निवड समीतीमधील या जागांसाठी बीसीसीआयने या ४ दिग्गजांची नावे केली शॉर्टलिस्ट

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्यासाठी उमेदवारांचे अर्ज मागवले होते. ते अर्ज आता बीसीसीआयला मिळाले आहेत. बासीसीआयने यामधून 4 माजी दिग्गज खेळाडूंच्या नावांची अंतिम निवड केली आहे.

यामध्ये माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर, वेंकटेश प्रसाद, लक्ष्मण शिवरामकृष्णन आणि राजेश चव्हाण यांचा समावेश आहे. शेवटच्या फेरीत या सर्व माजी खेळाडूंची मुलाखत घेण्यात येणार आहे.

वरिष्ठ निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद आणि निवड समितीचे माजी सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या पदांसाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. त्यामुळे या 2 दिग्गजांच्या जागा भरण्यासाठी बीसीसीआयने 4 उमेदवारांची अंतिम निवड केली आहे.

न्यू इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार आगरकर, प्रसाद, शिवरामकृष्णन आणि चव्हाण यांची शेवटच्या फेरीतील मुलाखत क्रिकेट सल्लागार समितीकडून (CAC) घेण्यात येईल. ज्यामध्ये भारताचे माजी अष्टपैलू क्रिकेटपटू मदन लाल, आर.पी सिंग आणि सुलक्षणा नाईक यांचा समावेश आहे.

मुलाखतीची प्रक्रिया येत्या 10 दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रीय निवड समितीच्या पदावर कोण विराजमान होणार? यासंर्भातील अधिकृत घोषणा फेब्रुवारी अखेरीस होऊ शकते.

ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांच्यावर निवड समीतीतील अन्य सदस्यांसह 12 मार्चपासून सुरु होणाऱ्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्याची पहिली जबाबदारी असेल.

You might also like