१९७१ मध्ये वनडे क्रिकेटला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने क्रिकेट जगताला वेगाने खेळण्याची ओळख झाली. जवळजवळ ५० वर्षांचा इतिहास असललेल्या या वनडे क्रिकेटमध्येही गरजेनुसार बदल होत गेले. त्यानुसार हळू-हळू क्रिकेटपटूंनीही त्यानुसार बदल करुन घेतला. अनेक खेळाडूंनी आत्तापर्यंत वनडेत मोठ्या खेळी केल्या आहेत. जिथे शतकही कठीण वाटत होते, तिथे आता खेळाडूंनी दिडशतके-द्विशतके करण्यापर्यंत मजल मारली आहे.
काही क्रिकेटपटूंनी तर अशा मोठ्या खेळी केल्या की समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला मिळूनही तेवढ्या धावा करता आल्या नाहीत. अशाच ५ क्रिकेटपटूंचा या लेखात परिचय देण्यात आला आहे, ज्यांनी वनडेत केलेल्या खेळी इतक्या धावाही प्रतिस्पर्धी संघाला मिळून करता आल्या नाहीत.
५. युवराज सिंग – नाबाद १०२ धावा विरुद्ध बांगलादेश, २००३
भारताचा माजी दिग्गज अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने आत्तापर्यंत अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. यातीलच एक खेळी म्हणजे त्याने २००३ ला बांगलादेशविरुद्ध केलेल्या नाबाद १०२ धावा. २००३ ला पेप्सी कप स्पर्धेत ११ एप्रिलला भारत विरुद्ध बांगलादेश संघात ढाका येथे वनडे सामना झाला होता. या सामन्यात युवराजने ८५ चेंडूत नाबाद १०२ धावांची खेळी केली होती. त्या खेळीत त्याने ९ चौकार आणि ४ षटकार मारले होते.
त्या सामन्यात त्याच्याव्यतिरिक्त विरेंद्र सेहवागने ६३ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारताने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २७६ धावा केल्या होत्या. त्यानंतर २७७ धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाचा डाव केवळ ७६ धावांतच संपुष्टात आला. त्यामुळे भारताने हा सामना २०० धावांनी जिंकला.
या सामन्यात बांगलादेश संघाने मिळून केलेल्या ७६ धावांपेक्षाही युवराजने एकट्याने अधिक धावा केल्या होत्या.
४. गॅरी कर्स्टन – नाबाद १८८ धावा विरुद्ध यूएई, १९९६
माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन यांची गणना दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजांमध्ये केली जाते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या अनेक महत्त्वपूर्ण खेळींपैकी एक खेळी म्हणजे त्यांनी १९९६ च्या विश्वचषकात यूएई विरुद्ध केलेली १८८ धावांची खेळी. दक्षिण आफ्रिका विरुद्ध यूएई संघात झालेल्या त्या सामन्यात कर्स्टन यांनी १५९ चेंडूत नाबाद १८८ धावा केल्या होत्या. या खेळीत त्यांनी १३ चौकार आणि ४ षटकार मारले.
त्यांना त्यावेळीचा दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हन्सी क्रोनिएने ५७ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना ३२१ धावा केल्या. त्यानंतर प्रतिउत्तरादाखल यूएई संघाला १५२ धावाच करता आल्या. ज्या कर्स्टन यांनी एकट्याने केलेल्या १८८ धावांपेक्षाही कमी होत्या.
३. फखर जमान – नाबाद २१० धावा विरुद्ध झिम्बाब्वे, २०१८
पाकिस्तानचा युवा सलामीवीर फलंदाज फखर जामनने पाकिस्तानसाठी आत्तापर्यंत अनेकदा चांगला खेळ केला आहे. तो पाकिस्तानकडून वनडेत द्विशतकी खेळी करणाराही पहिला फलंदाज आहे. हा विक्रम त्याने २०१८ ला झिम्बाब्वे विरुद्ध बुलवायो येथे खेळताना केला होता. या सामन्यात त्याने १५६ चेंडूत २४ चौकार आणि ५ षटकार मारत नाबाद २१० धावा केल्या होत्या.
त्यावेळी त्याच्याव्यतिरिक्त इमाम-उल-हकने ११३ धावा केल्या होत्या. त्यामुळे पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ३९९ धावा केल्या होत्या. त्यानंतर ४०० धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ १५५ धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे या धावा फखरने केलेल्या २१० धावांपेक्षाही कमी होत्या.
२. सर विवियन रिचर्ड्स – नाबाद १८९ धावा विरुद्ध इंग्लंड, १९८४
वेस्ट इंडजचे महान क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स यांनी अनेक मोठ्या खेळी केल्या आहेत. त्यांनी १८७ वनडेत सामन्यात ११ शतके केली आहेत. पण त्यातील १९८४ ला इंग्लंड विरुद्ध मँचेस्टर येथे त्यांनी केलेली १८९ धावांची शतकी खेळी सर्वांच्याच लक्षात राहिली.
त्या सामन्यात वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी केली होती. त्यांच्याकडून रिचर्ड्स यांनी संघाची अवस्था ७ बाद १०२ धावा अशी असतानाही १७० चेंडूत नाबाद १८९ धावांची खेळी केली होती. या खेळीत त्यांनी २१ चौकार आणि ५ षटकार मारले होते.
त्यांच्या व्यतिरिक्त एल्डिन बाप्टिस्टे(२६) आणि मायकल होल्डिंग(१२) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली होती. पण रिचर्ड्स यांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने ५५ षटकात ९ बाद २७२ धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या इंग्लंड संघाचा डाव केवळ १६८ धावांवर संपला. इंग्लंड संघाने मिळून केलेल्या १६८ धावा या रिचर्ड्स यांनी केलेल्या १८९ धावांपेक्षाही कमी होत्या.
१. रोहित शर्मा – २६४ धावा विरुद्ध श्रीलंका, २०१४
रोहित शर्मा हा मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये मोठ्या खेळी करण्यासाठी ओळखला जातो. भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार असलेला रोहित वनडेमध्ये ३ द्विशतके करणारा पहिला आणि सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे. त्याने १३ नोव्हेंबर २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे त्याच्या वनडे कारकिर्दीतील दुसरे द्विशतक केले होते.
त्यावेळी त्याने १७३ चेंडूत ३३ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने २६४ धावांची खेळी केली होती. रोहितने २६४ धावांपैकी तब्बल १८६ धावा चौकार आणि षटकार मारत केल्या होत्या. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
त्याच्या खेळीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद ४०४ धावा केल्या होत्या आणि श्रीलंकेला ४०५ धावांचे आव्हान दिले होते. पण श्रीलंकेचा डाव २५१ धावांवरच संपुष्टात आला. त्यावेळी श्रीलंकेच्या संघाने मिळून केलेल्या २५१ धावांपेक्षाही रोहितने एकट्याने अधिक धावा केल्या होत्या.
वाचनीय लेख –
अनिल कुंबळे यांनी विश्वास दाखवलेले खेळाडू जे रवी शास्त्री यांच्या काळात आहेत संघाबाहेर
सेहवागचा ३१९ धावांचा विक्रम मोडू शकणारे ५ भारतीय
वनडे क्रिकेट इतिहासातील हारता-हारता जिंकलेले ५ सामने…