जिथे इच्छाशक्ती असते तिथे मार्ग हा मिळतोच. ह्या वाक्य प्रमाणे, अनेक क्रिकेटपटूंनी टिकेचा सामना करत वयोमर्यादेच्या पलीकडे जाऊन उत्कृष्ट खेळ केला. साधारणपणे कोणत्याही खेळासाठी खेळाडूंची वयोमर्यादा ही २० ते ३५ वयापर्यंत असते. कारण जसे वय वाढत जाते तसे शारीरिक बदलही होतात. परंतु काही खेळाडूंनी सर्व वयाचे अडथळे चुकीचे असल्याचे सिद्ध केले आणि नवीन विक्रम स्थापित केले.
कोणत्याही खेळात खेळाडूला त्यांची तंदुरुस्ती आणि सामर्थ्य राखणे आवश्यक असते. संघासाठी त्यांची योग्यता सिद्ध करण्यासाठी त्यांना अतिरिक्त प्रयत्न करावे लागतात. या लेखात, ५ खेळाडूंचा उल्लेख केला आहे ज्यांच्यासाठी वय हा केवळ एक आकडा होता, त्यांनी वयाचाही विचार न करता त्यापलीकडे जाऊन खेळ केला.
१. ब्रॅड हॉग (Brad Hogg)
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने १९९६ मध्ये भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. शेन वॉर्नच्या जागी त्याचा संघात समावेश केला गेला होता. तो ७ वनडे सामन्यांमध्ये खेळला आणि त्यानंतर वॉर्नने दुखापतीतून सावरल्यावर संघात पुनरागम केले व हॉगला संघातून वगळण्यात आले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून तो ७ वर्षे दूर होता. नंतर शेन वॉर्नवर बंदी घालण्यात आली आणि हॉगने पुनरागमन केले. त्यानंतर तो वनडे संघात कायम राहिला. त्याने १२३ वनडे सामने, १५ टी-२० आणि ७ कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. त्याने आंतरराष्ट्रीय सामन्यांत एकूण १८० विकेट घेतल्या आहेत.
वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाला. निवृत्तीनंतरही तो जगातील अनेक टी-२० लीगमध्ये खेळताना दिसला. आयपीएलमध्ये तो ४५ व्या वर्षापर्यंत खेळत होता.
२. मिस्बाह उल हक (Misbah ul Haq)
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मिस्बाह-उल-हक हा वयाच्या ४२ व्या वर्षापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू होता. क्रिकेटपटू सहसा प्रथम कसोटीमधून निवृत्तीची घोषणा करतात आणि त्यांचे लक्ष मर्यादीत षटकांच्या क्रिकेटकडे वळवितात.
मात्र मिस्बाहने २०१५ मध्ये मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून, २०१७ पर्यंत कसोटी क्रिकेट खेळाला. पाकिस्तानकडून मिस्बाह ७५ कसोटी, १६२ वनडे आणि ३९ टी-२० सामने खेळाला. या सर्व प्रकारातील संघाचा त्याने कर्णधारपद ही सांभाळले होते. आपल्या १७ वर्षाच्या कारकीर्दीत त्याने ११,००० हून अधिक धावा केल्या आहेत.
३. माईक हसी (Mike Hussey)
देशांतर्गत क्रिकेटमध्ये कठोर परिश्रम घेणाऱ्या युवा क्रिकेटपटूंसाठी माईक हसी उत्तम उदाहरण आहे. या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटरने वयाच्या २९ व्या वर्षी वनडे आणि वयाच्या ३० व्या वर्षी कसोटी सामन्यात पदार्पण केल. खरं तर तो फक्त ९ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाला आणि या ९ वर्षाच्या कारकिर्दीत त्याने त्याच्या बॅटने अनेक उत्कृष्ट खेळी केल्या.
माईक हसीला “मिस्टर क्रिकेट” हे नाव देखील मिळाले. त्याने ७९ कसोटी, १८५ वनडे आणि ३८ टी-२० सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. उल्लेखनीय म्हणजे २००६ मध्ये वनडे क्रमवारीतील पहिल्या क्रमांकाचा खेळाडू होता.
७९ कसोटी सामन्यात ६२३५ धावा आणि १८५ वनडे सामन्यात ५४४२ धावा तर ३८ टी-२० सामन्यात ७२१ धावा केल्या आहेत. तसेच त्याने २२ आंतरराष्ट्रीय शतकेही केली आहेत.
४. युनुस खान (Younis Khan)
पाकिस्तानचा आणखी एक खेळाडू म्हणजे युनुस खान जो जवळजवळ १५ वर्ष संघाचा अविभाज्य घटक होता. त्याने या कारकिर्दीत कर्णधार म्हणूनही काम पाहिले.
२००० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण केले. २०१६ मध्ये शेवटचा वर्ल्ड टी-२० सामना खेळाला. तो आयसीसीच्या सर्व स्पर्धांमध्ये पाकिस्तान संघाचा नियमित आणि महत्वाचा खेळाडू होता.
तो क्रिकेट जगातील सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक आहे. त्याने ११८ कसोटी, २६५ वनडे आणि २५ टी-२० सामने खेळले. तो वयाच्या ३९ व्या वर्षांपर्यंत खेळला आणि २०१७ मध्ये निवृत्तीची घोषणा केली.
५. ख्रिस गेल (Chris Gayle)
१९९९ मध्ये ख्रिस गेलने वेस्ट इंडिजकडून वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि अजूनही तो खेळत आहे. आतापर्यंत त्याने निवृत्तीची घोषणा केलेली नाही. त्याच्या निवृत्तीच्या बातम्या नेहमीच फिरत असल्या तरी तो त्या कडे लक्ष न देता खेळाचा आनंद घेत राहतो. जगातील गोलंदाजांवर त्याने दहशत निर्माण केली आहे.
या उंच आणि धिप्पाड क्रिकेटपटूने टी२० क्रिकेटमध्ये आपली नवीन ओळख बनवली आहे. टी२० स्वरूपात १०,००० पेक्षा अधिक धावा करणारा तो एकमेव फलंदाज आहे आणि त्याची टी२० मधील वैयक्तिक धावसंख्या १७५ आहे. हा एक विक्रमदेखील त्याच्या नावावर आहे.
४० वर्षीय गेलने आत्तापर्यंत १०३ कसोटी, ३०१ वनडे आणि ५८ टी-२० सामने खेळले आहेत. २०१९ मध्ये तो अखेरचा वनडे सामना खेळला. त्यानंतर तो एकही स्पर्धात्मक सामना खेळला नाही.
वाचनीय लेख –
५ क्रिकेटपटू ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले आहे यष्टीरक्षण, पण अनेकांना माहितीही नाही
असे ३ भारतीय फलंदाज जे भविष्यात करु शकतात रोहित शर्माप्रमाणे फलंदाजी
५ प्रसिद्ध क्रिकेटपटू आणि त्यांच्याकडे असलेले पाळीव प्राणी, डेल स्टेनकडे तर…






