भारतीय संघाचा टी२० विश्वचषकमधील प्रवास सुपर १२ साखळी सामन्यात संपला. भारतीय संघाने आपल्या शेवटच्या सामन्यात सोमवारी (८ नोव्हेंबर) नामिबियाविरुद्ध ९ गडी राखून सहज विजय मिळवला. भारताला पहिल्या दोन सामन्यांत सलग पराभवानंतर पुनरागमन करता आले. मात्र, उपांत्य फेरीत स्थान मिळवता आले नाही. यंदाही भारतीय संघाचे आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावण्याचे स्वप्न भंगले. यामुळे भारतीय चाहत्यांचीही मनं तुटली आहेत. या स्पर्धेत काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली, तर काहींनी निराशा केली.
या निराशाजनक यादीत त्या खेळाडूंचा समावेश आहे ज्यांच्याकडून यूएईच्या खेळपट्टीवर चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती. पण, हे सर्व फ्लॉप ठरले. या लेखात आपण अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांनी भारतीय संघाच्या वतीने स्पर्धेत खराब कामगिरी करत, सर्वाधिक निराश केले.
हार्दिक पंड्या
या क्रमवारीत पहिले नाव येते ते भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे. ज्याचा संघात फिनिशर म्हणून समावेश करण्यात आला होता. प्लेइंग इलेव्हनमध्येही त्याला मोठ्या संघांविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली. पण,त्याने चाहत्यांच्या विश्वासाला तडा दिला.
अफगाणिस्तानविरुद्ध खेळलेला सामना सोडला, तर पहिल्या २ सामन्यात तो फलंदाजीत पूर्णपणे अपयशी झाला होता. त्याला प्लेइंग ११ मध्ये अष्टपैलू म्हणून मैदानात उतरवले होते. पण, फलंदाजी सोडा, त्याला गोलंदाजीतही कमला करता आली नाही. त्याला संघात स्थान का मिळाले हा प्रश्न आजही चाहत्यांना सतावत आहे, जो योग्य आहे. या दोन्ही सामन्यांमध्ये तो अनेकवेळा फिटनेसच्या समस्यांशी झगडतांना दिसला. भारतीय संघासाठी त्याची कामगिरी खूपच खराब राहिली आणि त्याने खूप निराश केले.
शार्दुल ठाकूर
शार्दुल ठाकूरची सुरुवातीस मुख्य संघात निवड झाली नव्हती. परंतु, १० सप्टेंबर रोजी संघात बदल करत अक्षरला वगळण्यात आले आणि १५ सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आला. न्यूझीलंडविरुद्ध, त्याला भुवनेश्वरच्या जागी खेळवण्यात आले. त्याच्याकडून अशी अपेक्षा होती की, त्याने आयपीएल २०२१ मध्ये यूएई खेळपट्टीवर जशी कामगिरी केली होती, तशीच कामगिरी तो टी२० विश्वचषकामध्येही करेल. पण, या आशा निराधार ठरल्या.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शार्दुल चांगलाच महागात पडला. त्याला या सामन्यात एकही विकेट घेता आली नाही. अफगाणिस्तानविरुद्धही त्याने १०.३० च्या इकॉनॉमी रेटने धावा केल्या, पण याही सामन्यात त्याला यश मिळाले नाही. एकूणच अपेक्षेप्रमाणे त्याला या मोठ्या स्पर्धेत काही खास करता आले नाही. त्यामुळे त्यानेही भारतीय संघास खूप निराश केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
वरुण चक्रवर्ती
या यादीत, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या वरुण चक्रवर्तीबद्दचा मोठ्या संघांविरुद्ध सरप्राईज पॅकेज म्हणून वापर केला गेला. पण, त्याने विराट कोहलीचा निर्णय वारंवार चुकीचा सिद्ध केला. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात तो महागडा फिरकी गोलंदाज ठरला होता. न्यूझीलंडविरुद्धही त्याचे असेच प्रदर्शन पाहायला मिळाले. यानंतर स्कॉटलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने जास्त धावा दिल्या नव्हत्या, पण त्याला विकेट्स मिळवता आल्या नाहीत.
संपूर्ण स्पर्धेत वरुण विकेट घेण्यासाठी आसुसलेला दिसला. या स्पर्धेत त्याच्या रहस्याची जादू ओसरतांना दिसली. या विश्वचषकात चहलसारख्या गोलंदाजाला डावलून त्याचा समावेश करण्याचा निर्णय चुकीचा ठरला. त्याने आपल्या कामगिरीने या संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक निराशा केली.
महत्त्वाच्या बातम्या –
“भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी झाला पाहिजे होता.”
रवी शास्त्री मुख्य प्रशिक्षकपदावरुन पायउतार, एक नजर त्यांच्या कार्यकाळातील वादग्रस्त वक्तव्यांवर