क्रिकेटमध्ये यष्टीरक्षणाचे काम हे अतिशय महत्त्वाचे समजले जाते. यष्टीरक्षक हा यष्टीमागे जे काम करतो त्यामुळे गोलंदाजाचे अर्धे काम सोपे होते.
जगात अनेक यष्टीरक्षकांनी आजपर्यंत अफलातून कामगिरीने नाव अजरामर केले आहे. २७९ खेळाडूंनी वनडे क्रिकेट इतिहासात एकदातरी यष्टीरक्षण केले आहे. परंतु गमतीचा भाग म्हणजे यातील केवळ ६ खेळाडूंनी चालु सामन्यात ग्लोव्ज खाली उतरवुन गोलंदाजीची हौसही भागवुन घेतली आहे.
वनडेसारख्या ५० षटकांच्या झटपट प्रकारात ग्लोव्ज उतरवुन गोलंदाजी करणे तशी सोप्पी गोष्ट नक्कीच नाही. परंतु या ६ खेळाडूंनी तो कारनामा केला आहे. त्या ततेंदा तैबू, एमएस धोनी, सर्फराज अहमद, डेवन थाॅमस, अँड्रू हाॅल व हसन तिलकरत्ने या यष्टीरक्षकांचा समावेश आहे.
अँड्रू हाॅलचा अजब कारनामा
२० ऑगस्ट २००० रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात मेलबर्न येथे अँड्रू हाॅल हा सलामीला फलंदाजीला आला होता. जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ फलंदाजीला आला तेव्हा हाॅलने यष्टीरक्षण केले. तसेच याच डावात त्याने एक षटक गोलंदाजीही केली. हाॅल हा असा खेळाडू होता जो सलामीला फलंदाजी व गोलंदाजीला येत असे. त्याने केवळ एकाच सामन्यात यष्टीरक्षण केले.
चला तर असे यष्टीरक्षक पाहु, ज्यांनी वनडेत विकेट्स घेतल्या आहेत-
३. ततेंदा तैबु-
झिंबाब्वेचा माजी कर्णधार असलेल्या तैबून २ सामन्यात गोलंदाजी केली. श्रीलंका संघ २००४मध्ये झिंबाब्वे दौऱ्यावर गेला होता. तेव्हा २० एप्रिल २००४ रोजी झालेल्या सामन्यात तैबूने फलंदाजीत नाबाद ९६ धावा केल्या होत्या. तसेच गोलंदाजीत ४ षटकांत केवळ १९ धावा दिल्या होत्या. या सामन्यात तो संघाचा पुर्णवेळ कर्णधार व यष्टीरक्षकही होता. त्यालाच या सामन्यात सामनावीर पुरस्कार दिला होता.
त्यानंतर याच मालिकेतील शेवटच्या सामन्यात २९ एप्रिल २००४ रोजी तैबूने थिलीना कदांबी व उपुल चंदना यांना बाद केले होते. तसेच फलंदाजीत २६ धावा केल्या होत्या.
२. डेवन थाॅमस
बांगलादेश विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यात २८ जुलै २००९ रोजी वेस्टइंडिजमध्ये झालेल्या सामन्यात डेवन थाॅमस या खेळाडूने पदार्पण केले. त्याने या एकाच सामन्यात यष्टीरक्षणाची जबाबदारी निभावली. या सामन्यात त्याला फलंदाजी मिळाली नाही परंतु गोलंदाजीत त्याने १.१ षटकांत ११ धावा देत २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याने मिशफिकूर रहिम व मेहमिद्दुला या दोन बांगलादेशी खेळाडूंची विकेट घेतली होती. त्यानंतर खेळलेल्या २० सामन्यात मात्र थाॅमसने कधीही यष्टीरक्षण केले नाही.
१. एमएस धोनी
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने ३५० वनडे सामन्यांपैकी २ सामन्यांमध्ये गोलंदाजी केली होती. २००४मध्ये पदार्पण केलेल्या धोनीने आयसीसी चॅंम्पियन्स ट्राॅफीमध्ये ३० सप्टेंबर २००९ रोजी पहिल्यांदा गोलंदाजी केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना धोनीने ट्रॅविस डाॅवलिन या खेळाडूला बाद केले होते. धोनीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ही एकमेव विकेट आहे. या सामन्यात धोनी गोलंदाजीला गेल्यावर दिनेश कार्तिकने यष्टीरक्षण केले होते. यात धोनीने २ षटकांत १४ धावा देत १ विकेट घेतली होती.
त्यानंतर थेट आयसीसी चॅंम्पियन्स ट्राॅफीमध्येच २० जून २०१३ रोजी कार्डिफ येथे श्रीलंकेविरुद्ध खेळताना धोनीने गोलंदाजी केली होती. ४ षटकांत १७ धावा त्याने दिल्या होत्या. या सामन्यातही दिनेश कार्तिकचं यष्टीमागे उभा राहिला होता. हा सामना देखील भारताने जिंकला होता.
वाचा- २००पेक्षा जास्त वनडे खेळून कधीही एकही चेंडू न टाकलेले ५ क्रिकेटपटू