भारतात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटाचा फटका इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामालाही बसला. हा हंगाम भारतात सुरु असतानाच संघांच्या बायोबबलमध्ये कोरोना व्हायरचा शिरकाव झाला. संघांचे काही खेळाडू तसेच अन्य सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर अखेर मंगळवारी हा हंगाम स्थगित करण्यात आला. यानंतर परदेशी खेळाडू आपापल्या देशात परतत आहेत. यावेळी चेन्नई सुपर किंग्सकडून खेळणाऱ्या फाफ डू प्लेसिसनेही भावनिक निरोपाचा संदेश लिहिला आहे.
डू प्लेसिसने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने यंदाच्या हंगामातील त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्याने या फोटोंना कॅप्शन देताना लिहिले आहे की आयपीएल आणि चेन्नई सुपर किंग्स कुटुंबाला सोडून जाताना वाईट वाटत आहे. या हंगामात संघ चांगल्या फॉर्ममध्ये होता. सध्याच्या परिस्थितीत माझ्या प्रार्थना भारतातील लोकांबरोबर असतील. स्वत:ची काळजी घ्या.’
चांगल्या फॉर्ममध्ये होता फाफ डू प्लेसिस
यंदाचा हंगाम केवळ चेन्नई सुपर किंग्स संघासाठीच नाही तर फाफ डू प्लेसिससाठीही चांगला सुरु होता. त्याने या हंगामात सलग ४ अर्धशतकी खेळी करण्याचा कारनामा केला होता. तसेच तो यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या शर्यतीतही तिसऱ्या क्रमांकावर होता.
त्याने या हंगामात ७ सामन्यांत ६४ च्या सरासरीने ३२० धावा केल्या होत्या. नाबाद ९५ ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. ही खेळी त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध केली होती. तसेच त्याची सलामीला ऋतुराज गायकवाडबरोबरही चांगली जोडी जमल्याचे दिसत होते. हे दोघेही चेन्नईला चांगली सुरुवात देत होते. त्यांनी केकेआर विरुद्ध तसेच सनरायझर्स हैदराबादविरुद्ध शतकी भागीदारी केली होती.
चेन्नई संघही चांगल्या फॉर्ममध्ये
मागील हंगामातील वाईट कामगिरी विसरुन चेन्नई संघ यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये होता. त्यांनी पहिला सामना पराभूत झाल्यानंतर सलग ५ सामने जिंकले होते. त्यानंतर मात्र, त्यांना मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्विकारावा लागला होता. पण स्पर्धा स्थगित झाली तेव्हा चेन्नई संघ ७ सामन्यांतील ५ विजयासह गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर होता.
महत्त्वाच्या बातम्या –
हसी अन् बालाजी कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर चेन्नईच्या ‘या’ खेळाडूंवरही कोरोनाचे सावट