संघाचं नेतृत्व योग्य खेळाडूच्या हातात असेल तर तो संघाला उंचावर नेऊ शकतो. आयपीएलमध्येही असेच काहीसे झालेले पहायला मिळाले आहे. जेव्हा संघाचे नेतृत्व एका जबरदस्त खेळाडूच्या खांद्यावर असते तेव्हा संघाला त्याचा फायदा होतो. चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांनी यश संपादन केले तर त्याचे श्रेय नक्कीच त्यांच्या सांघिक कामगिरीबरोबरच त्या संघांचे कर्णधार एमएस धोनी, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांना जाते.
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून खेळलेल्या सर्वाधिक सामन्यांचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. त्याने एकूण १७४ सामने खेळले असून चेन्नई सुपर किंग्ज आणि राइझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे नेतृत्व केले आहे. धोनीने कर्णधार म्हणून चेन्नई सुपर किंग्जला ३ वेळा आयपीएल विजेतेपद जिंकून दिले आहे. त्याचबरोबर रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाला ४ वेळा आयपीएल चषक जिंकून दिले आहे. धोनी आणि रोहित शर्मा हे आयपीएलचे सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचे म्हटले जाते.
आत्तापर्यंत आयपीएलमध्ये ४ खेळाडूंनी १०० किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांचे नेतृत्व केले आहे. त्या ४ खेळाडूंबद्दल या लेखात जाणून घेणार आहोत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणारे कर्णधार –
४. रोहित शर्मा (Rohit Sharma)
या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. २०१३ ते २०१९ पर्यंत रोहित शर्माने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून १०४ सामने खेळले. त्यातील ६० सामने जिंकले आणि ४२ गमावले तर दोन सामने बरोबरीत राहिले.
रोहितने आतापर्यंत ७ मोसमांसाठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सांभाळले आणि या ७ हंगामात त्याने मुंबई संघाला ४ वेळा आयपीएल चॅम्पियन संघ बनविला आहे. कर्णधार म्हणून तो किती यशस्वी आहे हे यावरून दिसून येते. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स संघाला एक उंचीवर नेऊन ठेवलं आहे.
३. विराट कोहली (Virat Kohli)
या यादीत तिसर्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली आहे. विराट कोहली २०११ पासून आरसीबीचे कर्णधारपद सांभाळत आहे पण त्याच्या नेतृत्वाखाली एकदाही आरसीबीला आयपीएल चषक जिंकलेले नाही. त्याच्या नेतृत्वाखाली २०१६ च्या आयपीएल हंगामात आरसीबीने अंतिम फेरी गाठली परंतु त्यांना सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. त्या हंगामात विराटची कामगिरीही अफलातून झाली होती. त्याने ९०० पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
विराट कोहलीने आतापर्यंत एकूण ११० सामन्यांत आरसीबीचे आयपीएलमध्ये नेतृत्व केले असून त्यापैकी ४९ सामने जिंकले आहेत तर ५५ सामन्यात पराभूत झाला आहे. २ सामने बरोबरीत राहिले आणि ४ सामन्यांचा निकाल लागला नाही.
२. गौतम गंभीर (Gautam Gambhir)
कोलकाता नाईट रायडर्सने आतापर्यंत २ वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. खरं तर याचे बरेच श्रेय गौतम गंभीरला जाते. गौतम गंभीरच्याच नेतृत्वात केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद जिंकले.
याशिवाय गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सचेही कर्णधारपदही सांभाळले आहे. गंभीरने आयपीएल कारकीर्दीत एकूण १२९ सामने कर्णधार म्हणून खेळले आहेत. त्यापैकी त्याने ७१ जिंकले आहेत आणि ५७ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले, तर एक सामना बरोबरीत झाला होता.
१. एमएस धोनी (MS Dhoni)
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामन्यांत नेतृत्व करण्याचा विक्रम एमएस धोनीच्या नावावर आहे. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने ३ वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आणि सीएसकेने खेळलेल्या सर्व आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. धोनी २००८ पासून सीएसकेचा संघाचा कर्णधार आहे. तसेच २०१६ ला सीएसकेवर बंदी असताना त्याने एका मोसमात त्याने राइझिंग पुणे सुपरजायंट्सचेदेखील कर्णधारपद सांभाळले होते.
आयपीएलमध्ये धोनीने आतापर्यंत एकूण १७४ सामन्यांचे नेतृत्व केले आहे, त्यापैकी १०४ सामने जिंकले आहेत तर ६९ सामन्यात पराभूत व्हावे लागले आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. कर्णधार म्हणून १०० पेक्षा अधिक आयपीएल सामन्यांमध्ये विजय मिळवणारा तो सध्या एकमेव कर्णधार आहे.
ट्रेंडिंग लेख –
आयपीएलमध्ये यष्टीमागे सर्वात जास्त विकेट्स घेणारे ३ यष्टीरक्षक; एमएस धोनी आहे या स्थानी
२ वेळा विश्वचषकात संधी मिळूनही दुखापतीमुळे खेळू न शकलेली हरहुन्नरी पुणेकर देविका वैद्य
पुण्याच्या अनाथालयातील पोरगी, जीने ४ वेळा ऑस्ट्रेलियाला केले विश्वविजेते
महत्त्वाच्या बातम्या-
कोहलीला लॉर्ड्सवर क्लिन बोल्ड करण्याची स्वप्ने पाहणारी कोण आहे ही महिला?
विराट कोहलीला राजस्थान रॉयल्समध्ये घेऊ, पण फक्त एका अटीवर
भारतीय क्रिकेटरच्या गर्लफ्रेंडचा पीपीई किटमध्ये डान्स, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल






