्ये शेवटचा सामना खेळला नव्हता. त्याने आपला शेवटचा वनडे सामना १८ मार्च २०१२ रोजी ढाका येथे आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. त्यावेळी संघाचे नेतृत्व धोनी करत होता. यानंतर सचिन वनडेत खेळताना दिसला नाही. सचिनची निवडकर्त्यांबरोबर काय चर्चा झाली होती, हेदेखील समोर आले नाही. सचिनने डिसेंबर २०१२ ला निवृत्तीची घोषणा करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यामुळे वनडेत धोनीच्या नेतृत्त्वाखाली फेअरवेल सामना मात्र सचिन खेळला नाही.
विरेंद्र सेहवाग
सचिन तेंडुलकरबरोबर खेळणारा विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवागबरोबरही (Virender Sehwag) असेच काहीसे झाले होते. कसोटी क्रिकेटमध्ये २ त्रिशतक आणि वनडेत द्विशतक जडणारा सेहवाग भारतीय संघाच्या दिग्गज खेळाडूंमध्ये गणला जातो. जानेवारी २०१३मध्ये कोलकाता येथे पाकिस्तानविरुद्ध शेवटचा वनडे सामना खेळणाऱ्या सेहवागने काही वर्षे वाट पाहिली. परंतु त्याला संघात सामील केले नाही. त्यानंतर त्याने २० ऑक्टोबर २०१५ रोजी निवृत्ती घोषणा केली. त्यालाही कर्णधार धोनीच्या नेतृत्त्वाखील फेअरवेल सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
झहीर खान
भारतीय संघाचा दिग्गज वेगवान गोलंदाज झहीर खानची (Zaheer Khan) २००३ आणि २०११ विश्वचषकातील कामगिरी कोणीही विसरू शकणार नाही. त्याने पल्लेकल्ले येथे श्रीलंकेविरुद्ध आपला शेवटचा वनडे सामाना खेळला होता. यानंतर काही वर्षे वाट पाहिली आणि १५ ऑक्टोबर २०१५ रोजी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. झहीर एक महान खेळाडू होता यात काडीमात्र शंका नाही. धोनीच्या नेतृत्वात निवृत्ती घेणारा झहीर तिसरा गोलंदाज होता. त्यालाही विशेष सामन्याचे आयोजन करुन फेअरवेल मिळाले नाही.
विशेष म्हणजे हे सचिन, सेहवाग आणि झहीर हे तिन्ही खेळाडू सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) नेतृत्वातही खेळले आहेत.