टी20 विश्वचषकाला सुरुवात होण्यापूर्वी पाकिस्तानला विजेतेपदाचा मोठा दावेदार मानलं जात होतं. मात्र संघाला पहिल्याच सामन्यात दुबळ्या अमेरिकेकडून पराभव पत्कारावा लागला. अमेरिकेनं गुरुवारी (6 जून) पाकिस्तानविरुद्ध मोठा अपसेट करत सुपर ओव्हरमध्ये विजय नोंदवला. हा विजय अमेरिकेसाठी ऐतिहासिक आहे. या बातमीद्वारे आम्ही तुम्हाला टी20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील पाच सर्वात मोठ्या अपसेटबद्दल सांगणार आहोत.
टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील 5 सर्वात मोठे अपसेट
(5) इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्स, 2009
2009 च्या टी20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंड विरुद्ध नेदरलँड्सचा हा सामना खेळला गेला होता. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 162/5 धावा केल्या. इंग्लंडचा संघ हा सामना सहज जिंकेल अशी सर्वांना खात्री होती. मात्र, नेदरलँड्सनं उलटफेर केला. संघानं फलंदाजीत दमदार कामगिरी करत शेवटच्या चेंडूवर शानदार विजय मिळवला. नेदरलँड्सनं हा सामना 4 गडी राखून जिंकला.
(4) वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान, 2016
हा टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील चौथा सर्वात मोठा अपसेट मानला जातो. हा सामना नागपुरात झाला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्ताननं 123/7 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाची धावसंख्या पाहता कॅरेबियन संघ सहज लक्ष्य गाठेल असं वाटत होतं. मात्र, तसं झालं नाही आणि अफगाणिस्ताननं शानदार गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला 20 षटकांत 117/8 धावांवर रोखलं. अफगाणिस्तानने हा सामना 6 धावांनी जिंकला.
(3) नामिबिया विरुद्ध श्रीलंका, 2022
टी20 विश्वचषकात अपसेट करणाऱ्या संघांमध्ये नामिबियाचं नावही सामील आहे. 2022 च्या विश्वचषकात नामिबियानं श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव करून सर्वांनाच चकित केलं होतं. या सामन्यात नामिबियानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 163/7 धावा केल्या. यानंतर त्यांनी अप्रतिम गोलंदाजी करत श्रीलंकेच्या संघाला 108 धावांतच रोखले. टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील नामिबियाचा हा सर्वात संस्मरणीय विजय आहे.
(2) आयर्लंड विरुद्ध इंग्लंड, 2022
आयर्लंडनं 2022 च्या टी20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध मोठा अपसेट केला होता. या सामन्यात आयरिश संघानं प्रथम फलंदाजी करत 157 धावा केल्या. इंग्लंडच्या फलंदाजीदरम्यान पावसानं व्यत्यय आणला. त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार संघाला 14.3 षटकांत 111 धावांचं लक्ष्य मिळाले. मात्र, इंग्लंडचा संघ लक्ष्य गाठू शकला नाही. ते 14.3 षटकात 105/5 धावाच करू शकले. या सामन्यात इंग्लंडला 5 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
(1) अमेरिका विरुद्ध पाकिस्तान, 2024
2024 टी20 विश्वचषकात अमेरिकेनं सर्वांनाच चकित करत पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताननं 159/7 धावा केल्या. प्रत्युत्तरात, अमेरिकेनंही 20 षटकांत 159/3 धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला. यानंतर सुपर ओव्हर खेळवण्यात आला, ज्यामध्ये अमेरिकेनं प्रथम फलंदाजी करताना 18 धावा केल्या. प्रत्युत्तरात, पाकिस्तानचा संघ 13 धावाच करू शकला. हा टी20 विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात मोठा अपसेट आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
न्यूयॉर्कपासून बांग्लादेशपर्यंत! पाकिस्तानच्या पराभवाचा आनंद जगभरात साजरा; VIDEO व्हायरल
“ही इतिहासाची पुनरावृत्ती…”, अमेरिकेविरुद्ध पाकिस्तानच्या लाजिरवाण्या पराभवानंतर शोएब अख्तर भडकला!
पाकिस्तानची नाचक्की! सुपर ओव्हरमध्ये महाराष्ट्राच्या पोराकडून चारीमुंड्या चीत, इतिहासातील सर्वात वाईट पराभव