महेंद्रसिंह धोनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्यानं त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला एकूण 10 वेळा अंतिम फेरीत नेलं, ज्यापैकी चेन्नई 5 वेळा चॅम्पियन बनली आहे.
जर आपण धोनीच्या आयपीएलमधील वैयक्तिक कारकिर्दीवर नजर टाकली तर त्यानं आजपर्यंत 250 सामने खेळताना एकूण 5,082 धावा केल्या आहेत. धोनीच्या नावे इंडियन प्रीमियर लीगमध्ये भरपूर षटकार आहेत, परंतु जेव्हा शतक आणि अर्धशतकांचा विचार केला जातो तेव्हा धोनी इतर फलंदाजांच्या तुलनेत मागं असल्याचं दिसून येतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, धोनीनं गेल्या 24 डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावलेलं नाही.
एमएस धोनीनं आयपीएलमधील शेवटची अर्धशतकी खेळी 26 मार्च 2022 रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात खेळली होती. त्या सामन्यात चेन्नईचा संघ संघर्ष करत होता. टीमनं 61 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत धोनी 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी क्रिजवर आला. धोनीनं सामन्यात संथ खेळ केला. मात्र त्याच्या 38 चेंडूत 50 धावांच्या नाबाद खेळीमुळे चेन्नईनं 20 षटकांत 131 अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. त्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं 6 गडी राखून विजय मिळवला होता.
महेंद्रसिंह धोनीनं त्या सामन्यानंतर आयपीएलमध्ये 24 डाव खेळले आहेत. मात्र त्याला एकाही डावात अर्धशतक झळकावता आलेलं नाही. कोलकात्याविरुद्धच्या या लढतीनंतर त्याची सर्वोच्च धावसंख्या 36 धावा आहे. ही खेळी त्यानं 2022 मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळली होती.
धोनी अर्धशतक करू शकला नाही याचं एक कारण म्हणजे तो बहुतेक वेळा आठव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. धोनीनं आजपर्यंतच्या 250 सामन्यांच्या आयपीएल कारकिर्दीत 24 अर्धशतकं झळकावली आहेत. परंतु त्याला एकही शतक झळकावता आलेलं नाही. 84 ही त्याची आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्या आहे.
महेंद्रसिंह धोनी 2024 मध्ये देखील चेन्नई सुपर किंग्जचं नेतृत्व करणार आहे. तो यंदाच्या आयपीएलमध्ये तरी अर्धशतक झळकावतो की नाही, हे पाहण्यासारखं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलचा सर्वात कंजूस गोलंदाज कोण? सर्वाधिक निर्धाव षटकं कोणी टाकली आहेत?
आयपीएलमध्ये पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या सहभागावर हरभजन सिंगचं मोठं वक्तव्य, म्हणाला…
एका यॉर्करनं बदललं ‘या’ 17 वर्षाच्या गोलंदाजाचं आयुष्य, खुद्द धोनीही झाला फॅन!