---Advertisement---

आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी

On: शुक्रवार, जुलै 31, 2020 3:00 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) ज्या संघाकडे सर्वात महागडा खेळाडू आहे, तोच संघ आजवर एकदाही आयपीएल ट्रॉफी जिंकू शकलेला नाही. हा संघ म्हणजे विराट कोहली कर्णधार असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी). त्यांनी आतापर्यंत २००९, २०११ आणि २०१६ या तीन हंगामात आयपीएलच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली आहे. पण, दुर्दैवाने तिन्हीवेळा त्यांच्या वाट्याला अपयश आले आहे.

परंतु, आयपीएल २०२०मध्ये आरसीबी संघ खूप मजबूत असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्याकडे क्रिकेटच्या सर्व विभागातील उत्तम खेळाडू उपलब्ध आहेत. त्यामुळे यंदा आयपीएल ट्रॉफी आरसीबी संघाच्या खात्यात जाण्याची शक्यता आहे.

या लेखात, त्या ३ कारणांवर आपण चर्चा करणार आहोत, ज्यामुळे आरसीबी आयपीएलच्या तेराव्या हंगामात ट्रॉफी जिंकू शकते. 3 Reasons Why RCB Can Win IPL 2020

३. संघात उत्कृष्ट भारतीय खेळाडूंचा समावेश

आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन करण्यासाठी संघात चांगल्या भारतीय खेळाडूंची आवश्यकता असते. कारण, संघातील ११ खेळाडूंमध्ये ७ भारतीय खेळाडूंचा समावेश असतो. यंदा विराटच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीमध्ये काही दमदार युवा खेळाडू उपलब्ध आहेत. जर कोणत्या हंगामात आरसीबीने खराब प्रदर्शन केले. तर, ते संघातील बऱ्याच खेळाडूंना बाहेर करतात. पण गतवर्षी आरसीबीच्या खराब प्रदर्शनानंतरही संघाने शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर आणि नवदीप सैनी या भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवला आहे. हे तिन्ही खेळाडू भारतीय संघातील सक्रिय खेळाडू आहेत.

आरसीबीने शिमरॉन हेटमायर आणि कॉलिन डी ग्रॅंडहोम या परदेशी खेळाडूंना संघाबाहेर करुन या युवा भारतीय खेळाडूंना पुन्हा संधी दिली आहे. दुबे, सुंदर आणि नवदीप यांचे देशांतर्गत क्रिकेटमधील प्रदर्शनही उल्लेखनीय आहे. त्यामुळे हे तीन युवा भारतीय खेळाडू आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद जिंकून देऊ शकतात.

२. दमदार विस्फोटक फलंदाज

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे फलंदाजी प्रदर्शन प्रत्येक हंगामात चांगले असते. मात्र, संघात विराट आणि एबी डिविलियर्स व्यतिरिक्त इतर फलंदाज सलग चांगल्या धावा करताना दिसत नाहीत. गेल्या ४ हंगामात आरसीबी संघातील विराट आणि डिविलियर्स यांना सोडून कोणताही फलंदाज एका हंगामात ४०० धावांचा आकडा पार करु शकलेला नाही.

परंतु, २०१९ मध्ये पार पडलेल्या आयपीएल लिलावात काही अशा फलंदाजांना निवडण्यात आले आहे, जे संघाला कठीण परिस्थीतही सावरु शकतात. ते फलंदाज म्हणजे, आरोन फिंच आणि जोश फिलिप होय. फिंच हा ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये ताबडतोब खेळी करु शकतो.

१. संतुलित गोलंदाजी 

आरसीबी संघाची सर्वात मोठी समस्या आहे, त्यांची गोलंदाज. त्यांनी २०० पेक्षा जास्त धावा केल्यानंतरही अनेक सामने गमावले आहेत. पण, यंदा आरसीबीने त्यांच्या या समस्येवर चांगलेच तोड काढले आहे. त्यांनी २०१९मध्ये पार पडलेल्या आयपीएल लिलावात दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिसला १० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. तसेच, त्यांनी डेल स्टेनला लिलावाच्या एक महिना आधी संघाबाहेर केले होते आणि लिलावात पुन्हा आपल्या संघात सामाविष्ट केले.

एकंदरीत आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी आरसीबीकडे डेल स्टेन, ख्रिस मॉरिस आणि केन रिचर्डसन हे दमदार गोलंदाज उपलब्ध आहेत. शिवाय, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि मोईन अली असे दमदार फिरकी गोलंदाजही उपलब्ध आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---