मुंबई । तब्बल दोन दशकांपेक्षा जास्त काळ वेस्ट इंडीज क्रिकेट संघाने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा निर्माण केला होता.
संघात एकापेक्षा एक महाविक्रमी फलंदाजाचा बहराचा काळ होता. जगभर आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीने धाक निर्माण केलेल्या वेस्टइंडीजचा संघ 1988 साली भारताच्या दौऱ्यावर आला होता. तेव्हा भारताच्या एका 19 वर्षीय युवा फिरकी गोलंदाजाने वेस्ट इंडीजच्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जोरावर नाचवले होते.
आपल्या पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात वेस्ट इंडीजचे प्रत्येकी आठ गडी बाद करत सामन्यात एकूण सोळा गडी बाद करत पदार्पण गाजवले. आंतरराष्ट्रीय कसोटीच्या एका सामन्यात सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या खेळाडूचे नाव नरेंद्र हिरवाणी असे आहे. नरेंद्र हिरवाणी यांचा हा विक्रम गेल्या 32 वर्षांपासून अबाधित आहे.
चेन्नई येथे झालेल्या या सामन्यात हिरवाणी यांनी 136 धावा देत 16 खेळाडूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यात ओढले होते. आणि कोणाच्याही स्वप्नात नसलेला विक्रम घडला. नरेंद्र हिरवाणी यांची गोलंदाजी पाहून सारे जण अचंबित झाले होते. त्यांनी टाकलेला हा अविस्मरणीय ‘स्पेल’ क्रिकेट रसिकांच्या मनात आजही मनात घर करून आहे. त्यांच्या भन्नाट गोलंदाजीच्या जीवावर भारताने चेन्नई कसोटीत विजय मिळवला.
आपल्या मुलाच्या बहारदार कामगिरीनंतर हिरवाणी कुटुंबियांनी गोरखपूरमध्ये सलग दोन दिवस आनंद साजरा केला. आठ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीनंतर नरेंद्र हिरवाणी यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतला. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे कामही त्यांनी काही काळ पाहिले आहे. हिरवाणी यांना बालपणापासून क्रिकेटची आवड होती. महाविद्यालय स्तरावर क्रिकेट खेळताना पहिल्यांदा आपली छाप सोडली होती
8 वर्षाची छोटीशी कारकीर्द
नरेंद्र हिरवाणी यांनी भारताकडून एकूण 17 कसोटी सामने खेळताना 66 गडी बाद केले तर 18 एकदिवसीय सामन्यात 23 बळींची नोंद त्यांच्या नावावरती आहे. त्यांनी त्यांचा अंतिम कसोटी सामना 1996 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. तसेच प्रथम श्रेणीच्या 167 सामन्यात 732 बळी घेतले. स्थानिक सामन्यात भन्नाट गोलंदाजी करूनही हिरवाणी यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात खेळण्याची संधी फार कमी मिळाली.
दोन गोलंदाजांनी केला विक्रम
ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज बॉब मॅसी यांनी 1972 साली पदार्पणाच्या पहिल्या कसोटी सामन्यात 137 धावा देत 16 गडी बाद केले होते. तर नरेंद्र हिरवाणी यांनी 136 धावांत 16 गडी बाद केले होते. हा एक जागतिक विक्रम आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बॉब मॅसी आणि नरेंद्र हिरवाणी हे असे दोन गोलंदाज आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत प्रत्येकी आठ गडी बाद केले.






