fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

क्रिकेटच्या इतिहासात भारताच्या नावावर लागलेला ‘हा’ कलंक कधीच नाही पुसला जाणार

‘ते’ तीनही सामने भारतात झाले होते आणि भारतीय प्रेक्षकांच्या तेव्हाच्या अनपेक्षित वागणूकीने क्रिकेट विश्वालाही कायमचा डाग लागून राहिलेला आहे.

“सज्जनांचा खेळ म्हणून क्रिकेटची ओळख आहे. नियमांनी बांधलेल्या या खेळाला पाहणे आणि त्याचा आनंद घेणे, हे प्रत्येक प्रेक्षकाकडून अपेक्षित असते. क्रिकेटमध्ये खेळाडू आणि इतर सहगोष्टींप्रमाणेच मैदानावर उपस्थित असणारे प्रेक्षकही तितकेच महत्वाचे असतात.”

पाकिस्तानचा महान गोलंदाज शोएब अख्तर म्हणतो त्याप्रमाणे, “प्रेक्षकांविना क्रिकेट म्हणजे, वधुशिवाय लग्न” त्यामुळे क्रिकेट सामन्यांमध्ये प्रेक्षकांचे महत्व अनन्य साधारण आहे.

सामान्यतः स्थानिक स्तरावर होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमध्ये प्रेक्षकांची संख्या मर्यादीत असते. मात्र, आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असते. अशावेळी विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली जाते. सामना खेळणाऱ्या खेळाडूंचा उत्साह वाढवण्यातही प्रेक्षकांची भूमिका महत्वाची असते.

क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना जितके महत्व आहे, तितकेच प्रेक्षकांकडून प्रेक्षकगृहात आणि बाहेर चांगल्या वर्तवणूकीची अपेक्षा असते. एखाद्या चालू सामन्यात आपल्या संघाने अथवा खेळाडूने अपेक्षित कामगिरी न केल्यास प्रेक्षकांनी नाराज होणे साहजिकच असते. परंतु, अशावेळी प्रेक्षकांनी त्यांच्या भावनांवर ताबा ठेवला पाहिजे, तशी त्यांच्याकडून अपेक्षा असते.

मात्र, क्रिकेटच्या इतिहासात आजपर्यंत अशा काही घटना घडल्या आहेत. ज्यामुळे सज्जनांचा खेळ मानल्या जाणाऱ्या क्रिकेटला कायमचा बट्टा लागला आहे. आपल्या संघाची कामगिरी मनासारखी न झाल्याने प्रेक्षकांनी हिंसा केल्याची काही उदाहरणे क्रिकेटमध्ये झाली आहेत. विशेष म्हणजे यातील काही घटना भारतातही घडल्या आहेत.

या लेखात आपण भारतातील अशा 3 घटना आणि ते क्रिकेटचे सामने पाहणार आहोत, जेव्हा भारतीय प्रेक्षकांनी आपल्या संयमावर ताबा ठेवला नाही आणि चालू सामन्यादरम्यान हिंसा व प्रसंगी जाळपोळ देखील केली होती.

खरेतर अशा घटना होणे, ही कोणत्याही देशाला मान खाली घालायला लावणारी बाब; परंतु अशाच घटना पुन्हा पुन्हा होणे ही गोष्ट अधिक गंभीर असते. तर पाहुयात ‘जेंटलमन गेम’ क्रिकेटमधील भारतात घडलेल्या अशा 3 घटना, जिथे प्रेक्षकांनीच घडवला लाजिरवाना इतिहास…

क्रमांक – 1

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (वर्ष – 1966-67)

स्थळ – ईडन गार्डन मैदान, कोलकाता

क्रिकेटच्या इतिहासात तेव्हा पहिल्यांदाच असे घडत होते. जेव्हा सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांमुळे सामना थांबवावा लागला होता. असे म्हटले जाते की, या सामन्याची तिकिटे व्यवस्थापक सदस्यांकडून अगोदरच अवैधपणे विकण्यात आली होती. ज्यामुळे मैदानावर क्षमतेपेक्षा अधिक प्रेक्षक आले होते.

पहिल्या दिवशी प्रेक्षकांची गर्दी कशी तरी संभाळून घेण्यात आली. मात्र, दुसऱ्या दिवशी प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीमुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता. त्यामुळे त्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही. तेव्हा प्रेक्षक अगदी मैदानावर उतरले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळाडूंना आराम देण्यात आला. खरेतर वेस्ट इंडीजचा संघ मैदानावर येण्यास राजी होत नव्हता. त्यामुळे त्यांना आश्वस्त करुन आणि मनवून खेळण्यासाठी तयार करण्यात आले होते.

क्रमांक – 2

भारत विरुद्ध श्रीलंका (वर्ष – 1996)

स्थळ – ईडन गार्डन मैदान, कोलकाता

ही घटना म्हणजे भारताच्या नव्हे तर एकूण क्रिकेट विश्वासाठी लाजिरवानी बाब होती. भारतात होत असलेल्या विश्वचषकाचा तो उपांत्य सामना होता. भारत विरुद्ध श्रीलंका असा सामना असल्याने कोलकाताचे ईडन गार्डन मैदान प्रेक्षकांनी तुडुंब भरलेले होते.

या सामन्यात श्रीलंकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 251 धावांची खेळी केली होती. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. मात्र, सचिन तेंडुलकर 65 धावांवर बाद झाल्यानंतर भारताच्या आघाडीला ओहोटी लागली. भारताच्या एक एक फलंदाजांनी लंकेच्या गोलंदाजांपुढे अक्षरशः नांग्या टाकल्या. भारतीय संघाची अवस्था त्यामुळे 120 धावा आणि 8 बाद अशी झाली होती.

मैदानात भारतीय प्रेक्षक अधिक संख्येने होते. त्यामुळे भारतीय संघाची खराब कामगिरी पाहून प्रेक्षक प्रचंड संतप्त झाले. त्यातूनच प्रेक्षकांकडूनच बैठक व्यवस्था असलेल्या स्टँडमध्ये आग लावण्यात आली होती. त्यामुळे सामना तत्काळ थांबवण्यात आला. त्यानंतर हा सामना न खेळवता श्रीलंका संघाला विजयी घोषीत करण्यात आले होते.

क्रमांक – 3

भारत विरुद्ध वेस्ट इंडीज (वर्ष – 2002)

स्थळ – राजकोट मैदान, गुजरात

राजकोट येथे तेव्हा भारतीय संघ वेस्ट इंडीज संघाविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत होता. या सामन्याच्या अगोदर जमशेदपूर येथे झालेल्या सामन्यात भारतीय प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली होती. त्यामुळे राजकोट येथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

राजकोट येथील त्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 विकेट गमावून 300 धावांचा डोंगर भारतीय संघापुढे उभा केला होता. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला. दरम्यान भारतीय संघाचा डाव सुरु असतानाच, वेस्ट इंडीज संघाच्या ‘रयान हिंडस्’ या खेळाडूला एका प्रेक्षकाने पाण्याची बाटली फेकून मारली. ज्याची तक्रार रयानने पंचांकडे केली होती.

त्यानंतर थोड्याच वेळाने ‘वेस्बर्ट ड्रॅक्स’ने आपल्या गोलंदाजीवर सौरव गांगुलीला बाद केले. मात्र, वेस्बर्ट जेव्हा क्षेत्ररक्षण करत होता. तेव्हा पुन्हा एका प्रेक्षकाने त्यालाही पाण्याची बाटली फेकून मारली. याची तक्रार वेस्बर्टने पंचांकडे केली. त्यानंतर मात्र सामना थांबवण्यात आला.

“सामना थांबवल्यामुळे प्रेक्षक अधिकच हुल्लडबाजी करु लागले. त्यावेळी भारताची धावसंख्या 200 धावा, 1 बाद अशी होती. परंतु, डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे भारतीय संघाला 81 धावांनी विजयी घोषीत करण्यात आले.”