क्रिकेट जगतात वाद होणे काही नवीन नाही. क्रिकेट सुरु झाल्यापासून आत्तापर्यंत अनेक वाद समोर आले आहेत. अशा वादांमुळे काही क्रिकेटपटूंची कारकिर्दही संपुष्टात आली आहे.
त्यात क्रिकेटपटू त्यांच्या खेळण्याबरोबरच त्यांच्या वागण्यातूनही चाहत्यांच्या मनावर अधिक प्रभाव टाकत असतात. त्यामुळे क्रिकेटपटूंच्या प्रत्येक गोष्टीकडे मीडियापासून चाहत्यांपर्यंत सर्वांचे लक्ष असते. याचमुळे एखादा खेळाडू एखाद्या व्यसनामुळे किंवा दारुच्या निगडीत एखाद्या वादात सापडला तर त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होते. अनेकदा अशा कारणांमुळे खेळाडूंवर काही कालावधीसाठी बंदीही आली आहे.
या लेखातही अशा ५ क्रिकेटपटूंचा आढावा घेतला आहे, ज्यांना दारुमुळे संकटाचा सामना करावा लागला.
दारुमुळे अडचणीत सापडलेले ५ क्रिकेटपटू –
५. अँड्र्यू फ्लिंटॉफ –
इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू अँड्र्यू फ्लिंटॉफ लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. त्याने त्याच्या अष्टपैलू खेळाने अनेकदा इंग्लंडसाठी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. २००५ ची ऍशेस मालिका इंग्लंडला जिंकून देण्यात तर फ्लिंटॉफचा मोठा वाटा होता.
पण त्याच्या कारकिर्दीत वाईट काळ सुरु झाला तो २००६-०७ च्या नंतर. त्याच्या नेतृत्वाखाली इंग्लंड संघ २००६-०७ ची ऍशेस मालिका ५-० अशा फरकाने पराभूत झाला. त्यानंतर २००७ च्या वनडे विश्वचषकादरम्यान त्याच्या दारु पिण्याच्या व्यसनामुळे त्याला इंग्लंडच्या उपकर्णधार पदावरुनही काढून टाकण्यात आले होते.
झाले असे की त्या विश्वचषकातील न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव स्विकारावा लागल्याने आणि त्या सामन्यात चांगली कामगिरी न झाल्याने निराश झालेला फ्लिंटॉफ एका पबमध्ये गेला. तिथे त्याने इतकी दारु प्यायली की परत येताना त्याची मनस्थिती इतकी बिघडली की तो एक नाव घेऊन समुद्रात उतरला होता. पण त्याला एका हॉटेल स्टाफने नंतर वाचवले आणि हॉटेलमध्ये परत आणले.
परंतू ही गोष्ट फ्लिंटॉफला माहितीही नव्हती, तो जेव्हा सकाळी उठला तेव्हा तो ओला होता. त्याचवेळी इंग्लंडचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर त्याच्या रुमवर आले आणि त्यांनी त्याला उपकर्णधारपद सोडण्यास सांगितले. तसेच त्यानंतर त्याच्यावर एका सामन्यासाठी बंदीही आली. या घटनेनंतर फ्लिंटॉफची कारकिर्दीलाही उतरती कळा लागली. त्यानंतर त्याने २०१० ला क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
४. डेव्हिड वॉर्नर –
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नरने ऑस्ट्रेलियासाठी अनेकदा महत्त्वाच्या खेळी केल्या आहेत. पण याबरोबरच तो काही मोठ्या वादांमध्येही सापडला आहे. यातील एक वाद म्हणजे इंग्लंडचा सध्याचा कसोटी कर्णधार जो रुटबरोबर झालेली त्याची भांडणे.
२०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान बर्मिंगहॅम वॉकबाउट बारमध्ये रात्री २ वाजताच्या आसपास ही घटना घडली होती. तिथे काही क्रिकेटपटू दारु पित होते. त्यात वॉर्नर, रुटदेखील तिथे होते. त्यावेळी रुट हिरव्या आणि सोनेरी रंगाचा विग घालून हाशिम अमलाची नक्कल करत असल्याचे वॉर्नरला वाटल्याने वॉर्नरने त्याला मारले होते. त्यानंतर बराच वाद झाला होता. त्यावेळी रुट आणि इंग्लंडने अशी कोणतीही नक्कल रुटने केली नसल्याचे स्पष्ट केले होते.
पण या घटनेनंतर वॉर्नरला चॅम्पियन्स ट्रॉफीच्या एका सामन्यातून वगळण्यात आले तसेच २०१३ च्या ऍशेसपर्यंत त्याच्यावर बंदी घातली होती. याबरोबरच त्याला दंडही ठोठावला होता. पण नंतर २०१३ च्या ऍशेसदरम्यान त्याला पुन्हा ऑस्ट्रेलिया संघात संधी देण्यात आली. त्या मालिकेत त्याने २ शतके ठोकली होती.
३. बेन स्टोक्स –
इंग्लंडचा स्टार अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने मागील काही महिन्यांमध्ये शानदार कामगिरी करत इंग्लंडला मोठे विजय मिळवून दिले आहेत. २०१९ चा विश्वचषक इंग्लंडला जिंकून देण्यातही स्टोक्सचा मोठा वाटा होता. परंतू त्याआधी स्टोक्स २०१७ च्या अखेरीस मोठ्या वादात सापडला होता.
त्याने २०१७ मध्ये ब्रिस्टोल नाईटक्लबमध्ये २ व्यक्तींना मारहाण केली होती. त्याच्यासह त्याचा संघसहकारी ऍलेक्स हेल्सही होता. या प्रकरणामुळे स्टोक्सला अटकही करण्यात आली होती. हे प्रकरणे क्रिकेटवर्तुळात मोठ्या प्रामाणात गाजले होते. त्याला या प्रकरणामुळे इंग्लंड संघातूनही बाहेर जावे लागले. तसेच २०१७ च्या ऍशेस मालिकेतही त्याला खेळता आले नव्हते.
त्यानंतर २०१८ मध्ये त्याची या प्रकरणातून निर्दोष सुटका झाली. तेव्हापासून स्टोक्स इंग्लंडकडून चांगली कामगिरी करत असून संघातील महत्त्वाच्या खेळाडूंपैकी एक बनला आहे. तो कसोटी संघाचा उपकर्णधारही आहे.
२. रिकी पाँटिंग –
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगचेही दारुमुळे अडचणीत सापडलेल्या खेळाडूंमध्ये नाव आहे. तो १९९९ मध्ये अशा संकटात सापडला होता. १९९९ला किंग क्रॉस नाईटक्लबमध्ये पॉटिंगची दारुच्या नशेत भांडण झाले होते. त्यावेळी त्याच्या डाव्या डोळ्याला दुखापतही झाली होती.
पाँटिंगने या घटनेच्यावेळी काय झाले होते, हे आठवत नसल्याचे सांगितले होते. तसेच त्यावेळी त्याने मान्यही केले होते की दारूमुळे त्याला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागले होते. या प्रकरणानंतर त्याला ऑस्ट्रेलियाच्या वनडे संघातून वगळण्यात आले होते.
पण नंतर त्याने पुन्हा संघात जागा मिळवली. एवढेच नाही तर पुढे जाऊन तो ऑस्ट्रेलियाचा एक यशस्वी कर्णधारही झाला. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने २००३ आणि २००७ चा विश्वचषकही जिंकला.
१. जेम्स फॉकनर –
२०१५ च्या विश्वचषकातील अंतिम सामन्यात सामनावीर ठरलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू जेम्स फॉकनर २०१५ मध्ये वादात अडकला होता. त्यावेळी लँकाशायरकडून काऊंटी क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी मँचेस्टरमध्ये फॉकनर राहत होता.
तेव्हा हॉटेलमधून परतताना त्याच्याकडून छोटा अपघात झाला. त्यावेळी तो दारु पिऊन गाडी चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आल्याने त्याला अटकही झाली होती. तसेच त्याला दंड ठोठावण्यात आला होता. त्याचबरोबर यूकेमध्ये २ वर्षांसाठी गाडी चालवण्यास त्याला बंदी घालण्यात आली होती.
वाचनीय लेख –
वनडेमध्ये ५ हजार धावा आणि शंभर बळी घेणारे ३ भारतीय क्रिकेटपटू, एक आहे युवराज तर..
क्रिकेटमधील ५ असे अंपायर, जे कायमच चाहत्यांचे राहिले खास
ड्रेसिंग रूम सिक्रेट्स भाग १०: “जित्या, कपिल पाजींची तब्येत अचानक बिघडली आहे, चल लवकर.”