मुंबई। इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामात ३३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स संघात पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने ३ विकेट्सने विजय मिळवला. चेन्नईच्या या विजयात माजी कर्णधार एमएस धोनी याने मोलाचा वाटा उचलला. याबरोबरच त्याच्या नावावर एक विक्रमही झाला आहे.
धोनीने अखेरच्या षटकांत काढल्या १६ धावा
मुंबईने चेन्नईसमोर (CSK vs MI) १५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना अखेरच्या म्हणजेच २० व्या षटकात चेन्नईला विजयासाठी १७ धावांची गरज होती. यावेळी चेन्नईकडून एमएस धोनीसह (MS Dhoni) ड्वेन प्रीटोरियस फलंदाजी करत होता, तर मुंबईकडून जयदेव उनाडकट गोलंदाजी करत होता. त्याने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रीटोरियसला २२ धावांवर बाद करत माघारी धाडले.
त्यामुळे ड्वेन ब्रावो मैदानात आला. त्याने एक धाव काढत धोनीला स्ट्राईक दिली. पुढे धोनीने तिसऱ्या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारत १० धावा वसूल केल्या. त्यानंतर त्याने ब्रावोबरोबर मिळून दुहेरी धावा काढल्या. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना धोनीने चौकार ठोकत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. धोनीने अखेरच्या षटकातील शेवटच्या ४ चेंडूंवर १६ धावा चोपल्या होत्या. धोनीने एकूण १३ चेंडूत नाबाद २८ धावा केल्या.
धोनीची आयपीएलमध्ये २० व्या षटकात १५ किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना सामना जिंकवून देण्याची ही तिसरी वेळ होती. आयपीएलमध्ये तीनवेळा असा पराक्रम करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी त्याने २०१० साली किंग्स इलेव्हन पंजाब (आताची पंजाब किंग्स) विरुद्ध इरफान पठाणच्या गोलंदाजीवर १८ धावा काढत सामना जिंकला होता. तसेच २०१६ साली धोनीने पंजाबविरुद्धच अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर २२ धावा काढल्या होत्या (3rd time MS Dhoni scores more than 15 runs in the last over to win an IPL chase).
चेन्नईने जिंकला सामना
या सामन्यात मुंबईने २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या. मुंबईकडून तिलक वर्माने नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच सूर्यकुमारने ३२ धावा केल्या. तसेच चेन्नईकडून मुकेश चौधरीने १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईकडून अंबाती रायुडूने ४० धावांची आणि रॉबिन उथप्पाने ३० धावांची खेळी केली. तसेच अखेरीस ड्वेन प्रीटोरियसने २२ आणि धोनीने नाबाद २८ धावा करत चेन्नईला विजयापर्यंत पोहचवले. मुंबईकडून डॅनिएल सॅम्सने ४ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
केरला ब्लास्टर्सची विजयी घोडदौड रोखण्यास चेन्नईयन सज्ज; मुंबई, आरएफवायसी पहिल्या विजयाच्या शोधात
याला काय अर्थय! धोनी अन् जडेजाच्या ‘या’ २ चुकांमुळे चेन्नईला करावा लागला विजयासाठी संघर्ष