कुठल्याही संघाला विजय मिळू दे किंवा पराभव, तो संघ संतुलित असणे खूप आवश्यक आहे. त्या संघात पर्यायी फलंदाज आणि गोलंदाज असावेत. त्याशिवाय संघात अष्टपैलू खेळाडू असतील तर संघाला यशस्वी होण्याची शक्यता अधिक वाढते. अष्टपैलू खेळाडू महत्वाच्या प्रसंगी खूप उपयुक्त ठरतात आणि मोठी स्पर्धा जिंकण्यात त्यांचा मोठा हातभार असतो.
म्हणजेच भारताने आतापर्यंत २ विश्वचषक जिंकले आहेत त्यात अष्टपैलू खेळाडूंचा मोठा हातभार आहे. १९८३ विश्वचषकात कर्णधार कपिल देवने आपल्या जादुई नेतृत्वाने आणि अष्टपैलू क्षमतेने संघाला विजयी केले. झिम्बाब्वेविरुद्धच्या त्याने केलेली १७५ धावांची खेळी वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठ्या खेळींपैकी एक आहे.
त्याचबरोबर २०११ च्या विश्वचषकात भारताने जेव्हा दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला, तेव्हा युवराज सिंगसारख्या दिग्गज अष्टपैलू खेळाडूने मोठे योगदान दिले. युवराजने केवळ त्या स्पर्धेत शानदार फलंदाजी केली नाही तर महत्त्वाच्या प्रसंगी गोलंदाजी करून बळीही घेतले आणि मालिकावीर ठरला.
दुसरीकडे, इतर संघांबद्दल बोलायचे झाल्यास, मागील वर्षी इंग्लंडने प्रथमच विश्वचषक जिंकला आणि त्यात अष्टपैलू बेन स्टोक्सचे खूप मोठे योगदान होते. भारतीय संघ सध्या अष्टपैलू खेळाडूंच्या कमतरतेमुळे चिंतेत आहे. हार्दिक पांड्या हा अष्टपैलू खेळाडू आहे पण दुखापतीमुळे तो आत-बाहेर होत असतो. त्याच्या जागी आणखी बरेच खेळाडू प्रयत्न करीत आहेत परंतु आतापर्यंत त्यांना कोणताही प्रभाव पाडता आला नाही.
तर या लेखात आयपीएलमध्ये खेळणार्या त्या ३ खेळाडूंबद्दल सांगत आहोत जे भारतीय संघासाठी एक अष्टपैलू खेळाडू ठरू शकतात.
३. अभिषेक शर्मा
अभिषेक शर्मा हा १९ वर्षाचा एक युवा खेळाडू आहे. तो एक जबरदस्त अष्टपैलू आहे. अभिषेक शर्मा आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळत आहे. तो एक जबरदस्त फलंदज तर आहेच परंतु संघासाठी पर्यायी गोलंदाज सुद्धा आहे. २०१८ च्या आयपीएल पदार्पणातत अभिषेकने दिल्ली कॅपिटल्ससाठी एक शानदार खेळी केली. त्याने केवळ १९ चेंडूत ४६ धावा केल्या. टीम साऊथीसारख्या गोलंदाजाविरुद्द त्याने सलग दोन षटकार आणि एक चौकार ठोकला.
फलंदाजी व्यतिरिक्त गोलंदाजीत तो उपयुक्त ठरतो. डिसेंबर २०१६ मध्ये झालेल्या युवा आशिया चषक स्पर्धेत तो दुसर्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. या व्यतिरिक्त, तो २०१८ मध्ये विश्वचषक जिंकणार्या १९ वर्षाखालील भारतीय संघाचा एक सदस्य देखील होता. जर या खेळाडूला सातत्याने संधी मिळाल्यास तो भारतासाठी एक अष्टपैलू खेळाडू बनू शकतो.
२. श्रेयस गोपाळ
श्रेयस गोपाळ हा कर्नाटकचा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य आहे. त्याच्या गुगलीसमोर मोठं-मोठे फलंदाजही चकमा खातात. २०१९ च्या आयपीएल मोसमात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध हॅटट्रिक विकेट घेतली. त्यात विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स सारख्या दिग्गजांचा बाद केले होते. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत ३८ बळी घेतले आहेत.
त्याच्या फलंदाजीचा विचार केला तर श्रेयस गोपाळने अनेक वेळा शानदार फलंदाजी करून राजस्थान रॉयल्सला अडचणीतून बाहेर काढले आहे. आयपीएलमध्ये त्याचा स्ट्राईक रेट १०७ आहे आणि त्याने १२७ धावा केल्या आहेत. त्याला फलंदाजीची जास्त संधी मिळाली नाही. प्रथम श्रेणी त्याने आतापर्यंत २६७४ धावा केल्या असून त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद १५० अशी आहे. त्यांच्यातही फलंदाजीची बरीच क्षमता आहे आणि तो संघासाठी उपयुक्त गोलंदाजी करू करू शकतो.
१. कृष्णप्पा गॉथम
कृष्णप्पा गॉथम तीनही प्रकारात अतिशय उत्तम कामगिरी करणारा खेळाडू आहे. कृष्णाप्पा गॉथम राजस्थान रॉयल्सचा भाग होता पण गेल्या वर्षी तो किंग्ज इलेव्हन पंजाबमध्ये दाखल झाला. गौतमने आयपीएलमध्ये अनेक वेळा त्याच्या गोलंदाजीची, फलंदाजीची आणि क्षेत्ररक्षणातील चमक दाखवली आहे. आयपीएल २०१८ मध्ये मुंबई इंडियन्स विरूद्ध झालेल्या सामन्यात त्याने केवळ ११ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३३ धावा केल्या.
त्याशिवाय कर्नाटक प्रीमियर लीगच्या सामन्यात त्याने फक्त ५४ चेंडूत ७ चौकार आणि १३ षटकारांसह १३४ धावांची खेळी केली. त्याच सामन्यात त्याने १५ धावा देऊन ८ विकेट्स घेऊन नवीन विक्रमही रचला. याशिवाय गॉथम आपल्या क्षेत्ररक्षणासाठीही प्रसिद्ध आहे. आयपीएलमध्ये त्याने सीमारेषावर अनेक जबरदस्त झेल पकडले आहेत.
यामुळे कृष्णप्पा गॉथम भारतासाठी जबरदस्त अष्टपैलू असल्याचे सिद्ध होऊ शकते.
ट्रेंडिंग लेख –
पहाटेचे ४.४५ झाले होते व त्यांची गाडी १० टन वजनाच्या गुरांच्या ट्रकला धडकली होती
वाढदिवस विशेष- ४९ वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…
टेस्ट इनिंग्स स्पेशल भाग ५: लक्ष्मणची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ खेळी