आयपीएलमध्ये शनिवारी (3 ऑक्टोबर) झालेल्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने राजस्थान रॉयल्सला 8 गडी राखून पराभूत केले. आरसीबीचा या हंगामातील हा तिसरा विजय आहे तर राजस्थानचा या हंगामातील सलग दुसरा पराभव आहे. आपण या लेखात राजस्थानच्या पराभवाची प्रमुख तीन कारणे पाहाणार आहोत.
मोठी धावसंख्या करण्यात ठरले अपयशी
राजस्थानच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे कमी धावा. त्यांनी 20 षटकात फक्त 154 धावा केल्या. राजस्थानने फलंदाजीत चांगली कामगिरी केली नाही, त्यामुळे गोलंदाजांवर दबाव वाढला. बंगलोरने हे लक्ष्य सहज गाठले. राजस्थान मोठी धावसंख्या उभारू शकला असता पण वरच्या फळीतील फलंदाज लवकरच तंबूत परतले होते, ज्यामुळे मधल्या आणि तळातल्या फलंदाजांवर दबाद वाढला. परिणामी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
युजवेंद्र चहलने केलेली गोलंदाजी
आरसीबीचा फिरकीपटू युजवेंद्र चहलने या सामन्यात शानदार गोलंदाजी केली त्याने केवळ धावाच रोखल्या नाहीत तर राजस्थानच्या तीन फलंदाजांनाही तंबूत पाठवले. तसेच त्याने गोलंदाजी करताना 4 षटकात केवळ 24 धावाच दिल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याच्या गोलंदाजीमुळे राजस्थानच्या फलंदाजांवर दबाव वाढत होता. त्यामुळेच ते मोठी धावसंख्या करू शकले नाही.
कोहलीने केली उत्कृष्ट खेळी
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात उत्कृष्ट फलंदाजी केली. आरसीबीची पहिली विकेट लवकरच पडली. पण विराटने दुसर्या विकेटसाठी सलामीवीर देवदत्त पडीक्कलबरोबर 99 धावांची भागीदारी केली. या सामन्यात विराटने नाबाद 72 धावा करून विजयात मोलाची कामगिरी पार पाडली.