आयपीएलच्या १३ व्या हंगामाला धमाकेदार सुरुवात झाली आहे. आतापर्यंतचे सर्वच सामने चुरशीचे झाले आहेत. सर्वच संघानी जोरदार तयारी केली आहे. यंदाची ही आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये असल्याने तेथील खेळपट्या आणि वातावरणानुसार संघात काही बदल पाहायला मिळाले.
आजच्या या खास लेखात अशा ३ सलामीवीरांबद्दल चर्चा करू जे आयपीएल २०२० मध्ये संघाला असलेली गरज बघून खालच्या क्रमांकावर फलंदाजी करायला येऊ शकतात.
रोहित शर्मा (Rohit Sharma)
भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. रोहितने आपल्या कर्णधारपदी चार वेळा मुंबई इंडियन्ससाठी जेतेपद जिंकले. याशिवाय २००९ मध्ये त्याने डेक्कन चार्जर्सकडून खेळताना जेतेपद जिंकले होते. आयपीएलमध्ये कर्णधार आणि खेळाडू म्हणून रोहित शर्मा खूपच प्रभावी ठरला आहे.
या आयपीएलम हंगामाबद्दल विचार केला तर रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून पहिल्या दोन्ही सामन्यात सलामीला फलंदाजीला आला आहे. पण पुढे कदाचीत तो तिसर्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. ख्रिस लिन आणि क्विंटन डी कॉकच्या रूपात संघात २ उत्कृष्ट सलामीची जोडी उपस्थित आहे. यापूर्वीही रोहित तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसला आहे. त्यामुळे जर संघाला खालच्या क्रमांकावर त्याची गरज असेल तर तो तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो.
रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत १९० सामन्यांमध्ये ३१.७८ च्या सरासरीने ४९९० धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १३१.७८ आहे. या दरम्यान रोहितने ३७ अर्धशतके आणि एक शतकही केले आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये ४३६ चौकार आणि २०० षटकार ठोकले आहेत. दरम्यान, रोहित शर्माने क्षेत्ररक्षण करताना ८३ झेल पकडले. रोहितने आयपीएलमध्ये हॅटट्रिकसह १५ बळीही घेतले आहेत.
अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane)
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये अनेकदा सलामीला येणारा भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार अजिंक्य रहाणेही या हंगामात तिसर्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. या हंगामात रहाणे दिल्ली कॅपिटल्स संघात आहे. दिल्ली कॅपिटल्स संघात शिखर धवन आणि पृथ्वी शॉ च्या रूपात आधीच दोन चांगले सलामीवीर फलंदाज आहेत.
यामुळेच आयपीएल २०२० मध्ये रहाणे सध्या तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. रहाणे कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघासाठी पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु , तो आयपीएलमध्ये नेहमीच सलामीला फलंदाजी करताना दिसला आहे. पण या मोसमात रहाणेला त्याच्या फलंदाजीच्या क्रमवारीत तडजोड करावी लागू शकते. परंतु त्याला अजून तरी एकाही सामन्यात दिल्लीच्या अंतिम ११ जणांच्या संघात संधी मिळाली नाही.
टॉम बेंटन (Tom Benton)
इंग्लंडचा युवा सलामीवीर टॉम बेंटन अवघ्या २१ वर्षांचा आहे आणि आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करेल. टॉम बेंटनने आपल्या टी-२० कारकिर्दीमध्ये आतापर्यंत केवळ ९ सामने खेळले असून त्यात त्याने १४३.३५ च्या स्ट्राइक रेटने एकूण २०५ धावा केल्या आहेत. यात त्याची सर्वोत्कृष्ठ धावसंख्या ७१ धावा आहेत. क्वीन्सलँड प्रीमियर क्रिकेटमध्ये त्याने ४० चेंडूंमध्ये १२१ धावांची तुफानी केली केली होती.
खरं तर, कोलकाता संघात आधीच सुनील नरेन आणि शुभमन गिलच्या रूपात सलामीची जोडी आहे. या कारणास्तव, बेंटनला या हंगामात खालच्या क्रमवारीत फलंदाजी करावी लागेल. परंतु या हंगामात त्याला अजून संधी मिळाली नाही.