इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगाम कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता २९ सामन्यांनंतर अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आला. हा हंगाम स्थगित होतो तोच भारतीय क्रिकेट संघांच्या पुढील सामन्यांबद्दल चर्चा सुरु झाली. भारतीय संघ पुढील महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. तिथे त्यांना न्यूझीलंड विरुद्ध कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. तसेच त्यानंतर इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या संपूर्ण इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी (७ मे) २० जणांचा भारतीय संघ जाहीर केला आहे. तसेच ४ राखीव खेळाडूंचीही निवड केली आहे. हा संपूर्ण संघ येत्या २ जूनला इंग्लंडला रवाना होणार आहे. २० जणांच्या संघात केएल राहुल आणि वृद्धिमान साहा यांचीही निवड करण्यात आली असली तरी त्यांना फिटनेस टेस्ट पार केल्यानंतरच इंग्लंडला जाता येणार आहे. राहुलचे अपेंडिंक्सची शस्त्रक्रिया झाली आहे. तर साहा काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता.
या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झाल्यानंतर अनेक क्रिकेट तज्ञांमध्ये तसेच क्रिकेट चाहत्यांमध्ये वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा सुरु झाली. त्यातील ३ महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे.
३. यष्टीरक्षकाला आणखी पर्याय?
बीसीसीआयने निवडलेल्या २० जणांच्या कसोटी संघात सध्या रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा हे नियमित यष्टीरक्षक आहेत. तसेच केएल राहुलला बऱ्यापैकी यष्टीरक्षणाचा अनुभव आहे, मात्र त्याने अजूनपर्यंत कधीही भारताकडून कसोटीत यष्टीरक्षण केलेले नाही. त्यातच साहा आणि राहुल यांच्यावर फिटनेस टेस्ट पास करण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे सध्या भारताकडे पंत हा तंदुरुस्त आणि पूर्णवेळ उपलब्ध असलेला एकमेव यष्टीरक्षक आहे. अशामध्ये राखीव खेळाडूंमध्ये एका यष्टीरक्षकाला संधी का दिली गेली नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
२. पृथ्वी शॉला संधी का नाही
युवा सलामीवीर पृथ्वी शॉला मागीलवर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळल्यानंतर खराब कामगिरीमुळे भारतीय संघातून बाहेर करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अजूनही भारतीय संघात संधी मिळालेली नाही. विशेष म्हणजे त्याची गेल्या काही दिवसात अफलातून कामगिरी झाली आहे.
त्याने विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेत ८ सामन्यांत १६५.४० च्या सरासरीने ८२७ धावा केल्या होत्या. तसेच तो नुकत्याच स्थगित करण्यात आलेल्या आयपीएल २०२१ हंगामातही चांगल्या फॉर्ममध्ये दिसला होता. असे असतानाही त्याची निवड का करण्यात आली नाही, हा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. पण यामागे असेही एक कारण असू शकते की शॉने गेल्या काही महिन्यात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचा कसोटीसाठी विचार करण्यात आला नसावा.
१. भुवनेश्वर कुमारला संधी का नाही
गेल्या काही वर्षात दुखापतीमुळे सातत्याने भारतीय संघात आत-बाहेर करणाऱ्या भुवनेश्वर कुमारकडे इंग्लंड दौऱ्यासाठी मात्र, दुर्लक्ष करण्यात आल्याचे दिसत आहे. भुवनेश्वरची ताकद ही त्याची सीम आणि स्विंग गोलंदाजी ही आहे, जी इंग्लंडमध्ये फायद्याची ठरु शकते. तसेच त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभवही आहे, असे असताना त्याला संधी देण्यात आलेली नाही. यामागे त्याच्या दुखापतीचे एक कारण असू शकते. पण त्याची निवड न होणे हा देखील एक चर्चेचा विषय ठरला आहे.
असा आहे इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ –
विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे(उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल (फिटनेसवर अवलंबून), वृद्धिमान साहा (फिटनेसवर अवलंबून).
राखीव खेळाडू – अभिमन्यू इश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्झान नाग्वास्वाल्ला
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूझीलंड आणि इंग्लंडशी दोन हात करण्यास ‘या’ दिवशी टीम इंडिया होणार रवाना; पाहा कसे असेल सर्व नियोजन
बिग ब्रेकिंग! कसोटी चॅम्पियनशीपसाठी टीम इंडियात निवड झालेला ‘हा’ क्रिकेटपटू कोरोना पाॅझिटिव्ह
“खूप दु:ख होतं, जेव्हा आयपीएलमध्ये ७ वर्षे कोणीही खरेदीदार मिळत नाही,” पुजाराने व्यक्त केल्या भावना