अखेर आयपीएल 2021 मध्ये करोनाचे विघ्न पडले आहे. कोरोनामुळे अखेर ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. खरं तर सुरुवातीपासूनच आयपीएलच्या आयोजनासंदर्भात कोरोनाची भीती वर्तवली जात होती. तरीदेखील बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा भारतात घेण्याची योजना आखली, मात्र त्यात त्यांना अपयश आले आहे.
संघांच्या बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाल्याने खेळाडूंमध्ये काही प्रमाणात भीतीचे वातावरण असल्याची चर्चा होती, व अखेर बीसीसीआय व आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आपण या लेखात बघणार आहोत अशी 3 कारणे ज्यामुळे सुरक्षित असलेल्या बायोबबलमध्ये देखील कोरोनाचा शिरकाव झाला असावा.
1) विमान प्रवास –
आयपीएल 2021 दरम्यान बायोबबलला सर्वात जास्त धोका झाला, तो विमान प्रवासामुळे. कोरोना काळातही आयपीएल स्पर्धा 6 वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे खेळाडूंना कोरोना काळातही विमान प्रवास करावा लागणार होता. काही मीडिया रिपोर्ट नुसार प्रवासावेळी खेळाडूंच्या बायोबबलचा भंग होत होता.
विशेष म्हणजे युएईमधील आयपीएल 2020 वेळी खेळाडूंना केवळ बस प्रवासाद्वारे स्टेडियममध्ये पोहोचता येत होते. त्यामुळे तेथे बायोबबल भंग होण्याचा धोका उत्पन्न होत नव्हता. मात्र मुंबई आणि चेन्नईतील सामने झाल्यानंतर अहमदाबाद आणि दिल्लीला जाताना संघांनी विमान प्रवास केला होता. यामुळे बायोबबलमध्ये बदल करावा लागला होता.
2)ग्राउंड स्टाफ, ड्रायव्हर व इतर सपोर्ट स्टाफ बबलचा भाग नसणे –
आयपीएल 2021 वेळी खेळाडू बायोबबलमध्ये होते, मात्र खेळाडूंच्या संपर्कात येणारे इतर लोक बबलमध्ये नसल्याचे कळत आहे. विशेषतः हॉटेलमधील कर्मचारी, बस ड्रायव्हर, डिजे, ग्राउंड स्टाफ या सर्वांना बबलमध्ये ठेवण्याची नितांत गरज होती. जर हे सर्व लोक बबलमध्ये असते तर निश्चितच कोरोनाचा धोका कमी झाला असता.
3) ट्रॅकिंग डिवाइसमधील त्रुटी –
आयपीएल 2021 दरम्यान खेळाडूंजवळील ट्रॅकिंग डिवाइसमध्ये त्रुटी असल्याचे समजत आहे. बीसीसीआयने हे ट्रॅकिंग डिवाइस चेन्नईमधील एका कंपनी कडून खरेदी केले होते. ट्रॅकिंग डिवाइसमधील त्रुटींमुळे कोरोनाचा संसर्ग नेमका कोणत्या ठिकाणी झाला याबद्दल बीसीसीआय केवळ एक अंदाज बांधू शकते. त्यामुळे प्रश्न पडतो की जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा पार पडत असताना या सर्व बाबींबद्दल आणखी गांभीर्याने विचार करायला हवा होता.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या क्षणाला भारत आणि आयपीएल दोन वेगवेगळे जग आहेत’
‘कोरोना हा आता विनोदाचा भाग राहिलेला नाही’, चेन्नई सुपर किंग्सच्या खेळाडूची प्रतिक्रिया
‘यावेळी संघ फॉर्ममध्ये होता’, फाफ डू प्लेसिसने भावनिक संदेशासह घेतला आयपीएलचा निरोप