भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच २०२५-२६साठीचा वार्षिक करार जाहीर केला. यामध्ये अनेक खेळाडूंना सहभागी केले नाहीत, तर काहींचे खालच्या ग्रेडमध्ये डिमोशन झाले. अशातच बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना आणखी एक मोठा धक्का दिला आहे. यामध्ये त्यांनी खेळाडूंची मोठी मागणी नाकारली आहे. बीसीसीआयने सुरू असलेल्या आयसीसी पुरूष टी२० विश्वचषक २०२६च्या स्पर्धेत खेळाडूंना त्यांच्या कुटुंबांना सोबत नेण्याची मागणी नामंजुर केली आहे.
सध्याच्या नियमांनुसार, जर दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा असेल तर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना दोन आठवड्यांसाठी आणण्याची परवानगी आहे. तथापि, खेळाडू स्वतः ची व्यवस्था करू शकतात.
काही रिपोर्ट्सनुसार, संघ व्यवस्थापकांनी खेळाडूंना त्यांच्या पत्नी आणि प्रियकरासोबत प्रवास करण्याची मागणी बीसीसीआयसमोर व्यक्त केली होती. बीसीसीआयने मात्र जुन्याच नियमांना पुढे करत स्पष्ट नकार दिला. तसेच खेळाडू स्वत: खर्च करत कुटुंबाच्या सदस्यांना आणू शकतो. मात्र संघांच्या योजनेमध्ये खेळाडूंचे कुटुंब नाही.
यावर्षीच्या सुरूवातीला पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर बीसीसीआयने नवी नियमावली लागू केली. त्या १० नियमांमध्ये विदेशी दौऱ्यावर केवळ काहीच दिवस कुटुंबाचे सदस्य सोबत असतील. त्यामध्ये एक नियम स्पष्ट केला गेला, तो म्हणजे ४५ दिवसांपेक्षा कमी दिवसांचा दौर असेल तर एक आठवडा खेळाडू आपल्या कुटुंबातील सदस्याला सोबत ठेवू शकतो. हाच नियम संघांचे मुख्य प्रशिक्षक, सचिव आणि सपोर्ट स्टाफ यांनाही लागू आहे.
गौतम गंभीर भारताचा मुख्य प्रशिक्षक बनल्यानंतर बोर्डने खेळाडूंंच्या कुटुंबातील सदस्यांबाबत हा निर्णय घेतला. काही दिवसांनंतर पुन्हा एकदा खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सोबत नेण्याची मागणी केली असता ती नाकारली गेली आहे.
भारतीय क्रिकेट संघ सध्या घरच्या मैदानावर टी२० विश्वचषक स्पर्धा खेळत आहे. यामधील पहिला सामना जिंकत गतविजेत्या संघाने चांगली सुरूवात केली आहे. यामधील दुसरा सामना नामिबियाविरुद्ध असून तो १२ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये खेळला जाणार आहे.






