मुंबई । कोरोना विषाणूच्या सावटात अलिकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. इंग्लंडमध्ये सध्या पुरुष संघाच्या मालिका सुरू आहेत. महिला क्रिकेट सामने देखील लवकरच पुनरागमनच्या मार्गावर आहेत. याच दरम्यान इंग्लंडमध्ये महिलांची तिरंगी मालिका होणार होती, परंतु भारतीय महिला संघाने माघार घेतल्यानंतर आता इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघात द्विपक्षीय मालिका होणार आहे.
याची माहिती देत क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने एक निवेदन जारी केले आहे की, 27 जुलैपासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षण शिबिरापूर्वी संघातील 34 खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. ज्यामध्ये 3 सदस्यांना संसर्ग झाल्याचे आढळले. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे पॉझिटिव्ह आढळणारे सदस्य आता 10 दिवस स्वत: ला आयसोलेशनमध्ये ठेवतील आणि प्रशिक्षण शिबिरांमध्ये भाग घेणार नाहीत.
याबाबत माहिती देताना क्रिकेट दक्षिण आफ्रिका म्हणाले की, त्यांची लक्षणे सौम्य आहेत आणि वैद्यकीय पथक सतत देखरेखीखाली आहे. नॅशनल हाय परफॉरमन्स टीमचे सदस्य एकत्र प्रशिक्षण घेतील. उल्लेखनीय आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर मार्च महिन्यात क्रिकेट सामने स्थगित करावे लागले होते. त्यामुळे खेळाडू त्यांच्या घरीच होते.
भारतीय महिला संघ देखील या तिरंगी मालिकेचा एक भाग होता, परंतु परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यामुळे भारतीय संघाने या मालिकेतून माघार घेतली आहे. याबाबत बीसीसीआयने यापूर्वी ईसीबीशी बोलून इंग्लंडमध्ये खेळण्यास असमर्थता दाखवली.






