---Advertisement---

विंडीज संघाला झटका देणारे भारताचे ‘चार’ शिलेदार, यांच्यामुळे शक्य झाला विजय

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 11:13 AM
Team-India
---Advertisement---

भारतीय संघाने टी-२० मालिकेतील तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाला ७ विकेट्सने पराभूत केले. या विजयानंतर भारतीय संघाने पाच सामन्यांच्या या मालिकेतील २-१ अशी आघाडी घेतली आहे. उभय संघातील हा तिसरा सामना वॉर्नर पार्कमध्ये खेळला गेला, ज्यामध्ये वेस्ट इंडीजने प्रथम फलंदाजी करताना ५ विकेट्सच्या नुकसानावर १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १९ षटकात ३ विकेट्सच्या नुकसानावर विजय मिळवला. आपण या लेखात भारतीय संघाच्या चार अशा खेळाडूंवर नजर टाकणार आहोत, ज्यांनी या सामन्यात महत्वाची भूमिका पार पाडली. 

सूर्यकुमार यादव – 
भारतीय संघाला मिळालेल्या या विजयात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याचे योगदान सर्वात महत्वाचे राहिले. कर्णधार रोहित शर्मासोबत सूर्यकुमारने या सामन्यात डावाची सुरुवात केली. त्याने ४४ चेंडू खेळले आणि ताबडतोड ७६ धावा कुटल्या. यामध्ये त्याच्या ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १७२ पेक्षा जास्त होता. रोहित शर्मा संघाची धावसंख्या १९ असताना रिटायर्ड हर्ट झाला. मात्र, त्यानंतर सूर्यकुमार आणि श्रेयस अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. सूर्यकुमारच्या टी-२० कारकिर्दीतील हे ५ वे अर्धशतक होते. संघाची धावसंख्या १३५ असताना सूर्यकुमार बाद झाला.

भुवनेश्वर कुमार – 
भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvaneshwar Kumar) याने या सामन्यात भारताला विजय मिळवून देण्यासाठी महत्वाचे प्रदर्शन केले. भुवनेश्वरने वेस्ट इंडीजच्या २ फलंदाजांना तंबूत धाडले. असे असले तरी, भुवनेश्वर धावांवर लगाम लावू शकला नाही. त्याने ४ षटके गोलंदाजी केली आणि ३५ धावा खर्च केल्या. त्याव्यतिरिक्त आवेश खानही निराशाजनक प्रदर्शन केले. आवेशने टाकलेल्या ३ षटकांमध्ये ४७ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेतली नाही. अष्टपैलू दीपक हुड्डाने एक षटक टाकले आणि यामध्ये फक्त एक १ धावा दिली.

रिषभ पंत – 
युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) याने २६ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. पंत शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिला आणि भारतीय संघाने अवघ्या तीन विकेट्सच्या नुकसानावर सामना नावावर केला. या नाबद खेळीत पंतने ३ चौकार आणि १ षटकार ठोकला. ओबेड मॅकॉयने भारताच्या डावातील १९ वे षटक टाकले. या षटकातील शेवटच्या चेंडूवर पंतने चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

हार्दिक पंड्या – 
अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने संघात जोरदार पुनरागमन केले आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या या सामन्यातही हार्दिकने गोलंदाजीत जबरदस्त प्रदर्शन केले. हार्दिकने ४ षटकांमध्ये १९ धावा खर्च केल्या आणि सलामीवीर ब्रँडन किंग याची विकेट घेतली. किंगने वेस्ट इंडीजसाठी २० धावांचे योगादन दिले आणि बाद झाला. फलंदाजीत मात्र हार्दिक कमाल करू शकला नाही. त्याने अवघ्या ४ धावा करून विकेट गमावली. त्याव्यतिरिक्त नवख्या अर्शदीप सिंगने ३३ धावा खर्च करून १ विकेट घेतली. दिग्गज स्पिनर रविचंद्रन अश्वीनही कमाल दाखवून शकला नाही. अश्विनने या सामन्यात २६ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

भारताला भिडण्यापूर्वी झिम्बाब्वेनं रचलाय इतिहास, पहिल्यांदाच केली ‘ही’ विशेष कामगिरी

सर्वत्र सूर्या! एका दमदार खेळीने केले अनेक ‘रेकॉर्ड ब्रेक’

CWG 2022। उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी टीम इंडिया सज्ज! फक्त करावी लागेल ‘ही’ एक कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---