बेंगलुरू बुल्सचा कर्णधार खिलाडी कुमार उर्फ रोहित कुमार याने प्रो कबड्डी फक्त रेडींगमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे. त्याने ही कामगिरी तेलुगू टायटन्स विरुद्ध खेळताना केली. या सामन्याच्या पहिल्या सत्रात तेलुगूच्या इरानियन फरहाद मिलघरदन या खेळाडूला बाद करत त्याने ही कामगिरी केली.
पहिल्या रेडमध्ये बोनस मिळवत एका गुणाची रोहितने कमाई केली. त्यानंतर दोन रेड एम्प्टी केल्यानंतर तिसऱ्या रेडमध्ये पाच खेळाडू मैदानात असणाऱ्या तेलुगू संघाच्या फरहादला बाद करत त्याने ३०० रेडींग गुण मिळवण्याची कामगिरी केली.
या मोसमात रोहित सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमात खेळताना त्याने या सामन्याअगोदर १३ सामने खेळले होते. त्यात त्याने १११ गुण मिळवले होते. त्यातील १०३ गुण त्याने रेडींगमध्ये तर बाकीचचे ८ गुण त्याने डिफेन्समध्ये कमावले आहेत.
रेडींगमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या खेळाडूच्या यादीत प्रवेश करणारा रोहितकुमार ११ खेळाडू ठरला आहे. त्याच्या अगोदर १० खेळाडूंनी अशी कामगिरी केली आहे. रेडींग आणि डिफेन्स या दोन्ही कौशल्याचे गुण मिळून सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहितचा ३२० गुणांसह १३वा क्रमांक लागतो.
यदाकदाचित आपणास हे माहिती नसेल तर-
#१ रोहितने आपल्या प्रो कबड्डी कारकिर्दीची सुरुवात प्रो कबड्डीच्या तिसऱ्या मोसमापासून पटणा पायरेट्स संघाकडून खेळताना केली.
#२ या मोसमात त्याने १२ सामने खेळताना १०९ गुणांची कमाई केली होती. त्याच्या या खेळाच्या जोरावर पटणाने तिसऱ्या मोसमाच्या विजेतेपद पटकावले होते.
#३ पदार्पणाच्या मोसमात रोहितला स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता.