वनडे क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. १९७४ पासून भारताने वनडे क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक दिग्गजांनी भारतीय संघाचे वनडेत नेतृत्व केले. यात सौरव गांगुली, एमएस धोनी, कपिल देव, मोहम्मद अझरुद्दीन अशा नांवांची नेहमीच चर्चा होते.
भारताचे आत्तापर्यंत २४ खेळाडूंनी वनडेत नेतृत्व केले आहे. यात काही अनपेक्षित नावांचा देखील समावेश आहे. अशाच ४ खेळाडूंचा या लेखात आढावा घेण्यात आला आहे, ज्यांनी कधी नेतृत्व केले होते हे अनेकांना आठवतही नसेल.
४. अजय जडेजा – भारतीय संघातील ९० च्या दशकातील एक महत्त्वाचा फलंदाज म्हणजे अजय जडेजा. त्याने १९६ वनडे सामने त्याच्या कारकिर्दीत खेळले. त्यातील १९९८-९९ च्या दरम्यान त्याने १३ सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्वही केले. त्यातील ८ सामन्यात भारताने विजय मिळवला तर ५ सामन्यात पराभव स्विकारला.
जडेजाने २० मेे १९९८ ला केनियाविरुद्ध बंगळुरु येथे पहिल्यांदा वनडेत नेतृत्व केले होते. हा सामना भारताने ४ विकेट्सने जिंकला होता. तसेच या सामन्यात जडेजाने ५० धावांचीही खेळीही केली होती. त्याने भारताचे नेतृत्व करताना ४४ च्या सरासरीने ३९६ धावा केल्या आहेत.
३. विरेंद्र सेहवाग – भारताचा स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने त्याच्या वनडे कारकिर्दीत २५१ वनडे सामने खेळले. त्यात २००३ ते २०१२ च्या दरम्यान त्याने १२ सामन्यात भारताचे नेतृत्वही केले. भारताने त्याच्या नेतृत्वाखाली ७ सामने जिंकले आहेत. तर ५ सामन्यात भारताने पराभवाचा सामना केला आहे. त्याने बऱ्याचदा नियमित कर्णधारांच्या अनुपस्थितीत प्रभारी कर्णधार म्हणून भारताचे नेतृत्व केले आहे.
त्याने सर्वात आधी १६ एप्रिल २००३ ला बांगलादेश विरुद्ध ढाका येथे भारताचे वनडेत नेतृत्व केले होते. तो सामना भारताने ४ विकेट्सने जिंकला होता. त्या सामन्यात सेहवागने ४३ धावा केल्या होत्या. तसेच त्याने जेव्हा २०११ ला इंदोरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेत २१९ धावांची खेळी केली होती तेव्हाही तो भारताचा कर्णधार होता. त्यामुळे तो वनडेत द्विशतक करणारा पहिला कर्णधार ठरला होता.
२. सुरेश रैना – भारताचा शानदार क्षेत्ररक्षक असलेला सुरेश रैनानेही १२ सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यातील ६ सामन्यात भारताला विजय मिळवण्यात यश आले तर ५ सामने भारताला पराभूत व्हावे लागले. तसेच १ सामना रद्द झाला होता.
त्याने २०१० ला झिम्बाब्वे आणि श्रीलंका विरुद्धच्या तिरंगी मालिकेत, २०११ ला वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत आणि २०१४ ला बांगलादेश विरुद्धच्या मालिकेत मिळून भारताचा कर्णधार एमएस धोनीच्या अनुपस्थितीत भारताचे नतृत्व केले होते.
त्याने सर्वात पहिल्यांदा २०१० ला झिम्बाब्वे विरुद्ध बुलोवायो येथे भारताचे नेतृत्व केले होते. मात्र यात भारताला पराभव स्विकारावा लागला होता. त्याने भारताचे नेतृत्व करताना २५.७७ च्या सरासरीने २३२ धावा केल्या होत्या.
१. अजिंक्य रहाणे- सध्याचा भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणने त्याच्या वनडे कारकिर्दीत ९० सामने खेळले आहेत. यातील ३ सामन्यात त्याने भारताचे नेतृत्व केले आहे. त्याने २०१५ च्या झिम्बाब्वे दौऱ्यात ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत नेतृत्व केले होते.
विशेष म्हणजे हे तिन्ही सामने भारताने जिंकले असल्याने त्याची वनडेतील कर्णधार म्हणून विजयाची सरासरीने १०० टक्के आहे आहे. तो गौतम गंभीर आणि अनिल कुंबळेनंतरचा १०० टक्के विजयाची सरासरीने असणारा भारताचा वनडेतील तिसराच कर्णधार आहे.
रहाणेने नेतृत्व केलेल्या ३ सामन्यात ३७.३३ च्या सरासरीने १ अर्धशतकासह ११२ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख –
ड्रग्ज घेतल्यामुळे बंदी आलेले जगातील ५ क्रिकेटपटू, दोन आहेत…
जागतिक क्रिकेटमधील असे गोलंदाज, ज्यांनी घेतल्या आहेत ४ हॅट्रिक
वनडे सामन्यांमध्ये ‘हॅट्रिक’ घेणार भारताचे ४ दिग्गज गोलंदाज