आयपीएल मधील मुंबई इंडियन्स हा एक बलाढ्य संघ आहे. गेल्या काही वर्षांपासून मुंबईची कामगिरी प्रेक्षणीय होताना दिसते. मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल चषकावर आपले नाव कोरले आहे. स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वात मुंबई संघाने मागील वर्षी चौथे आयपीएल विजेतेपद जिंकले.
यंदा देखाली या संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करत असून त्याच्या शानदार नेतृत्वामुळे आणि संघाच्या सांघिक कामगिरीच्या जोरावर हा संघ प्रतिस्पर्धी संघाला तगडे आव्हान देऊ शकतो. त्याचबरोबर या हंगामात मुंबई इंडियन्सची गोलंदाजी देखील भक्कम आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन या लेखात आयपीएल २०२० मध्ये मुंबई इंडियन्स संघ आपले ५ वे विजेतेपद का जिंकू शकतो, याबद्दलची ४ कारणे पाहूया.
मुंबई इंडियन्सकडे आहे सर्वात धोकादायक गोलंदाजी
आयपीएलच्या प्रत्येक हंगामात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली आहे. पण जेव्हापासून रोहित शर्माला मुंबईची कमान मिळाली तेव्हापासून मुंबईची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे. रोहित शर्माला २०१३ मध्ये मुंबईची कमान मिळाली. २०१३ ते २०१९ या काळात मुंबईने ४ आयपीएल विजेतेपद जिंकले असून, त्यात सर्वात मोठे योगदान मुंबईच्या महान गोलंदाजांचे आहे.
मुंबई संघात यावेळी उत्तम गोलंदाज आहेत आणि विशेषत: मुंबईकडे चांगल्या वेगवान गोलंदाजांची फौज आहे. जसप्रीत बुमराह, लसिथ मलिंगा,नॅथन कुल्टर-नाईल, ट्रेंट बोल्ट आणि मिशेल मॅक्लेनाघन यासारखे दिग्गज गोलंदाज आयपीएल २०२० साठी मुंबईकडे आहेत. त्यामुळे गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्स संघ पुन्हा एकदा आयपीएलचा चॅम्पियन बनू शकतो.
संघात असणारे युवा आणि अनुभवी खेळाडू
मुंबई इंडियन्स संघामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समन्वय आहे. संघात रोहित शर्मा, कायरन पॉलार्ड, लसिथ मलिंगा, ख्रिस लिन, क्विंटन डी कॉक, ट्रेंट बोल्ड असे काही अनुभवी खेळाडू आहेत. तर इशान किशन, हार्दिक पंड्या, सूर्य कुमार यादव, जसप्रीत बुमराह असे नवीन दमाचे खेळाडू देखील आहेत. त्यामुळे अनुभवी खेळाडूंचा अनुभव आणि युवा खेळाडूंचा उत्साह यामुळे हा संघ पुन्हा एकदा आयपीएलचा विजेता बनू शकेल.
जबरदस्त फलंदाजी
भारतीय क्रिकेट संघाचा महान सलामीवीर फलंदाज ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आपल्या धोकादायक फलंदाजीने गोलंदाजांचा धुव्वा उडवत असतो. या व्यतिरिक्त दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉक, ख्रिस लिन, सूर्य कुमार यादव आणि ईशान किशनसारखे फलंदाज या संघात आहेत. ज्यांच्या एकट्याच्या जोरावर सामने जिंकवण्याची क्षमता आहे. तसेच पोलार्ड आणि पंड्या बंधूंसारखे आक्रमक फलंदाज तळातील फलंदाजी देखील मजबूत बनवतात. या सर्व फलंदाजांची प्रतिभा बघता या वेळी मुंबई आपले पाचवे विजेतेपद जिंकू शकते.
संघाचे सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू
मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ४ वेळा आयपीएल विजेतेपद जिंकले आहे. यामध्ये अष्टपैलू खेळाडूंची भूमीका नेहमीच महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्याचप्रमाणे यावेळीही संघाचे अष्टपैलू खेळाडू मुंबईला ५ वे आयपीएल विजेतेपद जिंकवून देण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. क्रुणाल पंड्या, हार्दिक पांड्या आणि पोलार्डसारखे अष्टपैलू खेळाडू असून ते गोलंदाजी आणि फलंदाजीद्वारे जबरदस्त कामगिरी करतात. या सर्व खेळाडूंनी बर्याच वेळा आपला खेळ दाखवून संघाला विजयी केले आहे.